जगात तंत्रज्ञानाच्या जोरावर रोज नवनवीन आविष्कार होत असून जगभरातील लोक एकमेकांच्या जवळ येत आहेत. भारतातही ५ जी इंटरनेट सुविधा आली आहे. या हायस्पीड इंटरनेट सुविधेचा उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रांत उपयोग होत आहे. दरम्यान, इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीने या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून भारतभरात वायरलेस ब्रॉडबँड सेवा सुरू करणार आहे. त्याला ‘जिओ एअर फायबर’ (Jio AirFiber) असे नाव देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान नेमके काय आहे? ते संपूर्ण भारतात सुरू करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजची योजना काय आहे? जिओ एअर फायबरमुळे भविष्यात काय बदल होणार? हे जाणून घेऊ या…
आता वायरलेस ५ जी हायस्पीड इंटरनेट
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ एअर फायबरची घोषणा केली. या एअर फायबरच्या माध्यमातून लोकांना आता वायरलेस ५ जी हायस्पीड इंटरनेट मिळणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या १९ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना हायस्पीड डेटा मिळेल, तसेच कंपनीच्या उत्पन्नातही मोठी भर पडेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजने व्यक्त केला आहे.
जिओ एअर फायबर कसे काम करते?
जिओ एअर फायबरची सुविधा लवकरच संपूर्ण भारतात उपलब्ध होणार आहे. हे एक वायरलेस तंत्रज्ञान असून हायस्पीड ५ जी इंटरनेटसाठी आता कोणत्याही लास्ट माईल फायबरची गरज पडणार नाही. जिओ एअर फायबर हे एक प्लग अँड प्ले डिव्हाईस आहे. म्हणजेच या उपकरणाच्या माध्यमातून घरी किंवा ऑफिसमध्ये हायस्पीड इंटरनेट मिळू शकते. ५ जी इंटरनेटच्या मदतीने जिओ एअर फायबर हे एका वायफाय हॉटस्पॉटप्रमाणे काम करेल. कोणत्याही केबलशिवाय हे उपकरण जवळपास १ GBPS पर्यंत इंटरनेट स्पीड देणार आहे. विशेष म्हणजे जिओ एअर फायबरशी लॅपटॉप, ऑफिस कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, स्मार्टफोन अशी वेगवेगळी उपकरणं जोडता येणार आहेत.
उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास हायस्पीड डेटामुळे जिओ एअर फायबरच्या मदतीने लोकांना आयपीएलचे सामने वेगवेगळ्या अँगलने पाहता येणार आहेत. तसेच आता वॉच पार्टीचे (वॉच पार्टीमध्ये एकच चित्रपट किंवा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने एकाच वेळी अनकेजकण पाहतात. यावेळी ते एकमेकांशी लाईव्ह संवाद साधू शकतात) आयोजन करणे आणखी सोपे होणार आहे. ऑनलाइन गेमिंगदेखील आणखी प्रभावीपणे होणार आहे.
अॅपच्या माध्यमातून देता येणार कमांड
मिळालेल्या माहितीनुसार जिओ एअर फायबर साधारण एक हजार स्क्वेअर फूट परिसरात असणाऱ्या वापरकर्त्याला हायस्पीड डेटा पुरवू शकते. यामध्ये वायफाय ६ सपोर्ट असेल. जिओ एअर फायबरला अगदी सोप्या पद्धतीने इन्स्टॉल करता येईल. तसेच एका अॅपच्या माध्यमातून त्याला कमांडही देता येणार आहे.
जिओ एअर फायबर काम कसे करणार?
मनिकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार जिओ एअर फायबर वापरायचे असल्यास इमारतीवर एक छोटा अँटेना लावावा लागणार आहे. या अँटेनाच्या मदतीने जिओ एअर फायबर इंटरनेटचा पुरवठा करणार आहे. हा अँटेना थेट रिलायन्स टॉवरशी जोडलेला असेल. अँटेनाचे थेट टॉवरशी कनेक्शन असल्यामुळे ग्राहकांना संपूर्ण वायरलेस कनेक्शन मिळणार आहे. यामुळे कोणत्याही अडथळ्याविना डेटा वापरता येणार आहे.
ब्रॉडबँडप्रमाणे मिळणार इंटरनेट स्पीड
विशेष म्हणजे जिओ एअर फायबरमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही ब्रॉडबँडप्रमाणे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. जिओ एअर फायबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीदेखील नेता येणार आहे. ग्राहक या उपकरणाला आपल्या सोबत कोठेही घेऊन जाऊ शकतात. म्हणजेच जिओ एअर फायबरच्या माध्यमातून आता ग्राहकांना कोणत्याही ठिकाणी हायस्पीड डेटा मिळणार आहे.
आकाश अंबानी काय म्हणाले?
रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी जिओ एअर फायबरबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “जिओ एअर फायबर हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भविष्यात जिओ एअर फायबर प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होऊन जाणार आहे. जिओ फायबर आणि जिओ एअर फायबरच्या माध्यमातून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याचा वेग हा सर्वाधिक असणार आहे,” असे आकाश अंबानी म्हणाले.
जिओ एअर फायबर कसे मिळवणार?
जिओ एअर फायबरची सुविधा हवी असेल तर सर्वांत अगोदर मोबाईलमध्ये माय जिओ अॅप इन्स्टॉल करावे लागेल. किंवा jio. com या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जिओ एअर फायबरवर हवे असलेले ठिकाण टाकावे लागेल. त्यानंतर जिओचे अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील.
४५ कोटी ग्राहक वापरतात जिओच्या सुविधा
दरम्यान, ऑक्टोबर २०२२ पासून देशभरात ५ जी सेवेची सुरुवात झाली. या ५ जी सेवेचा विस्तार करण्यात जिओने मोठी भूमिका बजावली आहे. ३ जी किंवा ४ जीच्या तुलनेत ५ जी सेवा जलद गतीने देशभरात पोहोचली. सध्या साधारण ९६ टक्के शहरांत ५ जीचे जाळे विस्तारले आहे. असे असताना आता जिओने जिओ एअर फायबर आणल्यामुळे या क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे.