Heat Stroke Death in Mumbai Maharashtra : नवी मुंबईतल्या खारघर येथे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वीस लाखांहून अधिक लोक जमल्याचे सांगण्यात येते. यांपैकी शंभरहून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यातील ११ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यामुळे उष्माघात हा किती जीवघेणा ठरू शकतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. नवी मुंबईत घडलेल्या घटनेवरून राजकारण पेटले असले तरी उष्माघात हा राजकीय कार्यक्रम पाहून येत नाही. पुरेशी काळजी न घेतल्यास कुणीही याला बळी पडू शकतो. त्यामुळे उष्माघात म्हणजे काय? आरोग्यासाठी तीव्र ऊन हानीकारक का आहे? आणि त्यापासून बचाव कसा करायचा? याचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उष्माघात येण्याचे प्रमाण हल्ली वाढले असून त्याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवू लागली आहे. वातावरणातील बदलांमुळे कडक उन्हाळा अधिक काळ सोसावा लागतोय, ज्यामुळे याचे घातक परिणाम पाहायला मिळत आहेत. यंदाच्या वर्षी आलेली उष्णतेची लाट ही गेल्या काही वर्षांतील विक्रमी स्वरूपाची आहे. राजधानी दिल्लीत चालू एप्रिल महिना हा मागच्या ७२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण एप्रिल म्हणून गणला गेला, तर मार्च महिना मागच्या १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना म्हणून नोंदविला गेला. भारतात तापमानाची तीव्रता वाढल्यामुळे उन्हाच्या झळा बसून थकवा आणि उष्माघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. यामुळे मानवी आरोग्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

हे वाचा >> देशात प्रथमच उष्माघात नियंत्रणासाठी कृती आराखडा; रस्ते, इमारतींचे रंग, वृक्ष लागवडीचा अभ्यास करणार

तीव्र उष्णतेमुळे आपल्या शरीरात कोणते बदल जाणवतात?

उन्हाच्या तीव्र झळा बसत असताना मानवी शरीर त्यावर प्रतिक्रिया देत घाम बाहेर काढून शरीराचे तापमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र उष्णतेच्या झळा वाढल्यानंतर शरीरातील रक्ताभिसरण क्रियेवर त्याचा दुष्परिणाम होतो. चयापचय क्रिया सामान्य ठेवण्यासाठी शरीराचे तापमान नेहमी ३६ आणि ३७ अंश सेल्सियसदरम्यान ठेवणे आवश्यक आहे. शरीराचे तापमान नियंत्रणात राहिले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे की, कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होऊन हृदय वेगाने शरीराला रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे ज्यांना हृदयाशी संबंधित काही त्रास असेल त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. अतिप्रमाणात घाम आल्यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाणही कमी होते. शरीरातील मिठाचे प्रमाण कमी झाल्यामुळे डोकेदुखी आणि मळमळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

उष्माघात म्हणजे काय?

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार उष्णतेच्या तीव्रतेशी निगडित जे आजार आहेत, त्यांना उष्माघात म्हटले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे, जेव्हा शरीराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे जाते आणि शरीरातील एक एक अवयवय निकामी होतात, ज्यामुळे रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची परिस्थिती निर्माण होते किंवा त्याचा मृत्यूही ओढवतो, अशा परिस्थितीला उष्माघात म्हटले जाऊ शकते.

हे ही वाचा >> उष्माघात टाळण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरू शकतात प्रभावी, शरीराला मिळेल आराम

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचा विभाग असलेल्या वैद्यकीय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरीर उच्च तापमानाचा सामना करत असताना आर्द्रतेचे प्रमाण वाढते, त्याच वेळी शरीराच्या हालचाली वाढल्या तर शरीराच्या आतील तापमान स्थिर राहत नाही, ज्यामुळे उष्माघाताचा त्रास जाणवू लागतो. उष्माघात हा एक गंभीर स्वरूपाचा धोकादायक आजार असून ज्याचा मृत्युदरही अधिक आहे.

उष्माघाताची लक्षणे काय आहेत?

थकवा, झटका, ग्लानी, भूल, लक्ष न लागणे, स्मृतिभ्रंश, परिस्थितीचे आकलन न होणे आणि नीट बोलता न येणे ही उष्माघाताची काही लक्षणे आहेत. या लक्षणांसोबतच डोकेदुखी, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे किंवा स्नायूंमध्ये वेदना होण्यासारखी इतर गंभीर लक्षणेही दिसू लागतात.

उष्माघात आणि उष्णतेच्या थकव्यामध्ये काय फरक आहे?

जेव्हा शरीराचे तापमान १०४ फॅरनहाइट किंवा ४० अंश सेल्सियसपेक्षा वाढते, तेव्हा उष्माघाताचा प्रत्यय येण्यास सुरुवात होते. शरीराचे निर्जलीकरण (Dehydration)देखील या वेळी होण्यास सुरुवात होते. वेगवेगळ्या अहवालांनुसार शुद्ध हरपणे किंवा चक्कर येणे हे उष्माघाताचे पहिले लक्षण असल्याचे मानले जाते.

या अवस्थेमुळे तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, निद्रानाश, उष्णतेमुळे त्वचा कोरडी पडणे, स्नायू दुखणे, मळमळ, उलट्या असे त्रासही होऊ शकतात. तसेच श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे, हृदयाचे ठोके वाढणे, वर्तनात बदल होऊन संभ्रमावस्था निर्माण होणे किंवा शुद्ध हरपण्यासारखी परिस्थिती निर्माण होते.

उष्माघात आणि उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याची लक्षणे जरी सारखीच असली तरी त्याचे परिणाम वेगवेगळ्या स्वरूपांचे होतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वरील लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये दिसू लागताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे भाग आहे. उष्णतेमुळे थकवा जाणवत असेल तर अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी थंड जागेत नेऊन बसवावे. त्या व्यक्तीच्या शरीरापर्यंत मोकळी हवा पोहोचू द्यावी, यामुळे शरीर थंड पडण्यास मदत होते. थंड पाण्याने कपडा ओला करून, त्याने पुसून घेतल्यास शरीराचे तापमान नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच थंड पाण्याने टॉवेल ओला करून अशा व्यक्तीच्या गळ्यावरून खांद्यावर टाकल्यास किंवा ओलसर कापड डोक्यावरून घेतल्यास थोड्या वेळातच आराम मिळतो, असा सल्ला मायो क्लिनिकने दिला आहे.

उष्माघात कसा टाळता येईल?

  • उष्माघात टाळण्यासाठी तीव्र उन्हापासून स्वतःला लांब ठेवावे आणि सतत पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेत राहावेत. ज्यामुळे उष्णतेच्या झळांमुळे उद्भवणारे त्रास टाळता येतील.
  • डिहायड्रेशन टाळण्यासाठी शक्य तितके पाणी प्यावे. त्यासोबतच लिंबू सरबत, ताक, भाताची पेज किंवा लस्सी यांसारखे द्रव पदार्थ घ्यावेत. दिवसाच्या ज्या वेळेत उन्हाची तीव्रता जास्त असते, त्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे.
  • भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात तहान लागल्यासारखे वाटत नसले तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे.
  • शरीराला द्रव पदार्थाचा पुरवठा करत असतानाच अंगावर हलक्या वजनाचे आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घालावेत. थेट उन्हापासून संरक्षण मिळविण्यासाठी टोपी, हलक्या रंगाचा स्कार्फ किंवा ओढणी आणि छत्री वापरावी.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is heatstroke how can prevent from heat stroke its symptoms causes treatment kvg
Show comments