सौदी अरेबियातील मक्का येथे वार्षिक हज यात्रेला सुरुवात झाली आहे. पवित्र काबाचे दर्शन घेण्यासाठी मक्का मशिदीच्या दिशेने हजारो मुस्लिम व्यक्ती चालू लागल्याचे दृश्य सध्या सौदीत दिसत आहे. जगभरातील १६० देशांमधून दोन दशलक्ष यात्रेकरू दरवर्षी हज यात्रा करण्यासाठी मक्का येथे जात असतात. जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव मानल्या जाणाऱ्या हज यात्रेला करोना निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या जोमाने सुरुवात झाली आहे. इस्लाम धर्माच्या पाच तत्त्वांपैकी हज यात्रा एक तत्त्व आहे. शारीरिक आणि आर्थिकरीत्या सक्षम असणाऱ्या मुस्लिमांनी आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे, असे सांगितले जाते. जीवनात कळत-नकळत झालेले पाप धुऊन टाकणारा आणि अल्लाहच्या नजीक नेणारा एक आध्यात्मिक अनुभव म्हणून हज यात्रेकडे पाहिले जाते. मुस्लिम धर्मीयांच्या एकतेचे प्रतीक म्हणूनही याकडे पाहिले जाते.

१९२० साली सौदी अरेबियाच्या शाही परिवाराने मक्का स्वतःच्या ताब्यात घेतले. सौदीतील यंत्रणांनी अब्जावधी रुपये खर्च करून इथे आधुनिक सोई-सुविधा उभारल्या आहेत. मात्र, २०१५ मध्ये यात्रेदरम्यान मोठी शोकांतिका घडली. चेंगराचेंगरीमुळे जवळपास २,४०० यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता. सोमवार (२६ जून)पासून सुरू झालेली हज यात्रा आणि इस्लाममधील तिच्या महत्त्वाबद्दल जाणून घेऊ या…

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
experts express affordable housing solutions in indian expres thinc our event
शहरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य!
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार

हज यात्रा कधी होते?

‘धू-अल-हिज्जा’ (Dhu al-Hijjah) इस्लामिक दिनदर्शिकेच्या या शेवटच्या महिन्यात हज यात्रेला प्रारंभ होतो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेच्या तुलनेत इस्लामिक दिनदर्शिकेत ११ दिवस कमी येतात. त्यामुळे ग्रेगोरियन दिनदर्शिकेत दरवर्षी हजच्या तारखा वेगवेगळ्या असतात. मागच्या वर्षीपेक्षा पुढील वर्षात हज १० ते ११ दिवसांनी आधीच येतो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार दर ३३ वर्षांनी एका वर्षात दोन वेळा हजच्या तारखा येतात. असा योगायोग २००६ साली घडलेला आहे. या वर्षी हजच्या तारखा २६ जून ते १ जुलैपर्यंत आल्या आहेत.

इस्लामधील हज यात्रेचा इतिहास काय आहे?

हज यात्रा जगभरातील मुस्लीमांना मक्का येथे आकर्षित करत असते. जिथे ते प्रेषित मोहम्मद यांच्या पावलावर पाऊल ठेवून हज यात्री प्रवास करतात. अल्लाहने आदेश दिल्याप्रमाणे इब्राहिम याने मक्का येथे देवासाठी घर तयार केले. (सध्या मक्का येथे असलेले काबा हे ते ठिकाण असल्याचे मानले जाते) इब्राहिमने याठिकाणी तीर्थयात्रेची परंपरा सुरू केली. (ख्रिश्चन आणि ज्यू धर्मात यांची नावे अनुक्रमे अब्राहम आणि इश्माएल आहेत.) इब्राहिमनंतर त्याचा मुलगा ईस्माईल आणि या भागात राहणाऱ्या विविध जमातींनी ही परंपरा पुढे नेली. जशी शतके पुढे गेली, तसे इब्राहिम यांनी दाखविलेला एकेश्वरवाद हळूहळू क्षीण होत गेला आणि काबामध्ये मूर्तिपूजेने शिरकाव केला.

हे वाचा >> आता एकटी मुस्लिम महिलाही करु शकणार ‘हज’ यात्रा; ‘मेहरम’अर्थात गार्डियनसंदर्भातला नियम शिथील

कालांतराने प्रेषित मोहम्मद यांचा जन्म (अंदाजे इसवी सन ५७०) झाल्यानंतर जुनी पद्धत मागे पडली. इसवी सन ६३० मध्ये प्रेषित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मक्का जिंकण्यात यश मिळवले. काबामधील सर्व मूर्ती नष्ट करून त्याची पुनर्स्थापना केली. इसवी सन ६३२, जेव्हा प्रेषित मोहम्मद यांचे देहावसान झाले, त्या वर्षी त्यांनी काबाची सर्वांत पहिली तीर्थयात्रा पूर्ण केली. प्रेषित मोहम्मद यांची निरोप तीर्थयात्रा म्हणून याची ओळख आहे. याच यात्रेत हजचे नियम आणि संस्कार ठरविले गेले, जे आजतागायत मुस्लिम भाविकांकडून पाळण्यात येतात.

