इराणने शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून सकाळपासून इस्रायलवर ३०० हून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू केले. पण त्यांतील ९९ टक्के क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इस्रायली भूमीवर आदळण्यापूर्वीच नष्ट केले गेले. या बचावात निर्णायक ठरली इस्रायलची आयर्न डोम ही क्षेपणास्त्ररोधक बचाव प्रणाली. इस्रायलचा दावा खरा असेल, तर बचाव यशाचे प्रमाण थक्क करणारे आहे. आयर्न डोम प्रणालीविषयी… 

घडले काय?

दोन आठवड्यांपूर्वी इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसमधील इराणी दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला करून इराणच्या तीन अतिवरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना ठार केले होते. या हल्ल्यात इतर चार लष्करी अधिकारीही मरण पावले. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे इराणने इस्रायलचे थेट नाव घेऊन लगेचच जाहीर केले. गेले तीन-चार दिवस इराण एखादा मोठा हल्ला परदेशातील इस्रायली आस्थापनांवर आणि इस्रायली भूमीवर करू शकेल अशा इशारा पाश्चिमात्य माध्यमे काही लष्करी गुप्तहेर यंत्रणांच्या हवाल्याने देत होत्या. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळी इराणकडून झालेला हल्ला अनपेक्षित नव्हता. इराणकडून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स इस्रायलच्या दिशेने डागली. ती किती होती, याविषयी एकवाक्यता नाही. इराणबरोबरच इराक, सीरिया, येमेन येथील इराणशी संलग्न दहशतवादी गटांनीही या हल्ल्यात सहभाग घेतल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. जवळपास ३००च्या आसपास क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इराण व इराण-समर्थक गटांनीने सोडले असावेत असा अंदाज आहे. यातील बहुतेक म्हणजे २००च्या आसपास इस्रायलने नष्ट केली. अमेरिकेनेही अनेक ड्रोन व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. तर ब्रिटन, फ्रान्स आणि काही प्रमाणात जॉर्डन यांनीही इस्रायलचे रक्षण केले. हल्ल्यांमध्ये १७० ड्रोन आणि ३० क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला गेला. यांपैकी एकही इस्रायलपर्यंत पोहोचू शकले नाही. याशिवाय ११० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर झाला, ज्यांपैकी काहींनी इस्रायली भूमीवर किरकोळ नुकसान केले, असे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले.  

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
gadchiroli bhamragarh Naxalite bomb blast
अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याआधी भामरागडमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
Jammu And Kashmir
Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील सैन्याच्या गोळीबारात ट्रेकर्स सापडले; गोळीबार थांबवत सैनिकांनी केली सुटका
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

हेही वाचा >>>विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?

हल्ल्यांचा उद्देश काय?

निव्वळ इस्रायलला दहशत दाखवणे इतपत मर्यादित उद्देश असावा, असे या घटनांवरून सध्या तरी वाटते. कारण इराणपासून इस्रायल किमान १००० किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत इराक, सीरिया आणि जॉर्डन हे देश येतात. दमास्कसमधील हल्ल्याबाबत इस्रायलने कोणताही दावा केलेला नाही. पण तो इस्रायलनेच केला असावा असे गृहित धरून इराणने, त्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे म्हटले आहे. इराण आणि इस्रायलमध्ये गेली अनेक वर्षे हाडवैर असले, तरी इस्रायली भूमीवर इराणकडून थेट हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ.   

इराण आणि इस्रायलचे हाडवैर…

१९७९मधील इस्लामिक क्रांतीपूर्वी इराण आणि इस्रायल हे मित्रदेश होते. पण इराणमध्ये धर्मसत्ता आल्यानंतर इस्रायलचे अस्तित्वच अमान्य करून ते इराणचे राष्ट्रीय धोरण ठरवण्यात आले. अरब राष्ट्रांपेक्षाही इराणचा इस्रायलविरोध कडवा आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही इराणचा काटा काढण्याची एकही संधी सोडलेली नाही. इराणचे अणुसास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी यांना छुप्या हल्ल्यांमध्ये ठार मारण्यात इस्रायलचा हात असल्याचे मानले जाते. सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टाइन, येमेनमधील हमास, हेझबोला, हुथी बंडखोरांना प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज करून त्यांच्यामार्फत इस्रायलला बेजार करण्याचे धोरण इराणनेही राबवले. इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि कड्स फोर्सचे कमांडर या मोहिमेत सक्रिय असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांतील वैर विकोपाला गेले. तशात गतवर्षी सात ऑक्टोबर रोजी हमासकडून इस्रायली भूमीवर झालेला हल्ला आणि त्यानंतर इस्रायलकडून गाझापट्टीत सुरू झालेले प्रतिहल्ले यांमुळे इराण-इस्रायल वैरभाव अधिकच चिघळला. 

