आधुनिक जीवनशैली, शहरीकरण व उद्योगीकरण यांमुळे होणार्‍या प्रदूषणाच्या कारणास्तव ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत चालला आहे. जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यांचा परिणाम पृथ्वीच्या पर्यावरणावर होत आहे. हवामान बदलामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक सौंदर्याचा एक मोठा भाग हळूहळू नाहीसा होत आहे. त्यामुळेच ‘लास्ट चान्स टुरिझम’ हा ट्रेंड वाढताना दिसत आहे. ज्यांना पर्यटनाची आवड असते, अशा पर्यटकांना आपल्या ‘बकेट लिस्ट’मधील प्रत्येक जागेला भेट देण्याची इच्छा असते. पर्यटकांमधील वाढत्या उत्साहासह चिंतेमुळेदेखील ‘लास्ट चान्स टुरिझम’ हा ट्रेंड सुरू झाला आहे. परंतु, हा ट्रेंड नक्की काय आहे? पर्यावरण बदल आणि पर्यटनाचा नक्की काय संबंध? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लास्ट चान्स टुरिझम’ म्हणजे काय?

निसर्गाचे सौंदर्य झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या ट्रेंडची सुरुवात झाली आहे. काही पर्यटनाची ठिकाणे मर्यादित कालावधीसाठी अस्तित्वात आहेत, त्यामुळे त्या जागांचं अस्तित्व संपण्याच्या आधी या जागांना भेट देण्याची एक मानसिकता या ट्रेंडद्वारे सुरू झाली आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या डेसिरी इबेक्वे यांच्या म्हणण्यानुसार, जगाच्या तापमानवाढीमुळे हिमनद्या, प्रवाळ खडक व द्वीपसमूह लुप्त होण्याचा धोका आहे. हेदेखील कारण आहे की, ही ठिकाणे भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत शीर्षस्थानी आहेत.

निसर्गाचे सौंदर्य झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : पाकिस्तानातील ‘शांघाय परिषद’ बैठकीला एस. जयशंकर राहणार उपस्थित; काय आहे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन? त्याचे महत्त्व काय?

त्याचा प्रभाव काय?

अनेक पर्यटकांना शक्य तितक्या लवकर वितळणाऱ्या हिमनद्या आणि लुप्त होणाऱ्या जंगलांना भेट द्यायची आहे. परंतु, आज परिस्थिती अशी आहे की, ही नैसर्गिक आश्चर्ये माणसांमुळे आज लुप्त होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचली आहेत आणि माणसांनाच ती लुप्त होण्यापूर्वी पाहण्याची घाई झाली आहे. पर्यटनामुळे ही ठिकाणे अतिसंवेदनशील होत आहेत, त्याचे कारण आहे हरितगृह वायू उत्सर्जन. ‘वर्ल्ड ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम कौन्सिल’ने प्रकाशित केलेल्या २०२१ च्या संशोधनानुसार जगातील हरितगृह वायू उत्सर्जनांपैकी आठ ते ११ टक्के उत्सर्जन प्रवासामुळे होते. इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंजेस (आयपीसीसी)चा नवीन अहवालही चिंताजनक आहे; ज्यात असे भाकीत केले आहे की, हिमनद्या शतकाच्या अखेरीस त्यांच्या वस्तुमानाच्या ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात आणि २०५० पर्यंत ९० टक्क्यांहून अधिक कोरल रीफ ब्लीच होऊ शकतात. कोरल ब्लीचिंग म्हणजे कोरलमधून एकपेशीय वनस्पती नष्ट होते; ज्यामुळे पांढरा रंग येतो, जो कोरलच्या मृत्यूचे सूचक असतो.

तज्ज्ञ इशारा देतात की, हा ट्रेंड विनाशाच्या चक्राला गती देणारा आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे प्रतिनिधी पेज मेकक्लानहॅन म्हणतात की, संपूर्ण इतिहासात माणसांनी शिखर मोजण्यासाठी, नवीन आश्चर्यांचा शोध घेण्यासाठी, नवनवीन प्रजाती शोधण्यासाठी आयुष्य घालवलं आहे. त्यातील काही गोष्टी आज विलुप्त होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचल्या आहेत. टाइम्सच्या मते, २०१९ मध्ये पर्यटन उद्योगामुळे जगभरात ३३३ दशलक्ष नोकऱ्यांना चालना मिळाली आणि जगाच्या लोकसंख्येपैकी अंदाजे एक-षष्ठांश लोक रोजगारासाठी त्यावर अवलंबून होते. याव्यतिरिक्त संशोधन असेही सूचित करते की, पर्यावरणीय साइटला भेट देणे अभ्यागतांना त्यांच्या स्वतःच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल अधिक जागरूक करू शकते.