काळा रंग आणि सोन्याचे भरतकाम करून कापडाने झाकलेल्या चौकोनी आकाराच्या काबा या वास्तूला मुस्लिम धर्मात मोठे पवित्र स्थान आहे. एकेश्वरवाद आणि एकतेचे ते शक्तिशाली प्रतीक असल्याचे मानले जाते. जगात मुस्लिम व्यक्ती कुठेही असली तरी ती काबाच्या दिशेने तोंड करून रोजचा नमाज पठण करत असते. प्रेषितच्या काळापासून दरवर्षी हज यात्रा होत आहे. आजवर युद्ध, प्लेग आणि इतर कोणतेही अडथळे आले तरी हज यात्रा दरवर्षी होते.

मध्ययुगात हज यात्रा करणे फार कठीण काम होते. कैरो, दमास्कस आणि इतर शहरांमधून मोठमोठ्या सशस्त्र तांड्यासह हज यात्रेचे आयोजन केले जात असे. वाळवंटातून केला जाणारा हा एक कठीण प्रवास होता. वाटेत बेडूइन जमातीकडून तांड्यावर हल्ले केले जायचे आणि खंडणीची मागणी केली जात असे. १७५७ साली बेडूइन जमातीच्या लोकांनी संपूर्ण हज तांडा नष्ट करत हजारो यात्रेकरूंची हत्या केली होती. २०२० साली जगभरात आलेल्या करोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे सौदी अरेबियाने हज यात्रेवर बंधने आणली होती. त्या वेळी देशातील काही हजार नागरिक आणि स्थानिकांनाच मक्कात येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर या वर्षी पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने हज यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

हजसाठी मुस्लिम नागरिक कशाप्रकारे तयारी करतात?

काही यात्रेकरू हजला जाण्यासाठी आयुष्यभर पैशांची बचत करत असतात किंवा परमिट मिळण्यासाठी अनेक वर्षांची वाट पाहत असतात. सौदी अरेबियाकडून प्रत्येक देशाला कोटा निश्चित करून देण्यात आला आहे. त्या त्या देशातून तेवढ्याच संख्येने यात्रेकरू पाठविण्यात येतात. ट्रॅव्हल एजंटकडूनही विविध उत्पन्न गटांसाठी हज पॅकेज विकण्यात येते. तसेच धर्मादाय संस्थांकडून गरजू यात्रेकरूंना मदत देण्यात येते.

हे वाचा >> विश्लेषण : Hajj Yatra 2023 – मोदी सरकारने का रद्द केला हज यात्रेचा ‘VIP कोटा’? जाणून घ्या, कुणाकडे किती होता कोटा

हज यात्रेकरूस सौदीतील इहराम या पवित्र राज्यातून यात्रेची सुरुवात करावी लागते. स्त्रिया केस झाकून; तर पुरुष पांढऱ्याशुभ्र रंगाचे वस्त्र अंगभर परिधान करून यात्रेसाठी चालू लागतात. या पांढऱ्या वस्त्राला कोणत्याही प्रकारची शिलाई केलेली नसावी, असे नियम गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांनाच घालून देण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान यात्रेकरूंना केस कापण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच इहराममध्ये असताना नखे कापणे किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान कुणाशीही ओरडून बोलण्यास किंवा भांडण करण्यास मनाई असते. उष्णता, गर्दी आणि प्रवासातील विविध अडथळ्यांचे टप्पे पार करत असताना व्यक्तीच्या संयमाची परीक्षा यातून घेतली जाते.

मक्काच्या दिशेने जात असताना अनेक मुस्लिम यात्रेकरू मदीनाला भेट देतात. या ठिकाणी प्रेषित मोहम्मद यांना दफन करण्यात आले होते; तसेच याच ठिकाणी त्यांची पहिली मशीद बांधण्यात आली होती.

हज दरम्यान काय होते?

पहिल्या दिवशी यात्रेकरू मक्कामधील काबा वास्तूला घडाळ्याच्या काट्यानुसार सात वेळा प्रदक्षिणा करून हज सुरू करतात. या क्रियेला तवफ (Tawaf) असे म्हटले जाते. प्रदक्षिणा करत असताना भाविक नमाजचे पठण करतात. त्यानंतर इस्लामिक परंपरेनुसार हागरने (प्रेषित इब्राहिम यांची पत्नी) ज्या ठिकाणी तिच्या मुलाने इस्लाईलसाठी पाण्याचा शोध घेतला, त्या दोन टेकड्यांवर यात्रेकरू चढतात आणि त्या ऐतिहासिक प्रसंगाची उजळणी करतात. काबा, सफा व मारवा नावाच्या दोन टेकड्या मक्का या मशिदीच्या आत आहेत. ही कथा इस्लाम, ख्रिश्चन व ज्यू परंपरेमध्ये विविध प्रकारे सांगण्यात आलेली आहे.

दुसऱ्या दिवशी मक्का मशिदीच्या पूर्वेकडे २० किमी अंतरावर असलेल्या माउंट अराफतच्या दिशेने यात्रेकरू निघतात. या ठिकाणी प्रेषित मोहम्मद यांनी शेवटचे प्रवचन दिले होते. या स्थानाला दयेचा पर्वत (Mountain of Mercy) असेही म्हटले जाते. येथे यात्रेकरू दिवसभर उभे राहून प्रार्थना करतात आणि आपल्या पापांची क्षमा मागतात. अनेकांच्या मते- हज यात्रेतील हा सर्वोच्च क्षण आहे. सूर्यास्त होण्याच्या वेळेस यात्रेकरू या ठिकाणाहून निघून अराफतच्या पश्चिमकडे नऊ किमी अंतरावर असलेल्या मुजदलिफा या ठिकाणी जातात. मुजदलिफा येथे रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी छोटे दगड वेचण्याचा विधी पार पाडला जातो; ज्याला जमराह (Jamarah) असे म्हटले जाते.

इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार मिना या ठिकाणी इब्राहिमला अल्लाहची आज्ञा नाकारून मुलाला वाचविण्याचा मोह झाला होता. हा मोह दुष्ट आत्म्यामुळे झाला होता, अशी मान्यता असल्यामुळे यात्रेकरूंनी वेचलेले दगड दुष्ट आत्म्यावर फेकण्याची प्रतीकात्मक परंपरा आजवर जोपासण्यात आली आहे. तसेच मिना या ठिकाणी यात्रेकरू तंबूत अनेक रात्री घालवितात. हा जगातील सर्वांत मोठा कॅम्प असल्याचे म्हटले जाते. मिना येथे एक लाख वातानुकूलित तंबू आहेत; ज्यामध्ये एका वेळेस तीन लाख यात्रेकरूंची राहण्याची सोय करण्यात आली आहे. पुढे काबाची अंतिम प्रदक्षिणा करून आणि मिना येथे दगडफेक करून यात्रेची समाप्ती होते. यात्रेच्या समाप्तीवेळी नावीन्याची अनुभूती म्हणून पुरुष डोके भादरतात.

आणखी वाचा >> दिवाळखोर पाकिस्तानकडे ‘हज यात्रे’साठी पैसे नाहीत? हजचे अनुदान रद्द करण्याचा पाकिस्तानचा निर्णय

हजचे शेवटचे दिवस ईद-उल-अधा किंवा बकरी ईदच्या बरोबरीने येतात. जगभरातील मुस्लिम नागरिक इब्राहिमच्या अल्लाहवरील विश्वासाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने बकऱ्याचा बळी देऊन त्याचे मांस गरिबांमध्ये वाटण्याची प्रथा काही लोक पाळतात. हज यात्रा केल्यानंतर अनेकांना हज किंवा हज्जा हे उपनाव देऊन सन्मानाने त्यांचा उल्लेख केला जातो. काही यात्री त्यांच्या घरावर विमान, जहाज व काबाचे चित्र रंगवून आपल्या प्रवासाची आठवण कायमची स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करतात.

सौदी अरेबियासाठी हजचे महत्त्व काय आहे?

हज यात्रा आयोजित करणे ही सौदी अरेबियासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मध्य पूर्व भौगोलिक राजकारणाचे तज्ज्ञ कामरान बुखारी यांनी २०१७ साली केलेल्या लिखाणानुसार, मक्का व मदीना या पवित्र स्थळांचे प्रशासकीय अधिकार आणि हज यात्रेवर नियंत्रण असल्यामुळे रियाधमधील (सौदी अरेबियाची राजधानी) राजेशाहीला वैधता प्राप्त होते.

त्याशिवाय हज यात्रा सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेमध्येही मोठे योगदान देते. तेलाच्या निर्यातीनंतर यात्रेकरूंच्या माध्यमातून दरवर्षी सौदी अरेबियाला अब्जावधींचा महसूल मिळतो. २०२२ साली हजशी निगडित असलेला महसूल १५० अब्जांच्या पलीकडे गेला होता.

Story img Loader