– महेश सरलष्कर

काँग्रेसमधील जी-२३ गट नेमका काय आहे?

Man Khatav Constituency Prabhakar Deshmukh vs MLA Jayakumar Gore MArathi News
कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Tanaji Sawant and ajit pawar
अजित पवार म्हणाले “तर …माझे पण  कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बोलू शकतात,”
Jammu Kashmir BJP releases third list
भाजपची तिसरी यादी जाहीर, विरोधानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये जुन्या यादीमधील बहुसंख्य नावे कायम
Rahul Gandhi farukh Abdullah marathi news
काँग्रेस – नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, तरी काश्मीर खोऱ्यात मैत्रीपूर्ण लढती?
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
BJP and The Age Factor Issue
BJP : भाजपा हा ‘वृद्धांचा’ पक्ष ? विरोधक तरुण नेत्यांना संधी देत असताना पार्टीसमोरचं वयोवृद्धांचं आव्हान?
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आले. मात्र, पक्षाची कोणतीही अधिकृत जबाबदारी न स्वीकारता राहुल गांधी हेच पक्षाचे सर्व निर्णय घेत आहेत. गांधी कुटुंबाच्या पक्ष संघटना चालवण्याच्या पद्धतीला पक्षांतर्गत विरोध होऊ लागला. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर पक्ष संघटनेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. जिल्हा स्तरापासून केंद्रीय स्तरापर्यंत नेतृत्वबदल करावा लागेल. त्यासाठी संघटनात्मक निवडणुका घेतल्या पाहिजेत. पूर्ण वेळ कार्यरत राहणारे, कार्यकर्त्यांना भेटणारे नेतृत्व म्हणजेच पक्षाध्यक्ष असला पाहिजे, अशी मागणी होऊ लागली. गांधी कुटुंबियांविरोधातील हा सूर जाहीरपणे आळवणाऱ्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोर गटाला ‘जी-२३’ म्हटले जाऊ लागले. २३ बंडखोर नेत्यांनी ऑगस्ट २०२०मध्ये सोनिया गांधी यांना पक्ष नेतृत्व व संघटनेतील बदलासंदर्भातील मागणी करणारे पत्र पाठवले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान व बंडखोर असा वाद वाढत गेला. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर तो विकोपाला गेला आहे.

‘जी-२३’मधील मूळ बंडखोर कोण?

गुलाम नबी आझाद, कपिल सिबल, शशी थरूर, मनीष तिवारी, आनंद शर्मा, पी. जे. कुरियन, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, जितीन प्रसाद, भूपेंद्र सिंह हुडा, राजिंदर कौर भट्टल, एम. वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, अजय सिंह, राज बब्बर, अरविंद सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रताप सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित आणि विवेक तन्खा. त्यातील जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये तर, योगानंद शास्त्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ‘जी-२३’ आता ‘जी-२१’ झाला आहे. मात्र, बुधवारी, १६ मार्च रोजी झालेल्या बंडखोरांच्या बैठकीत गांधी निष्ठावान मणिशंकर अय्यरही सामील झाले. शशी थरूर हे मूळ बंडखोर गटातील असले तरी, ते सक्रिय नव्हते. यावेळी मात्र त्यांनी ‘जी-२३’ गटाला कौल दिला असून तेही बैठकीला उपस्थित राहिले. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम या गटात सहभागी झाले नसले तरी, सहानुभूतीदार आहेत.

कार्यसमितीच्या बैठकांमध्ये काय झाले?

‘जी-२३’ पत्रलेखकांच्या पत्रानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक झाली होती. समितीत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा व मुकुल वासनिक हे तीन बंडखोर सदस्य आहेत. समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या निष्ठावानांनी बंडखोरांवर शाब्दिक हल्लाबोल केला होता. तरीही कपिल सिबल, आनंद शर्मा आदी नेत्यांनी सातत्याने संघटनात्मक बदलाची मागणी लावून धरली. ‘जी-२३’ गटातील नेत्यांचा राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीला विरोध आहे. आता तर, काँग्रेस पक्ष सगळ्यांचा होता, आता फक्त कुटुंबाचा झाला आहे, अशी थेट टीका सिबल यांनी केली आहे! आझाद हे मोदी व संघाशी जवळीक साधत असल्याचा आरोप करत त्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आली.

सोनियांनी समेट घडवण्याचा प्रयत्न केला का?

दोन्ही गटांमध्ये सोनिया गांधी व प्रियंका गांधी-वाड्रा यांनी पुढाकार घेऊन समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी ‘१० जनपथ’वर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बंडखोर नेत्यांची बैठकही घेण्यात आली होती. या बैठकीत मात्र, राहुल यांच्या समर्थकांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. पण, पक्ष संघटना व नेतृत्व बदलाचा मूळ प्रश्न कायम राहिल्याने समन्वयाचा प्रयत्न अपयशी ठरला. रविवारी, १३ मार्च रोजी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत नेतृत्व बदलाबाबत ठोस निर्णय घेतला न गेल्यामुळे ‘जी-२३’ गटातील नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत तर, अधीर रंजन चौधरी, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, डी. शिवानंद, मल्लिकार्जुन खरगे आदी गांधी निष्ठावान पक्षनेतृत्वासाठी किल्ला लढवत आहेत.

जी-२३ गटातील नेत्यांची ताकद किती?

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सातत्याने पराभूत होत असून संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल व प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांच्यासारख्या जनाधार नसलेल्या राहुलनिष्ठावान नेत्यांनी पक्षावर कब्जा केल्याचा आरोप होत आहे. राहुल यांच्या चमूतील एकाही नेत्याकडे निवडणूक जिंकण्याची क्षमता नसल्याचे सांगितले जाते. सुरजेवाला यांना हरियाणातील जिंद विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकदेखील जिंकता आली नाही! पण, ‘जी-२३’ गटातील नेतेही राहुल निष्ठावानांप्रमाणे ‘बिनबुडा’चे असल्याचा आरोप केला जातो. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदरसिंह हुडा वगळता एकही लोकप्रिय नेता ‘जी-२३’ गटात नाही. या गटाचे म्होरके आझाद, सिबल आणि आनंद शर्मा हे तिघेही कित्येक वर्षे राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. शशी थरूर, मनीष तिवारी आदी काही नेत्यांकडे लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असली तरी ते काँग्रेस पक्षात सर्वमान्य नाहीत. बाकी नेत्यांकडेही जनमत नाही. त्यामुळे ‘जी-२३’ गट बंडखोर असला तरी या नेत्यांकडे काँग्रेस पक्षाला बळकट करण्याची, भाजपविरोधात उभे राहून काँग्रेस पक्षाला निवडणुकांमध्ये जिंकून देण्याची क्षमता नाही.