वेगाने घोडदौडीसह स्वप्नवत साम्राज्यविस्तार साधणाऱ्या अदानी समूहाची चाल हिंडेनबर्ग रिसर्चच्या गैरव्यवहार आणि लबाडीचा आरोप करणाऱ्या अहवालानंतर मंदावली होती. मात्र भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि न्यायालयाने अदानी समूहात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचे जाहीर केल्यावर समभाग वधारले आहेत. आता हिंडेनबर्ग रिसर्चने सेबी अध्यक्षा माधबी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांच्यावर नव्याने आरोप केले आहेत. ते नेमके काय आहेत हे जाणून घेऊया…

हिंडेनबर्ग रिसर्चचे सेबी अध्यक्षांवर आरोप काय?

हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधबी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांनी अदानी समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित परदेशी संस्थांमध्ये भागीदारी केली होती असा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या ताज्या खुलाशानुसार, माधबी आणि धवल बूच यांनी परदेशात बर्म्युडा आणि मॉरिशस येथील अदानीशी संबंधित कंपन्यांमध्ये भागीदारी केली होती.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
donald trump, US president, narendra modi
विश्लेषण : ‘फिर एक बार ट्रम्प सरकार’… भारताशी संबंध कसे? मोदी ‘कनेक्ट’चा किती फायदा?

हेही वाचा >>>‘मुलांना जन्म देण्याऐवजी पाळीव प्राणी बरे’; ‘या’ देशात वाढतोय पाळीव प्राण्यांचा ट्रेंड, कारण काय?

आरोपात नेमके काय म्हटले आहे? 

माधबी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांची गुंतवणूक गौतम अदानी यांचा मोठा भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये होती. विनोद अदानी यांच्याशी संबंधित कंपन्यांनी पुढे अदानी समूहात गुंतवणूक करून समभागांच्या किमती गैरमार्गाने फुगवल्या. बूच यांच्या हितसंबंधांमुळे सेबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सेबीच्या निष्पक्षतेच्या भूमिकेवरदेखील बोट ठेवण्यात आले आहे. शिवाय अदानी समूहावर सेबीने कोणतीही कारवाई न करणेदेखील संशयाच्या दृष्टीने बघितले जात असल्याचे हिंडेनबर्गने म्हटले आहे. अदानी समूहामध्ये परदेशी संस्थांकडून करण्यात आलेली गुंतवणूक घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होते. शिवाय बूच यांचे वैयक्तिक स्वारस्य आणि त्यामुळे सेबीने घेतलेली भूमिका याबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. शिवाय अदानी समूहाची आणखी वरच्या स्तरावर तपासाची गरज असल्याचे हिंडेनबर्गने नमूद केले आहे.

कोणते आरोप करण्यात आलेत?

माधबी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांनी विनोद अदानी चालवत असलेल्या बर्म्युडा आणि मॉरिशसस्थित कंपन्यांमध्ये गुप्त भागीदारी केली. 

माहितगार जागल्याच्या दस्तऐवजानुसार, बूच दाम्पत्याने ५ जून २०१५ मध्ये सिंगापूरमध्ये प्रथम त्यांचे खाते आयपीई प्लस फंड वनमध्ये उघडले. अहवालात असा दावा करण्यात आला की, या परदेशातील फंडाची स्थापना अदानी संचालक असलेल्या आणि संपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करत असलेल्या इंडिया इन्फोलाइनने केली होती आणि ती ‘टॅक्स हेवन’ मॉरिशसमध्ये नोंदणीकृत आहे. हाच निधी गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी हे समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी वापरत असल्याचे हिंडेनबर्गच्या अहवालात म्हटले होते.

अमेरिकी कंपनीला मदत केल्याचा दावा काय?

 सेबीमध्ये २०१९ मध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून माधबी बूच यांच्या कार्यकाळात त्यांचे पती न्यूयॉर्क शहरात असलेल्या अमेरिकी पर्यायी गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी, ब्लॅकस्टोनमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले. अहवालानुसार, कंपनी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट अर्थात रिट्समधील सर्वात मोठी गुंतवणूकदार आणि प्रायोजकांपैकी एक आहे, जो भारतात नुकताच एक नवीन मालमत्ता वर्ग म्हणून उदयास आला आहे.

