संजय जाधव
मोटार उद्योगात अलीकडेच उतरलेल्या अमेरिकेतील टेस्ला कंपनीच्या गिगा कास्टिंग तंत्रज्ञानाचे आकर्षण आता सर्वच वाहननिर्मिती कंपन्यांना आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या कामगिरीत सुधारणा आणि खर्चात बचत करण्यासाठी वाहन कंपन्या या तंत्रज्ञानाच्या मागे धावू लागल्या आहेत. वाहननिर्मिती क्षेत्रातील जपानी कंपनी टोयोटा मोटारनेही हे तंत्रज्ञान स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हे तंत्रज्ञान स्वीकारणारी टोयोटा ही केवळ एकमेव कंपनी नसून, अशा अनेक कंपन्या आहेत. यामुळे गिगा कास्टिंग चर्चेत आले आहे. गिगा कास्टिंग या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे भविष्यातील वाहननिर्मिती क्षेत्राचे चित्र वेगळे दिसणार आहे.
गिगा कास्टिंग म्हणजे काय?
टेस्ला कंपनीकडून अमेरिका, चीन आणि जर्मनीतील उत्पादन प्रकल्पांमध्ये गिगा प्रेस हे ॲल्युमिनिअम डाय कास्टिंग यंत्र वापरले जाते. या यंत्राचा आकार सर्वसाधारण घराएवढा आहे. आतापर्यंत वाहननिर्मिती क्षेत्रात उत्पादित झालेले नाहीत एवढे मोठे ॲल्युमिनिअमचे भाग या यंत्रातून तयार होतात. टेस्लाने या संशोधनाला गिगा असे नाव देऊन आपल्या प्रकल्पांना गिगा फॅक्टरी असे म्हणण्यास सुरुवात केली आहे. वाहननिर्मिती क्षेत्रातील इतर कंपन्यांनी मेगाप्रेस असे नाव याला दिले आहे. ही यंत्रे टेस्लाच्या गिगापेक्षा आकाराने काही प्रमाणात छोटी असली, तरी अवाढव्य आहेत. एका वेळी या प्रेसमध्ये ८० किलो अथवा त्यापेक्षा अधिक वितळविलेले ॲल्युमिनिअम टाकले जाते. त्यानंतर लगेचच त्यातून वाहनांच्या भागांची निर्मिती होऊन ते बाहेर पडतात आणि तातडीने ते थंड होण्याची प्रक्रिया पूर्ण होते. टेस्लाने ॲल्युमिनिअमसह इतर उपधातूंचा वापर केल्याने यात उष्णतेचा वापर करून भागांची मजबुती वाढवण्याची प्रक्रिया टाळण्यात आली आहे.
वाहननिर्मितीवर नेमका काय परिणाम?
एका मोटारीचा सांगाडा बनवण्यासाठी धातूचे शेकडो भाग वेल्डिंग करून जोडलेले असतात. नवीन तंत्रज्ञानामुळे कमी भाग आणि कमीत कमी खर्च असे उत्पादनाचे साधे गणित टेस्लाने जुळविले आहे. यातून टेस्ला वाहननिर्मिती क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत नफा कमावण्यात आघाडीवर आहे. एकसंध भागातून निर्मिती असल्याने टेस्लाची ‘वाय’ ही उत्तम विक्री असणारी मोटार आहे. यातून कंपनीने ४० टक्के खर्च कमी केला. टेस्लाने ‘३’ या मोटारीसाठी पुढे आणि मागे केवळ एकाच भागाचा वापर केला आहे. यातून कंपनीने उत्पादन प्रक्रियेतून ६०० रोबो हटविले. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वजन हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. कारण बॅटरीचे वजनच ७०० किलोहून अधिक असू शकते. नवीन तंत्रज्ञानामुळे वाहनाचे वजन कमी होऊन उत्पादन प्रकल्पातून होणारे कार्बन उत्सर्जन व टाकाऊ माल कमी केला आहे. टोयोटा कंपनीनेही ॲल्युमिनिअम डाय-कास्टिंगचा वापर करून उत्पादन प्रक्रियेतून अनेक सुटे भाग वगळून टाकाऊ मालही कमी करता येईल, असे म्हटले आहे.
विश्लेषण: सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांवरच कुऱ्हाड?
यंत्रांची निर्मिती कोण करत आहे?
टेस्ला कंपनीने इटलीस्थित आयडीआरए कंपनीकडून ही यंत्रे घेतलेली आहेत. चीनमधील एलके इंडस्ट्रीजकडे या कंपनीची २००८ पासून मालकी आहे. आयडीआरए आणि एलके यांच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये युरोपमधील बुहलर ग्रुप, जपानमधील उबे व शिबाऊरा मशिन, चीनमधील यिझुमी आणि हैतीयान या कंपन्यांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर ॲल्युमिनिअम डाय कास्टिंग बाजारपेठ मागील वर्षी ७३ अब्ज डॉलरवर पोहोचली. ती २०३२ पर्यंत १२६ अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा ॲलिक्स पार्टनर्सचा अंदाज आहे.
वापर कोणाकडून सुरू?
सध्या टोयोटाव्यतिरिक्त जनरल मोटर्स, ह्युंदाई मोटर आणि चीनमधील गीली समूहातील व्होल्व्हो कार, पोलस्टार आणि झीकर या कंपन्यांकडून या तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे अथवा त्याचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. झीकरने प्रचंड मोठ्या आकाराच्या ॲल्युमिनिअम डाय कास्टचा वापर मल्टिपर्पज व्हॅनच्या उत्पादनासाठी सुरू केला आहे. या व्हॅनची विक्री चीनमध्ये केली जात असून, इतर वाहनांच्या उत्पादनासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. व्होल्व्होने स्वीडनमधील गोटेनबर्गनजीकचा उत्पादन प्रकल्प मेगाप्रेस तंत्रज्ञानासाठी अद्ययावत कऱण्यासाठी ९० कोटी डॉलरहून अधिक गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे.
तंत्रज्ञानाचा फायदा किती?
या तंत्रज्ञानामुळे सर्वांत मोठा फायदा खर्चात बचतीचा होत आहे. टेस्लाच्या मोटार विक्रीत ‘३’ आणि ‘वाय’ या मॉडेलची विक्री सर्वाधिक आहे. यामुळे कंपनीकडून नवीन उत्पादन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक सुरू आहे. इतर इलेक्ट्रिक वाहननिर्मिती करणारे नवउद्यमीही याकडे वळत आहेत. सध्या अनेक कंपन्यांकडून पारंपरिक पद्धतीने वाहननिर्मिती केली जाते. ही प्रक्रिया गुंतागुंतीची असून, त्यात कारखान्यातील मोठ्या यंत्रांचा समावेश आहे. यासाठी कंपन्यांनी केलेला खर्च आधीच भरून निघालेला आहे. त्यामुळे नवीन कास्टिंग तंत्रज्ञानासाठी कंपन्यांकडून कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक होण्याबाबत तज्ज्ञ साशंकता व्यक्त करीत आहेत. याचबरोबर अनेक सुट्या भागांऐवजी एकसंध भागातून बनविलेली मोटार ही अपघातानंतर दुरुस्त करणे अधिक खर्चिक ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
sanjay.jadhav@expressindia.com