What is Instagram’s new Threads app : एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर मागच्या एका वर्षात ट्विटरमध्ये अनेक वेळा वेगवेगळे बदल करण्यात आले. ट्विटरची ब्ल्यू टिक विकण्यापासून ते ट्विटरच्या चिमणीच्या जागी बिटकॉईनचा लोगो देण्यापर्यंत मस्कने ट्विटरशी छेडछाड केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून गंभीरपणे ट्विटर वापरणारे असंख्य वापरकर्ते नाराज झालेले आहेत. ट्विटरच्या या स्थितीचा लाभ उचलण्यासाठी अनेक स्पर्धक कंपन्यांनी स्वतःची मायक्रोब्लॉगिंग ॲप्स सुरू केली. मात्र ‘ब्ल्यू स्काय’ वगळता एकाही ॲपला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही. भारतीय ‘कू’ ॲपलाही आपला प्रभाव टाकता आलेला नाही. आता सोशल मीडियाच्या क्षेत्रातील मातब्बर अशा मेटा कंपनीच्या इन्स्टाग्रामने स्वतःचे थ्रेड हे मायक्रोब्लॉगिंग ॲप लाँच केले आहे. ट्विटरच्या इतर स्पर्धकांपेक्षा थ्रेड वेगळे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा लेख लिहीपर्यंत इन्स्टाग्राम थ्रेड्सने ५५ दशलक्ष (५.५ कोटी) वापरकर्त्यांचा टप्पा विक्रमी वेळेत तर पार केलाच आहे, त्याशिवाय याने चॅटजीपीटीलाही मागे टाकले आहे. पहिल्या पाच दिवसांत थ्रेड्सवर कोट्यवधी वापरकर्ते सक्रिय झाले आहेत. थ्रेड्समध्ये कोणत्या सुविधा दिल्या आहेत, या नव्या प्लॅटफॉर्मबाबत जगभरात काय चर्चा केली जात आहे आणि लाँच होताच लक्षावधी वापरकर्त्यांनी थ्रेड्सला जवळ का केले? याचा घेतलेला हा आढावा…

हे वाचा >> मेटाने ‘Threads’ अ‍ॅप लॉन्च केल्यामुळे Twitter चं टेन्शन वाढणार; जाणून घ्या कसे डाउनलोड करायचे?

इन्स्टाग्राम थ्रेड्स म्हणजे काय?

थ्रेड्स ॲप हे इन्स्टाग्रामचेच दुसरे रूप आहे. फक्त यावर फोटो आणि व्हिडिओ कटेंटऐवजी मजकूर व संवादावर आधारित कटेंटला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. इन्स्टाग्राम अकाउंटच्या लॉगिन डिटेल्स वापरून थ्रेड्सवर अकाउंट बनवणे शक्य होणार आहे. थ्रेड्सवर गेल्यानंतर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता आणि तिथे सुरू असलेल्या चर्चांमध्ये सहभागी होऊ शकता. ‘इन्स्टाग्राम’मध्ये असलेले कमेंट सेक्शन थ्रेड्समध्येही देण्यात आले आहे; पण त्याचा ट्विटरप्रमाणे वापर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ट्विटरवर जसे एखाद्या ट्विटला रिप्लाय आणि रि-शेअरिंगचा करण्याचा पर्याय दिलेला असतो, तसाच पर्याय इथेही दिला आहे. तुम्ही थ्रेड्सवर ५०० कॅरेक्टरची पोस्ट लिहू शकता (ट्विटरवर ब्ल्यू टिक वगळता इतर लोकांना २८० कॅरेक्टरची मर्यादा आहे) तसेच इतर वेबसाइटच्या लिंक्स, १० फोटो व पाच मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ पोस्ट करू शकता. ट्विटरवर एका ट्विटसह केवळ चारच फोटो व २.२० मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट करण्याची परवानगी आहे. ‘थ्रेड्स’ने हा महत्त्वाचा बदल करून, ट्विटरच्या एक पाऊल पुढे टाकले आहे.

थ्रेड्स टाकल्यानंतर त्यामध्ये कोणतेही फेरफार, बदल करता येणार नाहीत. ट्विटरप्रमाणे थ्रेड्समध्ये हॅशटॅग आणि ट्रेडिंग सेक्शन दिलेले नाही.

‘इन्स्टाग्राम थ्रेड्स’वर साइनअप कसे कराल?

साइनअप प्रक्रिया अतिशय सोपी ठेवल्यामुळे ‘थ्रेड्स’ला सुरुवातीलाच मोठे यश मिळाले. इन्स्टाग्रामकडे सध्या २.३५ अब्ज एवढे वापरकर्ते आहेत. या वापरकर्त्यांना थ्रेड्सवर अकाउंट उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. वापरकर्त्यांची एवढी मोठी संख्या ट्विटरसाठी समस्या निर्माण करणारी आहे. ‘इन्स्टाग्राम’चे लॉगिन डिटेल्स वापरून ‘थ्रेड्स’वरही अकाउंट उघडण्याची सोय असल्यामुळे वैयक्तिक माहिती भरण्याचा किचकट प्राणायाम इथे करण्याची गरज नाही. ‘इन्स्टाग्राम’मध्ये भरलेली माहिती, फोटो, तुमचा बायो सर्व काही ‘थ्रेड्स’वर आपोआप लिंक केले जाणार आहे.

नोंदणीची प्रक्रिया अतिशय सोपी केल्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांतच उत्सुकतेपोटी लाखो वापरकर्त्यांनी थ्रेड्सवर जाण्याचा निर्णय घेतला. IOS च्या अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि Android वापरकर्त्यांसाठी गूगल प्ले स्टोअरवर ‘थ्रेड्स’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. भारतातही ‘थ्रेड्स’ डाऊनलोड करता येणार आहे. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यावर Log in With Instagram हा पर्याय येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर Import from Instagram बटणावर क्लिक केल्यानंतर काही क्षणांत तुमची सर्व माहिती ‘इन्स्टाग्राम’वरून ‘थ्रेड्स’वर दिसू लागेल.

हे ही वाचा >> युजर्सला ट्विट का पाहता येत नाहीत? एलॉन मस्कने ट्विटरवर केलेला नवीन बदल काय आहे?

‘थ्रेड्स’मध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी क्रमांकाचा रँक देण्यात येईल. तुम्ही या अ‍ॅपवर कधी सहभागी झालात, हे या रँकवरून कळणार आहे. हा रँक तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील युजर नेमच्या खाली देण्यात येईल; जेणेकरून इन्स्टाग्रामवरील तुमच्या फॉलोअर्सना तुम्ही थ्रेड्सवर असल्याचे कळू शकेल. ज्या वापरकर्त्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे, त्यांचे प्रोफाइल हे आपोआपच खासगी प्रोफाइल असल्याचे दाखविण्यात येईल.

इन्स्टाग्राम थ्रेड्स कसे वापरायचे?

जर तुम्ही ट्विटर वापरलेले असेल, तर थ्रेड्स वापरताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्ही इन्स्टाग्रामवरील तुमचे फॉलोअर्स थ्रेड्सवर आयात करण्याची परवानगी दिली, तर तुमच्या टाइमलाइनवर आधीपासूनच तुम्हाला त्यांचा मजकूर दिसू लागेल. तुम्ही त्यांच्या पोस्टवर व्यक्त होऊ शकता, तसेच स्क्रीनच्या तळाला असलेल्या पेन्सिल चिन्हावर क्लिक करून तुम्ही तुमची पोस्ट लिहू शकता. तुम्ही इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेले अनेक अकाउंट्स आधीपासूनच थ्रेड्सवर उपलब्ध झाले आहेत. जसे की, ‘लोकसत्ता’ आणि ‘द इंडियन एक्स्प्रेस’सारख्या बातम्यांसाठी प्राधान्यक्रम असलेले अकाउंट थ्रेड्सवर उपलब्ध आहेत.

इन्स्टाग्राम थ्रेड्स ट्विटरच्या विरोधात कसे?

ट्विटरच्या तुलनेत सध्या तरी इन्स्टाग्राम थ्रेड्स प्राथमिक पायरीवरच आहे. उदाहरणार्थ- ट्विटरवर सर्चचा पर्याय दिलेला आहे. तुम्ही काही कीवर्ड टाईप करून तिथे ट्विटस आणि ट्रेंडिंग विषय शोधू शकता. थ्रेड्सवर सध्या मजकूर सर्च करण्याचा पर्याय दिलेला नाही. इथे तुम्ही फक्त फॉलो करण्यासाठी लोकांना सर्च करू शकता. तसेच इन्स्टाग्राम आणि ट्विटरप्रमाणे एखादी पोस्ट इतरांना शेअर करण्याचा पर्याय अद्याप दिलेला नाही. म्हणजे ‘थ्रेड्स’ सध्या प्राथमिक स्तरावरच असून, त्यामध्ये पुढच्या काळात खूप बदल होतील, असे आता तरी दिसत आहे.

इन्स्टाग्रामवरील अब्जावधींची वापरकर्त्यांची संख्या ही थ्रेड्सची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्यासाठी हीच सर्वांत मोठी डोकेदुखी ठरू शकते. थ्रेड्सची कामगिरी चांगली राहिली, तर मात्र ट्विटरला धोका उद्भवू शकतो.

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आलेल्यांपैकी थ्रेड्स हे काही पहिले ॲप नाही. याआधी जॅक डॉर्सी यांनी ट्विटरचेच दुसरे रूप ‘ब्ल्यू स्काय’, प्रतिट्विटर म्हणून ओळखले जाणारे ‘मास्टोडोन’, ‘सबस्टॅक नोट्स’ आणि अशी इतर अनेक ॲप बाजारात आली. मात्र, वापरकर्त्यांची संख्या आणि ओळखीच्या लोकांचा तिथे वावर नसल्यामुळे वापरकर्त्यांना हे ॲप्स बांधून ठेवू शकले नाहीत. त्यामुळे अनेकांनी ट्विटरवरच राहणे पसंत केले. जेव्हा कोणतेही नवे सोशल मीडिया माध्यम सुरू होते, तेव्हा त्याचा वापर किती सुलभ पद्धतीने करता येऊ शकतो, ही बाब सर्वांत महत्त्वाची असते. ‘मास्टोडोन’सारख्या ॲपमध्ये अनेक तांत्रिक बाबी असल्यामुळे सामान्य वापरकर्त्यांनी त्याकडे पाठ फिरवली.

इनस्टाग्राम थ्रेड्स आणि गोपनीयता

इन्स्टाग्राम थ्रेड्स ॲपने गोपनीयतेशी संबंधित अनेक मुद्दे पुढे केले आहेत. ॲप डाऊनलोड केल्यानंतर अनेक प्रकारच्या परवानग्या ॲपला द्याव्या लागतात; ज्यामध्ये वापरकर्त्यांच्या वित्तीय माहितीसह संवेदनशील माहितीचा समावेश आहे.

डेटा लिक प्रकरण आणि वादांनी ग्रासलेल्या मेटा आणि फेसबुक कंपनीच्या पुढील ॲपवर विश्वास बसावा यासाठी ‘थ्रेड्स’ने आपल्या वापरकर्त्यांना आधीच विविध परवानग्यासंबंधीची माहिती दिली आहे; जेणेकरून वापरकर्त्यांचा विश्वास संपादन करता यावा.

‘थ्रेड्स’च्या निर्माणाचा इतिहास काय?

‘मेटा’ने आता लाँच केलेले ‘थ्रेड्स’ ॲप काही वापरकर्त्यांना ओळखीचे वाटू शकते. कारण- मेटाने २०१९ साली थ्रेड्स या नावाने आपले जुने ॲप लाँच केले होते. इन्स्टाग्रामला आणखी एक पर्याय म्हणून हे ॲप लाँच केले गेले होते. ‘कॅमेरा फर्स्ट’ अशी टॅगलाईन असलेले हे मेसेजिंग ॲप होते. ॲपपवर स्टेटस अपडेट करणे, मित्रांशी गप्पा मारण्यासारख्या सुविधा दिल्या होत्या; मात्र डिसेंबर २०२१ पासून हे ॲप बंद करण्यात आले. परंतु, आता ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स ॲप पुन्हा एकदा स्वरूप बदलून लाँच करण्यात आले आहे.

थ्रेड्सची पुढील वाटचाल कशी राहील?

‘मेटा’चे प्रॉडक्ट प्रमुख क्रिस कॉक्स यांनी जूनमध्ये झालेल्या कंपनीच्या बैठकीत ‘थ्रेड्स’बद्दलचे मत व्यक्त केले होते. ‘थ्रेड्स’चे नवे रूप अतिशय सुरक्षित, वापरण्यास सुलभ आणि वापरकर्त्यांना त्यांचा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यासाठी विश्वासार्ह व्यासपीठ प्रदान करीत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

‘मेटा’ने ॲक्टिव्हिटी पब (Activity Pub) या जागतिक सोशल नेटवर्किंग शिष्टाचाराच्या अधीन राहून ‘थ्रेड्स’ची निर्मिती केली आहे. ‘वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम’तर्फे (W3C) वेबवरील खुल्या उत्पादनावर संरक्षक म्हणून काम करण्याची जबाबदारी पार पाडली जाते. ॲक्टिव्हिटी पब हा W3Cने निर्माण केलेला शिष्टाचार आहे.

युरोपमध्ये ‘थ्रेड्स’ नाही

युरोपीय महासंघाचे ‘डेटा’ गोपनीयतेविषयीचे नियम कठोर असल्याने सध्या हे अ‍ॅप युरोपीय देशांत सुरू करण्यात आलेले नाही. युरोपमधील २७ देशांमध्ये हे अ‍ॅप नसेल, असे ‘मेटा’ने आयर्लंड येथील डेटा प्रायव्हसी कमिशनला कळवले आहे. जगभरातील १०० देशांत हे अ‍ॅप सुरू झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is instagrams new threads app and how is it taking on twitter kvg
Show comments