दिवाळीच्या निमित्ताने बऱ्याच प्रमाणात गोडधोड पदार्थ खाल्ले जातात. इतकेच नाही तर पारंपरिकरित्या जे पदार्थ घरी तयार केले जात होते, त्यांना पर्याय म्हणून बाजारातले पदार्थ खरेदी केले जातात. बाजारात मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टी खराब असतात असे बिलकुल नाही. परंतु, आपण जे खात आहोत, ते आपल्या जीवावर तर बेतणार नाही ना… याचीही खबरदारी घेणे आपलीच जवाबदारी आहे. बाजारात मिळणारे अनेक पदार्थ हे तूप किंवा लोण्याचा वापर करून तयार करण्यात आले आहेत असे सांगितले जाते आणि त्याच विश्वासावर आपण ते पदार्थ खरेदीही करतो. परंतु या पदार्थांमध्ये हायड्रोजनेटेड तेल वापरलेले असते. अन्नपदार्थांचे शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हायड्रोजनेटेड तेल वापरताना साखर आणि मिठाची जास्त प्रक्रिया केलेली असते. हायड्रोजनेटेड तेल आंशिक किंवा पूर्णपणे हायड्रोजनयुक्त अशा दोन स्वरूपात येते. तज्ज्ञांच्या मते हायड्रोजनेटेड तेल सुरक्षित नाही. अन्न पदार्थातून या तेलाचा वापर कमी केल्यास दरवर्षी हजारोंच्या संख्येने वाढत असलेल्या हृदय विकाराच्या घटना टाळता येतील. म्हणूनच हायड्रोजनेटेड तेल म्हणजे काय?, त्याचे प्रकार किती?, कृत्रिम ट्रान्स फॅट खराब का आहे? आणि अन्न उत्पादक खाद्यपदार्थांमध्ये हायड्रोजनेटेड तेल का वापरतात हे सविस्तर जाणून घेणे गरजेचे ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हायड्रोजनेटेड तेल म्हणजे काय?

थोडक्यात आणि भारतीयांना समजेल अशा भाषेत सांगावयाचे झाले तर ‘डालडा’ हा हायड्रोजनेटेड तेलाचा प्रकार आहे. हायड्रोजनेटेड तेल हा चरबीतून मिळणाऱ्या तेलाचा एक प्रकार आहे. ज्याचा वापर अन्न उत्पादक पदार्थ अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी करतात. हायड्रोजनेशन ही एक शुद्धीकरण प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेत उत्पादक द्रव चरबीमध्ये हायड्रोजन सोडतात, ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी वनस्पती तेलाचे म्हणजेच डालड्याचे उदाहरण उत्तम ठरू शकते. वनस्पती तेल हे वातावरणीय नियमित तापमानाला घन चरबीमध्ये परिवर्तित करण्यासाठी या प्रक्रियेचा वापर केलेला असतो. या प्रक्रियेनंतर तेलाचे ऑक्सिडीकरण होत नाही, त्यामुळे हे तेल जास्त काळासाठी टिकून राहते.

अधिक वाचा: Diwali 2023: दिवाळीत फटाके वाजविणे ही खरंच भारतीय प्राचीन परंपरा आहे का? 

हायड्रोजनेटेड तेलाचे दोन प्रकार

या हायड्रोजनेटेड तेलाचे दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार म्हणजे अंशतः हायड्रोजनेटेड तेल (ट्रान्स फॅट) आणि दुसरा म्हणजे पूर्णपणे हायड्रोजनेटेड तेल. उत्पादक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये अंशतः हायड्रोजनेटेड वापरले जाते. बाजारात मिळणारे भाजलेले, फ्रॉस्टिंग, कॉफी क्रीमर, फराळाचे पदार्थ यात कृत्रिम ट्रान्स फॅट वापरले जाते. अंशतः हायड्रोजनेटेड तेलाच्या तुलनेत पूर्ण हायड्रोजनेटेड तेल कमी हानिकारक असते, तरीही त्याचा सातत्याने होणारा वापर टाळणे गरजेचे आहे. कारण हे तेल वापरलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि मिठाचा वापर केलेला असतो.

हायड्रोजनेटेड तेलाचा वापर

अन्न उत्पादक संरक्षक म्हणून हायड्रोजनेटेड तेल वापरतात. याशिवाय खर्च कमी करणे, पदार्थ जतन करणे, पोत वाढवणे, चव वाढवणे इत्यादी कारणांचाही समावेश होतो.

हायड्रोजनेटेड तेलाचे दुष्परिणाम

हायड्रोजनेटेड तेल, विशेषतः अंशतः हायड्रोजनेटेड तेलाचे अनेक दुष्परिणाम आहेत. या तेलाचा अतिरिक्त वापर एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो. ट्रान्स फॅट लोकांचे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्ट्रॉल वाढवू शकते. यालाच “खराब कोलेस्टेरॉल” असेही म्हणतात. उच्च LDL कोलेस्टेरॉल पातळीमुळे एखाद्या व्यक्तीला हृदयरोग होण्याचा धोका वाढतो, किंबहुना अमेरिकेसारख्या देशामध्ये हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. तसेच ट्रान्स फॅट उच्च-घनता लिपोप्रोटीन (HDL) कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करू शकते. HDL हे “चांगले कोलेस्ट्रॉल” म्हणून ओळखले जाते. एलडीएल कोलेस्टेरॉलमध्ये वाढ आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे व्यक्तीला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. ‘ट्रान्स फॅटचे सेवन केल्याने त्यांच्यामध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढण्याचा धोका वाढतो’, असे ४०० पेक्षा जास्त महिलांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे.

अधिक वाचा: पांडव-कौरव नाही तर ‘हे’ होते महाभारताच्या युद्धाला कारणीभूत?

सारांश

अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी हायड्रोजनेटेड तेल असते. हायड्रोजनेटेड तेलाचे दोन प्रकार आहेत, आंशिक आणि पूर्णपणे हायड्रोजनयुक्त. अंशतः हायड्रोजनेटेड तेलामध्ये ट्रान्स फॅट असते. ट्रान्स फॅट हा खाण्यासाठी सर्वात वाईट प्रकारचा मेदाचा प्रकार मानला जातो. इतर आहारातील मेदाच्या विरुद्ध, ट्रान्स फॅट्स ज्याला ट्रान्स-फॅटी ऍसिड देखील म्हणतात ते “खराब” कोलेस्ट्रॉल वाढवते आणि “चांगले” कोलेस्ट्रॉल कमी करते. ट्रान्स फॅट्सने भरलेला आहार हृदयविकाराचा धोका वाढवतो, जो प्रौढांसाठी अधिक मारक आहे. आहारातील जास्त ट्रान्स फॅट्सचे प्रमाण हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार निर्माण करतात. म्हणूनच अनेक देशांमध्ये ट्रान्स फॅट्सच्या वापरावर मर्यादा किंवा बंदी घालण्यात आली आहे. उत्पादक आपला खर्च वाचविण्याकरिता हायड्रोजनेटेड तेल वापरतात. असे पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत, असे तज्ज्ञ सांगतात. लोकांनी ते टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हायड्रोजनेटेड तेल टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे हाच होय.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is hydrogenated oil and is it safe svs
Show comments