धवल बूच यांच्या लिंक्डइन खात्याचा हवाला देत, हिंडेनबर्ग यांनी असा युक्तिवाद केला की, गेल्या दोन दशकांमध्ये त्यांनी कधीही फंडासाठी, गृहनिर्माण क्षेत्रात (रिअल इस्टेट) किंवा भांडवली बाजारातील कंपनीमध्ये काम केले नाही. या क्षेत्रांतील अनुभवाचा अभाव असूनही, ते ब्लॅकस्टोन या जागतिक कंपनीमध्ये जुलै २०१९ मध्ये ‘वरिष्ठ सल्लागार’ म्हणून सामील झाले. धवल बूच ब्लॅकस्टोनमध्ये वरिष्ठ सल्लागार असताना, आणि माधबी बूच सेबीमध्ये अधिकारी असताना, ब्लॅकस्टोन प्रायोजित माइंडस्पेस आणि नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट, या आयपीओंना सेबीची मान्यता मिळाली. तसेच ब्लॅकस्टोन प्रायोजित पहिल्या रिट्स फंडाला १ एप्रिल २०१९ रोजी मान्यता दिली आणि तीन महिन्यांनंतर धवल बूच जुलै २०१९ मध्ये ब्लॅकस्टोनमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून दाखल झाले, असा दावा हिंडेनबर्गने केला आहे.

हेही वाचा >>>सुनीता विल्यम्स २०२५ पर्यंत अंतराळातच राहणार? कारण काय? अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाची योजना काय?

ब्लॅकस्टोनचे सल्लागार म्हणून धवल बूच यांच्या काळात, अहवालात असे म्हटले आहे की, सेबीने ब्लॅकस्टोनसारख्या खाजगी इक्विटी कंपन्यांना विशेषत: लाभ देणारे प्रमुख रीट नियमन बदल प्रस्तावित केले, मंजूर केले आणि सुलभ केले.

सेबीने हिंडेनबर्गला बजावलेल्या नोटिसीत काय?

सेबीने हिंडेनबर्गला २६ जून २०२४ रोजी ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आणि आरोप केला की, हिंडेनबर्गने आपल्या अहवालात जाणीवपूर्वक खळबळ उडवून दिली आणि आणि त्यांच्या अहवालात काहीही तथ्य नाही. अदानी कंपनी विरुद्ध ‘शॉर्ट बेट’ (म्हणजेच अदानी कंपनीचे शेअर गडगडले तर या ब्रोकर्सना नफा होणार होता) लावण्यासाठी हिंडेनबर्गने अमेरिकी हेज फंड किंग्डन कॅपिटल मॅनेजमेंटसोबत काम केल्याचेही या नोटिसीत उघड झाले आहे. मात्र हिंडेनबर्गने तात्काळ या नोटिसीला उत्तर दिले आणि आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले. त्याचबरोबर, हिंडेनबर्ग यांनी अदानी समूहाची चौकशी न केल्याबद्दल सेबीवर टीका केली.

हिंडेनबर्गच्या आरोपांवर बूच यांचे म्हणणे काय?

माधबी बूच आणि त्यांच्या पतीने दिलेल्या संयुक्त निवेदनात हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांचे ठामपणे खंडन केले. १० ऑगस्ट २०२४ रोजीच्या हिंडेनबर्ग अहवालात केलेल्या आरोपांच्या संदर्भात, त्या म्हणाल्या की, आरोप पूर्णपणे निराधार असून कोणतेही पुरावे समोर ठेवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आहेत. आमचे जीवन आणि आर्थिक व्यवहार हे एका खुल्या पुस्तकाप्रमाणे आहेत. सेबीच्या नियमानुसार आणि आवश्यकतेनुसार नियामक मंडळाकडे अनेक वर्षांमध्ये आधीच सर्व माहिती वेळोवेळी सादर केली गेली आहे. शिवाय आवश्यकता भासल्यास कोणत्याही सरकारी संस्था किंवा प्राधिकरणाकडे आमची आर्थिक माहिती उघड करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही. आतापर्यंत केलेले सर्व व्यवहार पारदर्शकतेने केले आहेत. मात्र सेबीने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीस आणि कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हिंडेनबर्गने हा ‘चारित्र्यहननाचा प्रयत्न’ केला आहे. 

हिंडेनबर्गचे अदानी समूहाबाबत काय आरोप होते?

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहातील कंपन्यांविषयी हिंडेनबर्ग रिसर्चच्या १०६ पानी अहवालात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. अदानी समूहातील कंपन्यांनी भांडवली बाजारात आपल्या समभागांचे भाव फुगवल्याचा दावा या अहवालात करण्यात आला होता, तसेच अदानी समूहाने बोगस कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोपही हिंडेनबर्गने केला. कंपनीने क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले असून, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने समभागांचे मूल्य फुगवून दाखवले, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता.