आजच्या स्पर्धात्मक काळात हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, ओव्हर वर्क असे शब्द आता नेहमीच कानावर पडत असतात. कार्यालयात जागेवर बसून करता येणाऱ्या कामामध्ये अधिकाधिक तास काम करत राहण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्याला ओव्हर वर्क असे नाव दिले जाते. यश मिळवायचे असेल तर अधिकाधिक वेळ काम करण्याशिवाय पर्याय नाही, असेही मालकवर्ग सांगत असतो. पण यातून नेमके काय साध्य होते? याच विषयावर सध्या ट्वीटरवर जोरदार चर्चा छेडली गेली आहे. विषय नेहमीचाच असला तरी त्याला कारण बनले हार्दिक पांड्या यांचे ट्विट. अनॲकडमीचे वरिष्ठ उपाध्यक्ष असलेल्या हार्दिक पांड्या यांनी ट्विटरवर “हार्ड वर्क” या शीर्षकाखाली एक पत्र पोस्ट केले. या पत्रामुळे ट्वीटरवर अधिकतास काम करण्याचे फायदे आणि तोटे यावर वादविवाद रंगले आहेत. यातच हॅसल कल्चर (Hustle Culture) शब्द पुढे येतो, ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
हार्दिक पांड्या यांनी आपल्या पत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ कठोर परिश्रम आणि आपल्या ड्युटीचे तास भरणे एवढेच पुरसे नसल्याचे म्हटले आहे. पांड्या यांच्या एकून पत्राच्या आशयाचा प्रतिवाद करत असताना सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर कुशा कपिला यांनी ओव्हर वर्किंग ज्याला आता हॅसल कल्चर (Hustle Culture) म्हटले जाते, याचा विरोध केला आहे. त्या म्हणाल्या, “२०१६ पासून ओव्हर वर्किंग किंवा अधिकाधिक तास एका जागेवर बसून काम करत असल्यामुळे माझ्यामध्ये नैराश्य आणि ADHD (अतिचंचलता किंवा कोणत्याही कामात एकाग्रता न उरणे) सारखे आजार बळावले. हॅसल कल्चरमुळे कामाच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनाची इतर कल्पना नष्ट झाली. हॅसल कल्चरमुळे तुम्हाला व्यावसायिक लाभ होत असेलही पण त्यामुळे शरीराचा बर्न आऊट खूप होतो.”
हल्ली आंत्रप्रन्योर (Entrepreneurship) आणि स्टार्टअप संस्कृतीच्या उदयानंतर अनेकजण हॅसल कल्चरला जवळ करत आहेत. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करते, असे अनेकांना वाटत. इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि ट्वीटर सारख्या सोशल मीडियावर हल्ली जीवनसैली आणि मोटिव्हेशनल स्पीकर ढिगाने आढलून येतात. ते रोजच्या रोज मोटिव्हेशनला व्हिडीओचा रतीब घालत असतात. यामध्ये त्यांनी ‘उठा आणि कामाला लागा’ या तत्त्वज्ञानाचा प्रचार केलेला दिसतो. अनेकांचा सांगण्याचा उद्देश असतो की, दिवसाचे १८ तास राबा म्हणजे काम करा, सकारात्मक दृष्टीकोन टेवा आणि कधीच मागे हटू नका, तरच तुम्ही इच्छित स्थळी पोहचू शकाल.
हे वाचा >> मनोमनी : बर्न आऊट
हॅसल कल्चरचे अनेक तोटे देखील समोर आले आहेत. अनेक अभ्यासानुसार असे लक्षात आले की, ओव्हर वर्कमुळे कमी वयात होणारा बर्न आऊट तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यालादेखील मोठा धक्का पोहोचत आहे. अनेकांना असे वाटते की हॅसल कल्चर ही मोठ्या कंपन्या आणि भांडवलदारांनी निर्माण केलेली एक युक्ती आहे. या युक्तीमुळे त्यांना कर्मचाऱ्यांना अधिकाधिक कामासाठी जुंपता (प्रेरणा देण्यात येते) येते. ज्यामुळे भांडवलदारांना पगारावर किंवा कर्मचारांना सामाजिक सुविधा देण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत नाहीत.