फ्रेंच आल्प्समधील सर्वांत मोठ्या हिमनदीकडे जाणाऱ्या ८० टक्के पर्यटकांनी ‘मेर डी ग्लेस’ २०२२ च्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, ते पर्यावरण आणि त्याचे संरक्षण कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यापैकी सुमारे ८२ टक्के लोकांनी सांगितले की, ते यापुढे हिमनद्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रवास करणे टाळतील आणि ७७ टक्के लोकांनी असे सूचित केले की, ते कमी पाणी आणि ऊर्जा वापरतील. टोरंटोस्थित हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम मॅनेजमेंटच्या प्राध्यापक रॅचेल डॉड्सचा यांनी ‘द इंडिपेंडंट’ला सांगितले, ”पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटनस्थळांचे संरक्षण करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे.” डॉड्स पुढे म्हणाले की, पर्यटकांच्या योग्य व्यवस्थापनासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होत आहे.

अनेक पर्यटकांना शक्य तितक्या लवकर वितळणाऱ्या हिमनद्या आणि लुप्त होणाऱ्या जंगलांना भेट द्यायची आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘लास्ट चान्स टुरिझम’ची लोकप्रिय ठिकाणे कोणती आहेत?

साऊथ अमेरिका ॲमेझॉन रेनफॉरेस्ट : ‘पृथ्वीचे फुप्फुस’ म्हणून ओळखले जाणारे ॲमेझॉन रेनफॉरेस्ट अवैध वृक्षतोड आणि जंगलतोडीमुळे नष्ट होत आहे. इको टुरिझममध्ये स्वारस्य असलेले प्रवासी ॲमेझॉनला त्याच्या अद्वितीय नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी भेट देत आहेत. दुसरीकडे सरकार आणि पर्यावरण संरक्षण गट हानी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अंटार्क्टिका : या सुंदर बेटावर हवामान बदलाचा झपाट्याने परिणाम होत आहे. तेथील प्रजाती धोक्यात आहेत आणि बर्फ वेगाने वितळत आहे.

मालदीव : बरेच लोक आश्चर्यकारक बेटांवर प्रवास करीत आहेत. कारण- हे बेट हवामान बदल आणि वाढत्या समुद्र पातळीमुळे अदृश्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

गॅलापागोस बेटे, इक्वेडोर : वाढलेले पर्यटन आणि पर्यावरणीय बदलांमुळे या बेटांवर राहणाऱ्या अद्वितीय प्रजातींना धोका निर्माण झाला आहे.

व्हेनिस, इटली : हे अतिशय जुने शहर असून, तेथील इतिहासजमा झालेल्या गोष्टींचे लोकांना वेगळे आकर्षण आहे. मात्र, समुद्राची वाढती पातळी आणि नियमित पूर यांमुळे या शहराला धोका निर्माण झाला आहे.

माचू पिचू, पेरू : वाढत्या प्रवासी आणि पर्यावरणाच्या बदलामुळे प्राचीन स्थळावरही परिणाम होत आहे.

ग्रेट बॅरियर रीफ, ऑस्ट्रेलिया : पर्यावरणाचा ऱ्हास आणि कोरल ब्लीचिंगमुळे ही प्रसिद्ध रीफ धोक्यात आहे.

हिमालय, नेपाळ/तिबेट : गिर्यारोहकांना या जागेचे आकर्षण असते. हे माउंट एव्हरेस्टसह जगातील सर्वोच्च शिखर आहे. परंतु, या क्षेत्राला असलेले धोके, त्याची नैसर्गिक वैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक वारसा बदलू शकतात.

हेही वाचा : बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवादरम्यान भीतीचं सावट? दुर्गापूजेला विरोधाचं काय आहे कारण?

डेड सी, जॉर्डन व इस्रायल : अतिशय खारट पाणी आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जाणारा डेड सी जगातील सर्वांत अद्वितीय नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. परंतु, त्याच्या पाण्याची पातळी उपनदी जॉर्डन नदीतून पाणी वळवल्यामुळे लक्षणीयरीत्या घसरत आहे आणि वेगाने नाहीशी होत आहे.

आर्क्टिक, कॅनडा : आर्क्टिकमध्ये जागतिक सरासरीपेक्षा चार पट वेगाने तापमानवाढ होत आहे. २०५० पर्यंत उन्हाळ्यात या संपूर्ण प्रदेशातील बर्फ नाहीसा होण्याची शक्यता आहे. परंतु, ‘लास्ट चान्स टुरिझम’च्या वाढीमुळे पर्यावरणाच्या हानीबद्दल इशारा देणारे आणि जगण्यासाठी पर्यटनाच्या कमाईवर अवलंबून असणारे अशा दोन्ही गटांत वाद निर्माण झाला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is last chance tourism trend on social media rac
Show comments