अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील घाटकोपर येथे २ डिसेंबर २००२ रोजी बसमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता, तर ३९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनुसला अटक करण्यात आली होती. २७ वर्षीय ख्वाजा युनुस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने अभियंता होता. दुबईत काम करत होता. त्याच्याविरोधात ‘पोटा’ कायदयांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. ६ जानेवारी २००३ रोजी युनुसची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ७ जानेवारी २००३ रोजी तो बेपत्ता झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. युनुसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबाद येथे घेऊन जात असताना पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी संधीचा फायदा घेऊन युनुस बेडीसह पळून गेला व शोधूनही तो सापडला नाही, असे पोलिसांकडून सागण्यात आले. त्यावेळी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून सचिन वाझेंसह चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

युनुसच्या मृत्यूबाबत दुसरी बाजू काय?

युनुसला पोलीस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या तोंडातून प्रचंड रक्त वाहत होते आणि त्यानंतर तो आम्हाला काही दिसला नाही, असे युनुससह असणाऱ्या सहआरोपींनी न्यायालयात सांगितले. तसेच ख्वाजा युनुस याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. पण त्याच्या हत्येचा गुन्हा लपविण्यासाठी पोलिसांनी तो पळाल्याचा बनाव रचला, असा आरोप ख्वाजाच्या नातेवाईकांनीही पोलिसांवर केला होता. त्या प्रकरणी ख्वाजाच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवला. यावेळी चौकशीत पोलिसांच्या ताब्यात असतानाच युनुसचा मृत्यू झाला. त्यामुळे सचिन वाझे आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर हत्या आणि पुरावे लपवण्याचा आरोप ठेवण्यात आला.

आणखी वाचा-मणिपूरमध्ये ‘आसाम रायफल्स’बाबत नाराजी का? या निमलष्करी दलाचे काय चुकले?

सीआयडीने काय कारवाई केली?

ख्वाजा युनुसच्या साथीदाराने केलेल्या दाव्याच्या आधारे त्याच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली. या याचिकेच्या आधारे कोर्टाने या घटनेचा तपास सीआयडीकडे दिला. तसेच सचिन वाझे यांनी युनुस प्रकरणात खोटी आणि संशयास्पद तक्रार दाखल केल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि खुनाच्या आरोपाखाली सचिन वाझे यांच्यासह चार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वाझे यांना या प्रकरणी ३ मार्च २००४ रोजी अटक झाली. पुढे दोन महिन्यांनी  वाझेंची जामिनावर सुटका झाली होती.

आणखी वाचा-आयपीओ सूचिबद्धतेच्या कालावधीबाबत ‘सेबी’चा निर्णय काय? त्याने भागधारकांना काय फायदा होणार?

सचिन वाझे यांचे पुढ काय झाले?

वाझे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना २००४ मध्ये निलंबित करण्यात आले. दुसरीकडे २००७ मध्ये वाझेंनी आपल्या पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामाही दिला. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यानंतर २००८ मध्ये दसरा मेळाव्यात वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केला तरी ते पक्षात फारसे सक्रिय झाले नाहीत. ख्वाजा मृत्यू प्रकरणी न्यायालयात खटला सुरूच होता. दुसरीकडे  घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी युनुसव्यतिरिक्त सातही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये सचिन वाझे पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. त्यांना गुन्हे शाखेच्या सीआययू विभागाचे प्रभारी करण्यात आले होते. त्यानंतर अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरण हत्येप्रकरणी वाझेंना अटक झाली. आता त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 

न्यायालयीन सुनावणीची स्थिती काय?

या प्रकरणी सत्र न्यायालयात खटला सुरू असून तो प्रलंबित आहे. सचिन वाझे यांच्यासह चौघांविरुद्ध हा खटला चालवला जात आहे. त्याचवेळी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांच्यासह आणखी चार पोलिसांविरुद्ध खटला चालवण्याची स्वत:च केलेली मागणी सरकारने नंतर मागे घेतली. त्यामुळे, तूर्त तरी चौघांवर खटला चालवला जात आहे. परंतु, या चार पोलिसांवर खटला चालवण्याची मागणी करणारा यापूर्वीचा अर्ज मागे घेण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिल्याने त्याविरोधात ख्वाजाची आई आसिया बेगम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चार पोलिसांनी युनुसचा कोठडीत छळ केल्याच्या आरोपानंतर चौघांनाही या प्रकरणी आरोपी करण्याची तसेच त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी खटल्यातील आधीचे विशेष सरकारी वकील धीरज मिरजकर यांनी केली होती. परंतु, त्यांच्या या मागणीनंतर त्यांना अचानक खटल्यातून दूर करण्यात आले. ख्वाजाच्या आईने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका केल्यानंतर या प्रकरणी नव्या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात आली. परंतु, त्यानंतर पोलिसांवर खटला चालवण्याची मागणी करणारा अर्ज सरकारने मागे घेतल्याने आसिया यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is khawaja yunus death case print exp mrj
Show comments