तबला उस्ताद झाकिर यांचे रविवारी अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को येथे निधन झाले. त्यांचा मृत्यू इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिस या आजारामुळे झाला आहे. त्यामुळे या आजाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा फुप्फुसाचा आजार असून, तो फुप्फुसांच्या ऊतींवर गंभीर परिणाम करतो. या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी औषधोपचार आहेत; मात्र, कोणताही कायमस्वरूपी उपाय सध्या तरी उपलब्ध नाही. या आजाराचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे त्याला इडिओपॅथिक म्हणजेच मूळ माहिती नसलेला आजार असे म्हटले जाते. संशोधक या आजाराचे मूळ अद्याप शोधत आहेत.
आजारात नेमके काय घडते?
फुप्फुसाशी निगडित इतर आजारांपेक्षा हा आजार वेगळा आहे. यात फुप्फुसातील हवेच्या छोट्या आकाराच्या पिशव्यांभोवतीच्या इंटरस्टिटीअम ऊतींना हा आजार लक्ष्य करतो. यामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्याची प्रक्रिया अवघड बनते. हवेतील धूळ, धूर अथवा संसर्गामुळे फुप्फुसाला इजा होते. त्या वेळी शरीर आपोआप इजा झालेल्या ऊती दुरुस्त करते. इतर आजारांमध्ये ही प्रक्रिया योग्य पद्धतीने होते. मात्र, या आजारात ही प्रक्रिया अनियमित असते. शरीर कोलॅजन आणि इतर फायब्रस पदार्थ जास्त प्रमाणात तयार करते. यातून फुप्फुसाची झालेली हानी भरून निघण्याऐवजी ती आणखी वाढते. हे सर्व नेमके कसे घडते, हे अद्याप उलगडलेले नाही. संशोधक याचीही नेमकी प्रक्रिया शोधत आहेत.
हे ही वाचा… Intermittent Fasting : इंटरमिटंट फास्टिंगमुळे केस गळण्याचं प्रमाण का वाढतंय?
लक्षणे कोणती?
इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिस या आजारात फुप्फुसातील ऊतींना इजा झाल्याने त्यातून फुप्फुस जाड आणि कठीण बनते. यामुळे त्याची विस्तारण्याची आणि ऑक्सिजन आतमध्ये घेण्याची क्षमता कमी होते. त्यातून रुग्णाला श्वसनास त्रास, थकवा, कोरडा खोकला, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. आजार झाल्यानंतर हळूहळू शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावते. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयक्रिया बंद पडणे अथवा श्वसन क्रिया बंद पडणे असे गंभीर दुष्परिणाम उद्भवतात.
सर्वाधिक धोका कोणाला?
प्रामुख्याने ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिस हा आजार आढळून येतो. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहेत. काही प्रकरणांमध्ये आनुवांशिकतेमुळे हा आजार आढळून येतो. सध्या धूम्रपान करणारे आणि आधी धूम्रपान करीत असलेले अशा दोघांनाही या आजाराचा धोका असतो. धूळ, लाकडाचा भुसा अथवा धातूच्या सूक्ष्म कणांच्या जास्त काळ संपर्कात असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
हे ही वाचा… गहू आणि खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार? कारण काय? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?
निदान कसे होते?
उच्च क्षमतेच्या सीटी स्कॅनच्या साहाय्याने इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिस या आजाराचे निदान होते. याचबरोबर श्वसनाशी निगडित चाचण्या आणि काही वेळा फुप्फुसाच्या बायोप्सी चाचणीतून निदान करता येते. फुप्फुसाशी निगडित इतर आजार रुग्णाला नाहीत, याची खातरजमा डॉक्टरांना सर्वप्रथम निदान करताना करावी लागते.
उपचार कसे होतात?
अँटीफ्रायब्रोटिक औषधांचा वापर इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिस या आजाराच्या रुग्णांसाठी केला जातो. त्यात पिरफेनायडोन आणि निन्टेडानिब ही औषधे दिली जातात. या औषधांमुळे आजाराचा वेग मंदावतो. याचबरोबर ऑक्सिजन थेरपी आणि फुप्फुसाचा व्यायाम आदी उपचारही केले जातात. रुग्णाची प्रकृती खूपच खालावली असेल आणि फुप्फुसाची खूपच हानी झाली असेल, तर फुप्फुस प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वेळीच निदान आणि त्या अनुषंगाने उपचार यामुळे या आजाराचा धोका कमी करता येतो.
sanjay.jadhav@expressindia.com