दरवर्षी, हजारो लोक अचानक नाहीसे होण्याचा निर्णय घेतात. आपले कुटुंब, नोकरी तसेच आपली संपूर्ण ओळख मागे टाकतात. यामागे सामाजिक दबाव असल्याचे कारण सांगितले जाते. कल्पना करा, एका सकाळी तुम्ही जागे होता आणि तुमची प्रिय व्यक्ती कुठल्याही मागमूसाशिवाय अचानक नाहीशी होते. रात्रीच्या अंधारात त्या व्यक्तीची संपूर्ण ओळख नाहीशी झालेली असते. या धक्कादायक वास्तव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. लोक इतक्या टोकाचा निर्णय का घेतात? या मागे नेमक्या कोणत्या गोष्टी असतात? नाहीसे होण्याची कल्पना अतिशय टोकाची वाटू शकते. परंतु, अनेकांसाठी तो अपमान आणि नैराश्यापासून सुटण्याचा शेवटचा मार्ग असतो.

जोहत्सू म्हणजे काय?

जोहत्सू हा एक जपानी शब्द आहे. या शब्दाचा अर्थ ‘बाष्पीभवन’ असा होतो. या संदर्भात लोक कोणताही मागमूस न ठेवता अचानक नाहीसे होतात. आपले घर, कुटुंब आणि जुने आयुष्य मागे टाकतात. अशा टोकाच्या निर्णयामागील कारणे प्रामुख्याने तीव्र सामाजिक दबाव आणि वैयक्तिक अपयश असते. जे सहन करणे त्यांना अशक्य वाटते.

जोहत्सू कोण होतात?

दरवर्षी, जपानमध्ये हजारो लोक हा मार्ग निवडतात. TIME ने दिलेल्या बातमीनुसार आणि फ्रेंच पत्रकार लेना माउजर यांनी म्हटल्याप्रमाणे जवळपास एक लाख लोक दरवर्षी अचानक नाहीसे होतात. यामध्ये अनेक जण नैराश्य, व्यसनाधीनता किंवा घटस्फोट व आर्थिक अडचणींशी संबंधित कलंक यांसारख्या गंभीर समस्यांशी झुंज देत असतात. काहींसाठी अपयशानंतर कुटुंब आणि मित्रांसमोर जाण्याची कल्पनाच असह्य असते. या संघर्षांचा सामना करण्याऐवजी ते नाहीसे होणे अधिक सोयीचे मानतात. जोहत्सू होण्याची कारणे वेगवेगळी असतात. काही लोक छळ करणाऱ्या नातेसंबंधांना कंटाळलेले असतात किंवा प्रचंड कर्जात बुडालेले असतात. त्यामुळे ते परिस्थितीपासून पळ काढत असतात. तर काही समाजाच्या अपेक्षांमुळे किंवा कामाच्या संस्कृतीमुळे नोकरी गमावणे हा मोठा अपमान मानतात. अशा परिस्थितीत अचानक नाहीसे होणे त्यांना सुटकेचा एकमेव मार्ग वाटतो.

नाईट मूव्हर्स कोण आहेत?

अनेक अहवालांनुसार, ‘नाईट मूव्हर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही विशेष कंपन्या लोकांना त्यांच्या आयुष्यातून अदृश्य होण्यासाठी मदत करतात. या कंपन्या अशा व्यक्तींना गुप्तपणे सेवा देतात ते कोणतेही ठसे न ठेवता नाहीसे होऊ इच्छितात. त्यांच्या कार्याच्या गुप्त स्वरूपामुळे ‘नाईट मूव्हर्स’ हा शब्द या कंपन्यांसाठी वापरला जातो. कारण बहुतांश वेळा त्या रात्रीच्या वेळी कार्यरत असतात. त्यांच्या हालचाली कोणाच्या लक्षात येणार नाही याची ते काळजी घेतात. त्यांचे मुख्य काम हे त्यांच्या ग्राहकांना परिस्थितीतून सुटण्यास आणि नवीन जीवन सुरू करण्यास मदत करणे असते. नाईट मूव्हर्स त्यांच्या पूर्व आयुष्यातून नाहीसे होऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाच्या सेवा देतात. ते ग्राहकांना शांतपणे आणि कार्यक्षमतेने स्थलांतर करण्यास मदत करतात. नाहीसे होण्यास इच्छित असणाऱ्या लोकांच्या वस्तू कोणाचेही लक्ष वेधून न घेता व्यवस्थित पॅक करून हलवतात. याशिवाय ते ग्राहकांना नवी ओळखपत्र मिळविण्यास मदत करून त्यांची नवीन ओळख निर्माण करण्यास सहाय्य करतात. अनेक ग्राहकांना त्यांच्या निर्णयांशी जुळवून घेण्यासाठी आणि नव्याने सुरुवात करण्याच्या योजनांसाठी भावनिक आधार देखील दिला जातो. TIME मासिकाने २०१७ साली प्रसिद्ध केलेल्या वृत्तांकानुसार नाईट मूव्हर्स भाड्याने घेण्याचा खर्च विविध घटकांवर अवलंबून असतो. साधारणतः हा खर्च ४५० डॉलर्स ते २६०० डॉलर्स या दरम्यान असतो. हा खर्च त्या काळात सुमारे ३०,००० ते १.५ लाख भारतीय रुपयांच्या दरम्यान होता.