हेही वाचा >>>इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?

ड्रोन सुसज्ज इराण… 

गेली काही वर्षे निर्बंधांमुळे व्यापार आणि उत्पन्न आक्रसलेल्या इराणने ड्रोननिर्मितीवर भर दिला असून, या क्षेत्रात बऱ्यापैकी मजल मारली आहे. ड्रोननिर्मितीला फार उच्च तंत्रज्ञानाची गरज नसते. पण इराणने मोठ्या संख्येने ड्रोननिर्मिती करून पश्चिम आशियातील शस्त्र समतोल बिघडवला असल्याचे अनेक विश्लेषक मानतात. दक्षिण अमेरिकी आणि आफ्रिकी देशांनंतर आता रशिया या ड्रोन्सचा मोठा ग्राहक बनला आहे. तसेच हुथी, हमास, हेझबोला या बंडखोरांहाती हे ड्रोन पुरवून इराणने त्यांचे उपद्रवमूल्य वाढवले आहे. अबाबिल, शाहेद हे इराणी ड्रोन संपूर्ण पश्चिम आशियात धास्तीचा विषय बनले आहेत. 

इस्रायली ‘आयर्न डोम’ने हल्ले कसे थोपवले?

बहुतेक हल्ले इस्रायलच्या आयर्न डोम क्षेपणास्त्र बचाव यंत्रणेने थोपवल्याचे बोलले जाते. लहान व मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांविरोधात इस्रायली भूमीचे रक्षण करण्याचे काम ही यंत्रणा करते. इस्रायलकडे झेपावणारे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याचे आयर्न डोमचे प्रधान उद्दिष्ट असते. येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वेध घेण्यासाठी रडारचा वापर केला जातो. क्षेपणास्त्र इस्रायली भूमीवर येणार की नाही, याविषयी आकडेमोड करून निर्णय घेण्याची क्षमता यंत्रणेमध्ये आहे. जी क्षेपणास्त्रे इस्रायलपर्यंत येणार नाहीत, त्यांना नष्ट करण्याच्या फंदात ही यंत्रणा पडत नाही. संपूर्ण इस्रायलमध्ये या यंत्रणेअंतर्गत छोटी क्षेपणास्त्र युनिट्स विखुरलेली आहेत. प्रत्येक युनिटकडे तीन-चार लाँचर असतात, ज्यातून २० क्षेपणास्त्रवेधी क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात. हे लाँचर स्थिर किंवा फिरते अशा दोन्ही प्रकारचे असतात. शत्रूकडून क्षेपणास्त्र डागले गेल्यानंतर रडार यंत्रणा उपग्रहातील माहितीच्या आधारे येणाऱ्या क्षेपणास्त्राचा मार्ग निर्धारित करते आणि गरज वाटल्यास क्षेपणास्त्र सोडून हवेतच शत्रूच्या क्षेपणास्त्राला नष्ट केले जाते. या संपूर्ण यंत्रणेला आयर्न डोम असे नाव दिले गेले. २००६मध्ये हेझबोलाकडून मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले झाल्यानंतर, आयर्न डोम विकसित करण्याचा निर्णय इस्रायलने घेतला. सुरुवातीस ती विकसित करण्यासाठी अमेरिकेची मदत घेण्यात आली. २०११मध्ये गाझा पट्टीतून हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यांविरोधात इस्रायलने पहिल्यांदा आयर्न डोम यंत्रणा वापरली. आयर्न डोमच्या यशाचे प्रमाण ९० टक्के आहे, असे मानले जाते. हमास आणि हेझबोला यांच्याकडून छोट्या आकाराची रॉकेट्स नेहमी सोडली जातात. त्यांच्या विरोधात आयर्न डोम भक्कम बचाव करते, असे इस्रायलचे म्हणणे आहे. आता हीच यंत्रणा इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांविरोधातही मोठ्या प्रमाणात वापरली गेली.