हॅसल कल्चर म्हणजे काय?
हॅसल (Hustle) हा शब्द डच भाषेतील Husselen या शब्दापासून तयार झाला. Husselen चा अर्थ होतो झटकने किंवा नाणेफेक करणे. इंग्रजी शब्दकोशाचा भाग बनत असताना या शब्दाचे वेगवेगळे अर्थ अभिप्रेत होत गेले. मेरीम-वेबस्टरच्या म्हणण्यानुसार गर्दी करणे, बळजबरीने ढकलणे किंवा मग फसवणूक करून पैसे मिळवणे. असे अनेक अर्थ काढण्यात आले. परंतु १९ व्या आणि २० व्या शतकाच्या अखेरीपर्यंत हॅसल शब्दाला कठोर परिश्रम या अर्थाने वापरणे सुरू झाले. एनपीआरने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार, १९१४ साली शिकागो डिफेंडर या आफ्रिकन-अमेरिकन वर्तमानपत्राने एक जाहीरात प्रसिद्ध केली होती. ज्यात त्यांनी लिहिले होते, “वर्तमानपत्र वितरित करणे हे जागृत मुलासाठी अगदी सोपे काम आहे, फक्त त्याने थोडे कठोर परिश्रम (Little Hustle) घ्यावेत.”
याचवेळेला अमेरिकेत हा शब्द आळशीपणा आणि काळेपणासाठी वापरण्यात येऊ लागला. आफ्रिकन अमेरिकन लोक एखाद्या कामात अपयशी ठरल्यानंतर त्यांना कठोर परिश्रम (Hustle) कसे येत नाही किंवा ते कसे आळशी आहेत, याबद्दलही हा शब्द वापरण्यात आला. कालांतराने अमेरिकन कृष्णवर्णीय संस्कृतीने या शब्दाला आपलेसे केले. कृष्णवर्णीय कलाकार, विशेषतः रॅपर्सनी या शब्दाला घेऊन गाणी तयार केली. त्या गाण्यातून स्वःच्या विकासाची मांडणी करण्यात आली.
कालांतराने व्यापारी संस्थांना या शब्दाची भुरळ पडली. यातून त्यांना कर्मचाऱ्यांकडून कमी पगारात अधिक काम करून घेण्याची नामी कृप्ती दिसू लागली. यासाठी पुढे बड्या कंपन्यांनी हा शब्द उचलून त्याची कृष्णवर्णीय लोकांशी असलेला संबंध तोडून टाकला. जो शब्द कृष्णवर्णीय लोकांना जगण्याची, झगडण्याची प्रेरणा देत होता, तो शब्द आता कॉर्पोरेट संस्थांना व्यावसायिक यश सुनिश्चित करण्याचा मंत्र बनला.
बेलारूस-अमेरिकन उद्योजक गॅरी वायनरचुक यांनी २०१० साली हा शब्द पुन्हा वापरला. गॅरी यांनी अनेक स्वः मदत पुस्तके लिहिली असून सतत काम करत राहण्याच्या मानसिकतेला ते यशाचे गमक असल्याचे सांगतात. त्यांच्यामते, हॅसलिंग (hustling) म्हणजेच दिवसाचे २० तास एकावेळी अनेक काम करत राहणे. हॅसलिंग हे फक्त जगण्यासाठी नव्हे तर आपण निश्चित केलेल्या गौरवाच्या पदापर्यंत पोहोचण्याचा समानअर्थी शब्द आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या एका पुस्तकात गॅरी लिहितात, “सकाळी सर्वांच्या आधी उठा आणि रात्र संपेपर्यंत काम करा. म्हणजेच हॅसल”
हॅसल शब्द अधिक वेळ काम करण्याच्या कार्यशैलीशी जोडला गेल्यानंतर सोशल मीडियावर देखील या शब्दाला चालना मिळाली. #ThankGodIt’sMonday आणि #riseandgrind सारखे हॅशटॅग वारंवार ट्रेंड होत असतात. एलॉन मस्क सारखा लोकप्रिय उद्योगपती देखील आठवड्याचे ८० तास काम करत असल्याची बतावणी करतो. पेप्सिको कंपनीच्या माजी प्रमुख इंद्रा नूई सांगतात की, कंपनी चालवत असताना त्या कधीही चार तासांपेक्षा अधिक झोपल्या नाहीत. दरम्यान हल्ली लोकांनी हॅसल कल्चर या शब्दाचा संबंध “परफॉर्मेटिव्ह वर्कहोलिझम” जोडला असून त्या परिप्रेक्ष्यात हॅसल कल्चरकडे पाहिले जाते.
