सध्या अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये उष्णतेची प्रचंड लाट अनुभवायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासूनच उष्णतेची ही तीव्रता अमेरिकन लोकांना अनुभवायला मिळते आहे. जवळपास ७५ दशलक्ष लोक अंगाची लाही लाही करणाऱ्या या उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त झाले असून उष्णतेबाबत नोंदवण्यात आलेले सर्व विक्रम मोडीत निघत आहेत. अमेरिकेतील साधारण १२ शहरांमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्यातही कॅलिफोर्नियामध्ये उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक हाहाकार पाहायला मिळतो आहे. उदाहरणार्थ, उत्तर कॅलिफोर्नियाच्या रेडिंगमध्ये शुक्रवार (५ जुलै) आणि शनिवारच्या (६ जुलै) दरम्यान तापमान ४८.३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सॅन फ्रान्सिस्कोच्या अगदी उत्तरेस असलेल्या उकियामध्येही त्याच दिवशी तापमान ४७.२२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, दक्षिण कॅलिफोर्नियामधील पाम स्प्रिंग्सने ५१.११ अंश सेल्सिअसचा विक्रमी उच्चांक गाठला होता. याआधी या भागामध्ये एवढ्या तापमानाची नोंद कधीही झालेली नव्हती. कॅलिफोर्नियाच्या मध्यभागी उष्णतेचा घुमट (Heat Dome) निर्माण झाल्यामुळेच तीव्र तापमानाची नोंद होताना दिसत आहे. ‘हिट डोम’ अर्थात उष्णतेचा घुमट म्हणजे काय, तो कसा निर्माण होतो, याविषयी माहिती घेऊयात.
हेही वाचा : भारतीय पोस्ट खात्याच्या नावे लोकांची आर्थिक फसवणूक; काय आहे हा घोटाळा? कशी टाळता येईल फसवणूक?
हिट डोम म्हणजे काय?
हिट डोम ही एक हवामानामध्ये निर्माण होणारी अवस्था आहे. जेव्हा वातावरणामध्ये उच्च दाब निर्माण झाल्यामुळे गरम हवा अडकून बसते, तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. उदाहरणार्थ, एखाद्या मडक्यावर झाकण ठेवल्यानंतर आतील वाफ आतच कोंडली जाते, अगदी तशीच काहीशी परिस्थिती वातावरणातही निर्माण होते. सभोवताली एखाद्या घुमटाप्रमाणे उच्च दाबाचा पट्टा तयार होतो, त्यामुळे ज्याप्रमाणे एखाद्या झाकणामुळे मडक्यातील हवा बाहेर पडू शकत नाही, त्याचप्रमाणे या घुमटामुळेही वातावरणातील गरम हवादेखील त्याबाहेर पडू शकत नाही, ती आतच अडकून बसते. त्यामुळे आभाळ निरभ्र दिसू लागते. सामान्यत: जेव्हा गरम हवा आकाशात जाऊन थंड होते, तेव्हा ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. इथे नेमके त्याच्या उलट घडते. इथे ढगच निर्माण होत नाहीत. त्यामुळे उष्णता अधिकाधिक कोंडल्याची परिस्थिती निर्माण होते. वातावरणात उच्च दाब निर्माण झाल्यामुळे अधिकाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर येऊ लागतो. त्यामुळे अधिक उष्णता निर्माण झाल्याने मातीही कोरडी पडू लागते. परिणामत: बाष्पीभवन कमी होते. परिणामी पावसाचे ढग कमी प्रमाणावर तयार होतात. उष्णतेचा हा घुमट म्हणजेच हिट डोम जितका जास्त काळ टिकून राहतो, तितका तो अधिक उष्णता निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होतात.
यामध्ये जेट स्ट्रीमची भूमिका काय?
हिट डोमच्या निर्मितीमध्ये जेट स्ट्रीमची भूमिकाही महत्त्वाची ठरते. जेट स्ट्रीम म्हणजे वेगाने वाहणाऱ्या हवेचे क्षेत्र असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वातावरणामध्ये बदल घडवण्यात याचीच भूमिका महत्त्वाची ठरत असते. या जेट स्ट्रीम्सची एखाद्या लाटांप्रमाणे रचना असते. त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत असतात. कधी कधी या लाटा मोठ्या होऊन पसरतात. जेव्हा असे घडते, तेव्हा जेट प्रवाह हळूहळू प्रवास करू लागतो. काहीवेळा तो आहे त्या ठिकाणीच स्थिर होतो. जेव्हा जेट स्ट्रीम्स आहे त्या ठिकाणी थांबतात, तेव्हा उच्च दाब तयार होतो. हाच उच्च दाब हिट डोमच्या निर्मितीस कारणीभूत ठरताना दिसतो.
हेही वाचा : संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
हवामान बदलामुळे हिट डोमची निर्मिती होत आहे का?
हवामानातील बदलांचा परिणाम हिट डोमच्या निर्मितीमध्ये होतो का आणि होत असेल तर तो कशा प्रकारे होतो यावर अद्यापही खल सुरू आहे. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे हिट डोमचे आकार आणि प्रमाणही वाढले आहे, याबाबत संशोधकांचे एकमत आहे. हवामान संशोधकांच्या २७ जणांच्या आंतरराष्ट्रीय गटाने २०२१ मध्ये एक संशोधन केले होते. त्यांनी जून २०२१ मध्ये कॅनडामध्ये तयार झालेल्या एका हिट डोमवर अभ्यास केला. या हिट डोममधील उच्च तापमान अत्यंत असामान्य असल्याचे या अभ्यासामध्ये आढळून आले. ते म्हणाले की, मानवी हस्तक्षेपामुळे कारणीभूत ठरणाऱ्या हवामान बदलाशिवाय इतके तापमान वाढणे हे जवळजवळ अशक्य आहे. नेचर जर्नलमध्ये यासंदर्भातच आणखी एक अभ्यास २०२३ मध्ये प्रकाशित झाला होता. या अभ्यासामध्ये, हिट डोम्सची तीव्रता वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. जागतिक तापमानवाढीपेक्षाही हिट डोम्सची तीव्रता अधिक गतीने वाढत आहे. याचा अर्थ, हवामान बदलांमुळे हिट डोम्स अधिक तीव्र होत असल्याचे या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.