इस्रायलने १९६७ चे अरबांविरुद्धचे युद्ध जिंकून पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून जेरुसलेम या ऐतिहासिक शहरात इस्रायली देशभक्त दरवर्षी राष्ट्रध्वज मोर्चा काढतात. गुरुवारी इस्रायलींनी वार्षिक मिरवणूक काढल्यानंतर या भागातील पॅलेस्टाइन नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. दरवर्षी १९ मे रोजी इस्रायलकडून ‘जेरुसलेम दिन’ साजरा केला जातो आणि या उत्सवामुळे इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यामध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून येण्याची भीती व्यक्त केली जाते.
‘जेरुसलेम दिन’ म्हणजे काय?
दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र इस्रायल राष्ट्राची निर्मिती झाली. ही निर्मिती झाल्यानंतर १९६७ साली इस्रायल आणि शेजारी असलेल्या अरब राष्ट्रांमध्ये युद्ध पेटले. पूर्व जेरुसलेम आणि आसपासचा परिसर ताब्यात घेण्यासाठी हे युद्ध छेडले गेले होते. इस्रायल विरुद्ध इजिप्त, सीरिया, जॉर्डन, लेबेनॉन आणि आणि इराकचे सैन्य एकत्र आले होते. ज्यामध्ये इस्रायलचा ऐतिहासिक विजय झाला होता. या विजय दिवसाची आठवण करण्यासाठी दरवर्षी हजारो इस्रायली नागरिक या ठिकाणी एकत्र येतात.
हे वाचा >> विश्लेषण : ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’चा उदय!
युद्धानंतर इस्रायलने पूर्व जेरुसलेम स्वतःच्या ताब्यात ठेवलेला आहे. मात्र त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. जेरुसलेमची भूमी मुस्लीम, ज्यू आणि ख्रिस्ती लोकांसाठी पवित्र मानली जाते. पॅलेस्टाइनला पूर्व जेरुसलेम शहराला आपल्या देशाची राजधानी बनवायचे आहे. जेरुसलेम दिवसाच्या निमित्ताने ज्यूंकडून राष्ट्रध्वज हातात घेऊन मिरवणूक काढली जाते. जेरुसलेमच्या जुन्या शहरातून पवित्र भिंतीकडे ही मिरवणूक जात असते. या शहरात मुस्लीम, ज्यू आणि ख्रिस्ती लोकांची घरे आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ज्यूंची ही मिरवणूक ज्यूईश राष्ट्रवाद्यांचे शक्ती दाखविण्याचे एक प्रतीक बनले आहे. हे शहर आमचे आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतात, ज्यामुळे पॅलेस्टाइन नागरिकांना ही चिथावणी वाटते.
पॅलेस्टाइनमधील तणाव का वाढला?
मिरवणुकीच्या दिवशी इस्रायलकडून शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. जुन्या शहरातील छोट्या छोट्या गल्लीबोळात आणि पॅलेस्टाइन नागरिकांचे प्राबल्य असलेल्या दमास्कस गेट आणि मुस्लीम क्वार्टर परिसरातही सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येते. अरब दुकानदारांना बळजबरीने या दिवशी दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले जाते. काही काळापूर्वी या दिवशी वर्णद्वेषाला खतपाणी घालणारी कृती झाल्यानंतर हिंसा उसळली होती.
या परिसरात तणाव वाढण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे, ‘जेरुसलेम दिना’निमित्त मोठ्या प्रमाणात येणारे ज्यू यात्रेकरूंचे जत्थे. यामध्ये ज्यू लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती ‘अल-अक्सा’ मशिदीच्या आवारात असलेल्या ज्यूंच्या पवित्र भिंतीजवळ एकत्र येतात. मुस्लिमांसाठी मक्का आणि मदिनानंतर ‘अल-अक्सा’ हे तिसऱ्या क्रमाकांचे सर्वात पवित्र स्थळ आहे. ‘अल-अक्सा’ मशिदीच्या परिसरातील हा सोनेरी घुमट असलेले ‘टेम्पल माऊण्ट’ ज्यू धर्माचे पवित्रस्थळ आहे. ज्यू भाविक या देवळाकडे तोंड करून प्रार्थना करतात.
हे वाचा >> विश्लेषण : जेरुसलेममध्ये वसंत ऋतूत धार्मिक तणाव का वाढतो?
पॅलेस्टाइन नागरिकांचा आरोप आहे की, ज्यू यात्रेकरूंची भेट आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करून इस्रायल जेरुसलेममधील काही भागांवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. इस्रायल मशिदीच्या पवित्र वास्तूवर संपूर्ण दावा सांगेल किंवा तटबंदी उभारेल, अशी भीती पॅलेस्टाइनला वाटते. येथील मुस्लीम नागरिक म्हणतात की, ज्यू भाविकांच्या भेटीमुळे मशिदीच्या आवारात बंदी घालण्यात आलेल्या बिगरमुस्लीम प्रार्थनेच्या कराराचाही भंग वारंवार ज्यूंकडून करण्यात येत आहे. इस्रायल मात्र अशा प्रार्थना होत नसल्याचा दावा करीत आहे, तसेच करार केल्यानंतरची परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे सांगत आहे.
गेल्या काही वर्षांत कोणत्या घटनेमुळे हिंसाचार कसा घडला?
मार्च २०२१ च्या दरम्यान, ‘हमास’ या इस्लामी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले. ज्यामुळे पॅलेस्टाइनच्या गाझा पट्ट्यात संघर्ष पेटला. ११ दिवस चाललेल्या हिंसाचारात २५० नागरिकांचा मृत्यू झाला, तर इस्रायलचे १३ लोक मारले गेले.
आपण जेरुसलेमचे रक्षक असून पॅलेस्टाइन आणि मुस्लीम पवित्र स्थळांना सुरक्षित ठेवण्यासाठी लढत असल्याचा दावा ‘हमास’कडून करण्यात येतो. ‘हमास‘ने गुरुवारी होत असलेल्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा इस्रायलला इशारा दिला. आहे. ज्यूंच्या उजव्या विचारसरणीच्या यात्रेकरूंनी जर ‘अल-अक्सा’ मशिदीत प्रार्थना करून कराराचा भंग केला किंवा पॅलेस्टाइन नागरिकांवर हल्ला केला, तर पुन्हा इस्रायलवर हल्ला करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा ‘हमास’ने दिला आहे.
या वर्षी पॅलेस्टाइन नागरिकांनीही आपली स्वतःची ‘ध्वज मिरवणूक’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक आणि गाझा परिसरात मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला असला तरी इस्रायल-गाझा विलगीकरण रेषेच्या काही मीटर अलीकडूनच ही मिरवणूक मार्गस्थ होईल, असे कळत आहे.