हॅसल कल्चर दिर्घकाळ टीकू शकते?
एनपीआरच्या रिपोर्टनुसार, पदोन्नती मिळवण्यासाठी कार्यालयात उशीरापर्यंत थांबणे, तसेच कामाच्या ताणामुळे लघुशंकेसाठी जाण्यासही टाळाटाळ करणे, असे प्रकार आरोग्यसाठी घातक ठरू शकतात. या रिपोर्टनुसार आणखीही काही अभ्यासकांनी हॅसल कल्चरचे तोटे लक्षात आणून दिले आहेत. अधिक तास काम करत राहिल्यामुळे प्रकृती स्वास्थ्यास धोका निर्माण होऊ शकतो.
२०११ मध्ये जागतिक आरोग्य संघनटा (WHO) आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) या दोन्ही संस्थांनी संयुक्तरित्या प्रकाशित केलेल्या अहवालानुसार एक दशलक्षमधील तीन चतुर्थांश लोक अधिकाधिक तास एका जागी बसून काम करत असल्यामुळे इस्केमिक हृदयरोग (ज्याला कोरोनरी हृदयविकार म्हणूनही ओळखले जाते) आणि स्ट्रोकमुळे मृत्यू पावत आहेत. यामध्ये आठवड्याचे ५५ तास काम किंवा त्याहून अधिक तास काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. बीबीसीच्या मतानुसार, मलेरियापेक्षाही एका जागी बसून ओव्हर वर्क केल्यामुळे जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. हे जागतिक आरोग्य संकट आहे. ज्याकडे व्यक्ती, कंपन्या आणि सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. जर वेळीच ही समस्या सोडवली नाही तर हे संकट फक्त सूरू राहणार नसून भविष्यात याचा धोका आणखी वाढेल, याकडेही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाने लक्ष वेधले आहे.
डेलॉईट या कंपनीनेदेखील यावर एक संशोधन केले. ज्यामध्ये एक हजार अमेरिकन प्रोफेशनल्सचा समावेश होता. त्यापैकी ७७ टक्के लोकांना त्यांच्या कामामुळे बर्न आऊटचा त्रास होत होता, तर ४२ टक्के लोकांना बर्न आऊटमुळे नोकरी सोडून द्यावीशी वाटत होती. फोर्ब्स मासिकाने नमूद केले की, हॅसल कल्चरमुळे अवाजवी अपेक्षांचा अतिरेक आणि अधिक तास काम करण्याच्या आग्रहामुळे अनेकांना मानिसक आणि भावनिक तणावाचा सामना करावा लागत आहे.
ही चर्चा सुरू असताना विविध क्षेत्रातील जाणकार आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांनी काम आणि आरोग्य यांचे संतुलन राखण्याचा सल्ला दिला आहे. कठोर परिश्रम करण्याशिवाय पर्याय नाही, हे सर्वांनाच मान्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की न थांबता लगातार हे काम करतच राहिले पाहीजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी थोडी विश्रांती आणि विरंगुळा गरजेचा आहे.
करोना विषाणूच्या महामारीनंतर जगभरात कामाशी संबंधित अनेक बदल झाले आहेत. एप्रिल २०२१ मध्ये लिंक्डिनने (LinkedIn) त्यांच्या ५० हजाराहून वापरकर्त्यांचे दोन आठवडे सर्वेक्षण केले. त्यामध्ये ५० ते ४५ टक्के लोकांनी सांगितले की, महामारीनंतर कामाचे तास आणि कार्यालयात जाऊन काम करण्याच्या लवचिकतेमुळे त्यांना काम आणि खासगी आयुष्यात संतुलन राखण्यास मदत झाली आहे.