लाखो नागरिकांचा जीव घेणाऱ्या करोना संसर्गातून जग सध्या हळूहळू सावरत आहे. करोना प्रतिबंधक लशींमुळे हा संसर्ग आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशी एकंदरीत सकारात्मक स्थिती असताना आता आणखी एक विषाणूने चिंता वाढवली आहे. रशियामधील एका वटवाघळामध्ये ‘खोस्टा-२’ नावाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू मानवी पेशींना संक्रमित करण्यास सक्षम असल्याने जगासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या नवीन विषाणूपुढे सध्या उपलब्ध असलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लशी निष्क्रिय ठरत आहेत. मॉडर्ना आणि फायझरचे दोन डोस या विषाणूपुढे कुचकामी ठरले आहेत.

खोस्टा-२ विषाणूची उत्पत्ती कशी झाली?
सर्वप्रथम रशियातील ‘सोची नॅशनल पार्क’मधील वटवाघळांच्या नमुन्यांमध्ये खोस्टा-२ विषाणू आढळला आहे. संशोधकांनी ऑक्टोबर २०२० मध्ये या विषाणूचे नमुने गोळा केले होते. दरम्यान, गोळा केलेल्या ‘हॉर्सशू बॅट’च्या नमुन्यांमध्ये स्पाइक प्रोटीन आढळून आले. यानंतर या विषाणूला ‘खोस्टा-२’ हे नाव देण्यात आलं.

खोस्टा-२ हा विषाणू मानवांसाठी धोकादायक नसेल, असं शास्त्रज्ञांना सुरुवातीला वाटलं होतं. आतापर्यंत खोस्टा-१ आणि खोस्टा-२ अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा विषाणू आढळला आहे. खोस्टा-१ च्या तुलनेत खोस्टा-२ हा विषाणू मानवी आरोग्यासाठी अधिक धोकादायक असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात आशियातील वटवाघळांमध्ये शेकडो सर्बकोव्हायरस (sarbecovirus) सापडले आहेत. यातील बहुसंख्य विषाणू मानवी पेशींना संक्रमित करण्यास पुरेसे सक्षम नाहीत.

खोस्टा-२ विषाणू मानवांना संक्रमित करू शकतो का?
खोस्टा-२ हा विषाणू मानवांना संक्रमित करण्यास सक्षम आहे. ‘प्लोस पॅथोजेन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, खोस्टा-२ हा विषाणू सार्स-कोव्ह-२ विषाणूप्रमाणे मानवी पेशींना संक्रमित करू शकतो. शिवाय कोविड-१९ प्रतिबंधक लशींचा या विषाणूवर कोणताही परिणाम होत नाही.

संशोधनातील निष्कर्षांनुसार, रशियामधील राइनोलोफस (Rhinolophus) जातीच्या वटवाघळांमध्ये तीन सर्बकोव्हायरस आढळले होते. यातील खोस्टा-१ हा विषाणू ‘Rhinolophus ferrumeguinum’ जातीच्या वटवाघळांमध्ये आणि खोस्टा-२ हा विषाणू ‘Rhinolophus hipposideros’ जातीच्या वटवाघळामध्ये आढळला. हे सोशोधन ‘वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी’च्या (WSU) पॉल अॅलन स्कूल फॉर ग्लोबल हेल्थने केलं आहे. २२ सप्टेंबर २०२२ रोजी हे संशोधन ‘प्लोस पॅथोजेन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

कोविड-१९ आणि खोस्टा-२ विषाणूंमधील साम्य
‘वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी’चे विषाणूशास्त्रज्ञ आणि संबंधित संशोधनाचे लेखक मायकेल लेटको यांच्या मते, खोस्टा-२ विषाणू हा कोविड-१९ विषाणूप्रमाणेच संसर्गजन्य असून याचा मानवी आरोग्याला संभाव्य धोका आहे. हा विषाणू सध्या करोना विषाणूविरोधात सुरू असलेल्या जागतिक लढाईत धोकादायक ठरू शकतो. खोस्टा-१ आणि खोस्टा-२ हे दोन्ही विषाणू ‘सर्बकोव्हायरस’ नावाच्या करोना विषाणूच्या उप-वर्गात मोडतात. स्पाइक प्रोटीनच्या मदतीने हे विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करतात.

‘टाइम’च्या वृत्तानुसार, खोस्टा-२ विषाणूची मानवी शरीरामध्ये गंभीर आजार निर्माण करण्याची क्षमता कमी आहे. पण या विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केला आणि सार्स-कोव्ह-२ च्या जनुकांमध्ये मिसळला, तर तो मानवी शरीरासाठी अधिक धोकादायक ठरतो.

दरम्यान, संशोधकांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या लोकांच्या सीरमची चाचणीही केली आहे. यामध्ये संबंधित लोकांमधील प्रतिपिंडे (Antibodies) खोस्टा-२ विषाणूपुढे निष्क्रिय ठरल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे या विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, यावर लस विकसित करणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या विषाणूचं महामारीत रुपांतर होण्याची शक्यता असल्याची माहितीही संशोधक मायकेल लेटको यांनी प्रसारमाध्यमांना दिली.