Kidflix dark web paedophile platforms इंटरनेटने सध्या जगाला वेड लावले आहे. जितका लोक सोशल मीडिया, वेब पोर्टल आदींचा वापर मनोरंजनासाठी करत आहेत, तितकाच याचा वापर आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणूनदेखील केला जात आहे. नुकतीच लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी समोर आलेली बातमी मन हेलावणारी आहे. ३५ हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या एका वेब प्लॅटफॉर्मवर लहान मुलांशी संबंधित ९१,००० व्हिडीओ आढळून आले आहेत. मुख्य म्हणजे हा प्लॅटफॉर्म १.८ दशलक्ष म्हणजेच १८ लाखांहून अधिक वापरकर्ते वापरत आहेत. काय आहे हे वेब प्लॅटफॉर्म? लैंगिक शोषणाच्या व्हिडीओसाठी याचा वापर कसा केला गेला? या वेब पोर्टलचे वास्तव जगासमोर कसे आले? जाणून घेऊयात.

किडफ्लिक्स काय आहे?

३५ पेक्षा जास्त देशांमध्ये हे वेब नेटवर्क पसरले आहे. किडफ्लिक्सचे १.८ दशलक्ष (१८ लाख) वापरकर्ते आणि या प्लॅटफॉर्मवर तब्बल ९१,००० बाल लैंगिक शोषणाचे व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. हे डार्क वेब प्लॅटफॉर्म जगातील सर्वात मोठ्या बाल लैंगिक शोषण प्लॅटफॉर्मपैकी एक असल्याचे समोर आले आहे. याचे वास्तव जगासमोर येताच हे वेब प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर्मनीतील तपासकर्त्यांनी, पॅन-युरोपियन पोलिस एजन्सी युरोपोलच्या मदतीने या प्लॅटफॉर्मवरील स्ट्रीमिंग सेवा बंद करत मोठी कारवाई केली आहे, त्याला ‘ऑपरेशन स्ट्रीम’ असे नाव देण्यात आले आहे.

किडफ्लिक्सचे वास्तव जगासमोर

किडफ्लिक्स हा एक डार्क वेब स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म होता. या प्लॅटफॉर्मवर अत्यंत लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे चित्रण करणारे हजारो व्हिडीओ सहज उपलब्ध होते. युरोपोलच्या मते, २०२१ मध्ये सायबर गुन्हेगाराने त्यातून मोठा नफा कमावला. गेल्या तीन वर्षांत या प्लॅटफॉर्मवर जगभरातून तब्बल १.८ दशलक्ष वापरकर्त्यांनी नोंदणी केली आहे, त्यात अंदाजे ९१,००० व्हिडीओ आहेत, ज्यात लहान मुलांचे लैंगिक शोषण चित्रित करण्यात आले आहे. त्यावर ६,२८८ तासांचा कंटेंट आहे, जो मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला आहे.

कंटेंटच्या माध्यमातून पैशांची कमाई

या वेब प्लॅटफॉर्मवर मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ डाउनलोड करण्यासह व्हिडीओ फाइल्स स्ट्रीम करण्याचीदेखील परवानगी होती. प्लॅटफॉर्म वापरकर्ते क्रिप्टोकरन्सी वापरून पेमेंट करायचे, त्यानंतर त्यांना एक टोकन प्राप्त व्हायचे, असे युरोपोलने म्हटले आहे. मुख्य म्हणजे, वापरकर्ते असे व्हिडीओ अपलोड करून, शीर्षक देऊन आणि त्या व्हिडीओविषयी वर्णन करून टोकन मिळवू शकत होते, असेही त्यांनी सांगितले. ११ मार्च २०२५ रोजी अधिकाऱ्यांनी हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद केले आहेत आणि त्याचा वेगाने वाढता प्रसार थांबवला आहे. या प्लॅटफॉर्मवर सरासरी, दर तासाला तीनपेक्षा अधिक नवीन व्हिडीओ अपलोड केले जात होते.

किडफ्लिक्सचे वास्तव जगासमोर कसे आले?

किडफ्लिक्स हा प्लॅटफॉर्म बंद करण्याचे काम जर्मनीतील पोलिस अधिकाऱ्यांनी युरोपोलच्या सहाय्याने केले आहे. किडफ्लिक्स बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तृत तपास करण्यात आला आणि पुरावे गोळा करण्यात आले. हा प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ब्रिटनसह एकूण ३६ देश एकत्र आले. मार्चमध्ये पोलिसांनी ३१ देशांमध्ये छापे टाकले. या कारवाईला युरोपोलच्या गुइडो लिमर यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हटले आहे. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी किडफ्लिक्सशी संबंधित ७९ व्यक्तींना अटक केली आहे, तर १,४०० हून अधिक संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे.

या संबंधित केवळ प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या ग्राहकांनाच नव्हे तर प्लॅटफॉर्मवरील व्हीडिओंचा गैरवापर करणाऱ्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. एका धक्कादायक प्रकरणात, एका ३६ वर्षीय पुरुषाला प्लॅटफॉर्मवर बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिमा शोधल्याबद्दल आणि नंतर त्याच्या परिचित लहान मुलाशी गैरवर्तवणूक केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे आणि मुलाला बाल संरक्षण सेवांमध्ये पाठवण्यात आले आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात, तपासकर्त्यांनी अमेरिकेतून सातत्याने अत्याचार प्रकरणात सहभागी असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. वरिष्ठ अभियोक्ता थॉमस गोगर यांनी सांगितले की, या प्रकरणातील बहुतेक संशयितांचे वय २० ते ४० वर्षांच्या मध्ये आहे. त्यातील बरेच जण अनेक वर्षांपासून या प्लॅटफॉर्मवर सक्रिय होते. जर्मन आणि डच अधिकाऱ्यांनी त्यांच्या छाप्यात बाल लैंगिक शोषणाचे तब्बल ७२ हजार व्हिडीओ असलेली हार्ड ड्राइव्ह जप्त केली आहे.

जर्मन अधिकाऱ्यांनी मुलांचे सतत होणारे शोषण रोखण्यासाठी अधिक सतर्कतेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी या प्रकरणानंतर अशी ९६ प्रकरणे हाताळली आहेत. त्यातील १२ प्रकरणांमध्ये मुलांचे होत असलेले शोषण थांबविण्यात आले आहे, तर ३९ मुलांना तपसादरम्यान संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. या प्रकरणावर अधिकाऱ्यांचे सांगणे आहे की, अशा स्वरूपाचे गुन्हे रोखण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जगभरात असणारे अशा प्रकारचे नेटवर्क नष्ट करणे आवश्यक आहे.