जपानी समाजातील गोपनीयता

जपानमध्ये गोपनीयतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. ते जोहात्सू होऊ इच्छिणाऱ्या लोकांना प्रभावीपणे लपण्यास मदत करते. जपानी समाजशास्त्रज्ञ हिरोकी नाकामोरी यांनी अनेक वर्षे जोहात्सू या घटनेचा अभ्यास केला आहे. त्यांनी BBC ला सांगितले की हा शब्द जपानमध्ये १९६० च्या दशकात वापरला जाऊ लागला. लोकांना जाणवले की, स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सर्वात सोपा मार्ग फक्त अदृश्य होणे हा असू शकतो. नाकामोरी म्हणाले, “जपानमध्ये नाहीसे होणे सोपे आहे.” पोलीस कोणताही गुन्हा किंवा अपघातासारखी दुसरी काही कारणे नसल्यास हस्तक्षेप करत नाहीत. यासाठी कुटुंबियांसाठी पर्याय फक्त दोनच असतात. महागड्या खाजगी गुप्तहेरांची मदत घेणे किंवा फक्त वाट पाहणे हे असते. लोक आपल्या जुन्या आयुष्याशी पूर्णपणे संबंध तोडू शकतात आणि CCTV कॅमेरे किंवा ATM सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणी त्यांचा पाठलाग करेल याची चिंता करण्याची गरज नसते. ही गोपनीयता त्यांना अनिश्चिततेत अदृश्य होण्याची संधी देते आणि शोध लागण्याची शक्यता कमी करते. त्यामुळे नवीन जीवन सुरू करण्याची प्रक्रिया सुलभ होते. जोहात्सूची प्रवृत्ती आणि जपानमधील गोपनीयतेचा उच्च स्तर मागे राहिलेल्या कुटुंबीयांवर गंभीर परिणाम करू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती अचानक नाहीशी होते. तेव्हा पालक आणि नातेवाईक असहाय्य मनःस्थितीत असतात. एका आईने BBC शी बोलताना तिच्या वेदना व्यक्त केल्या, “सध्याच्या कायद्यांनुसार मी फक्त मृतदेह माझ्या मुलाचा आहे का ते तपासू शकते. एवढंच माझ्या हाती शिल्लक आहे.” अशा घटनांमुळे प्रियजनांना खोल मानसिक आघात बसतो.

नाहीसे झाल्यानंतरचं जीवन

जे लोक यशस्वीरित्या जोहात्सू होतात. त्यांचं जीवन अनामिकतेने आणि सावधगिरीने भरलेलं असतं. ते सहसा कमी लोकसंख्या असलेल्या शांत भागांमध्ये स्थलांतर करतात आणि अशा नोकऱ्या स्वीकारतात जिथे चौकशीची गरज भासत नाही. यामुळे त्यांची ओळख पटण्याची शक्यता कमी होते आणि नव्या आयुष्यात प्रवेश करता येतो. अनामिक जीवन जगण्यामुळे त्यांना त्यांच्या जुन्या आयुष्याचा तणाव आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्याची संधी मिळते. काही लोक सामाजिक दबावांपासून मुक्त होऊन नव्या आयुष्यात समाधान शोधतात. तर काहींना एकटेपणा आणि पकडले जाण्याच्या भीतीशी झुंज द्यावी लागते. जोहात्सूभोवती असलेल्या कलंकामुळे परत आलेल्या लोकांसाठी आपले अनुभव शेअर करणे कठीण होते. कारण त्यांना लाज किंवा समाजाच्या टीकेची भीती वाटते. त्यामुळे बरेच लोक आपला भूतकाळ गुप्त ठेवणं पसंत करतात. त्यामुळे त्यांना मानसिक संघर्षाचा सामना करावा लागतो.

‘जोहात्सू’ मुळे माणसाचे संपूर्ण जीवन सहजपणे पुसले जाऊ शकते. हे विचलित करणारे वास्तव मानवी नातेसंबंध किती नाजूक आहेत हे दर्शवते आणि यातून सुटण्यासाठी लोक किती टोकाची पावलं उचलू शकतात हे स्पष्ट होते. हे जीवनातील समस्यांवर एक टोकाचं उत्तर वाटत असलं, तरी अत्यंत मोठ्या तणावाखाली असलेल्या काहींसाठी हा एकमेव मार्ग असू शकतो. पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी कोणत्याही लाज किंवा अपयशाच्या ओझ्याशिवाय मिळते. परंतु, जीवन हे चढ-उतारांनी भरलेलं असतं आणि प्रत्येक समस्येवर उपाय असतो. बरे होण्यासाठी आणि पुन्हा संबंध निर्माण करण्यासाठी नेहमीच आशा असते.

Story img Loader