भारतीय कला व संस्कृतीच्या इतिहासात लोककलांचे एक वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक राज्यात स्वतःची अशी एक लोककला आहे. दुर्दैवाने मागच्या काही काळापासून या लोककलांचे जतन आणि त्यातील कलाकारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या लोककला लोप पावत चालल्या आहेत. या लोककला संपण्याची अनेक कारणे असतील, पण सर्वात मोठे कारण काय असेल तर ते प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ. महाराष्ट्रात कोकणातील दशावतार असेल, विदर्भाची झाडीपट्टी, भारूड किंवा अन्य लोककला या प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लोप पावत चालल्या आहेत. बिहारमधील लौंडा नाच ही लोककला देखील लोप पावणाऱ्या कलेच्या या यादीत मोडते.
लौंडा नाच किंवा लौंडा डान्स ही लोककला काय आहे?
बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील भोजपुरी पट्ट्यात लौंडा नाच प्रसिद्ध आहे. पुरुष कलाकार हा महिलेचा वेष धारण करत नाच, गाणं सादर करतो. हे करत असताना त्यातले संवाद हे मिश्किल, विनोद निर्माण करणारे उपरोधिक असे असतात. आपल्याइथे वगनाट्यात जसे शब्दांच्या कोट्या करुन सामाजिक, राजकीय विषयांवर विनोद निर्माण केला जातो, काहीसा तसाच प्रकार लौंडा नाचमध्ये असतो.
बिहारमध्ये नाच हा प्रकार खूप जुना आहे. काही शतकांपुर्वीपासून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडे छठ पुजेच्या आसपास नाच सादर करण्यास सुरुवात होते. त्या त्या स्थानिक सामाजिक, राजकीय गणितानुसार नाचची स्क्रिप्ट आणि सादरीकरण बदलत असतं. शेतकरी, कामगारांचे स्थलांतर, जात वास्तव, लिंगभेद असे अनेक सामाजिक विषयावर नाचच्या माध्यमातून भाष्य केलं जातं. भारतातील इतर प्रदेशात सादर होणाऱ्या नौटंकी, स्वांग, जत्रा आणि तमाशाप्रमाणेच नाचचे स्वरुप असतं. नाचच्या ज्या प्रकारात पुरुषच महिलेची व्यक्तिरेखा साकारत होता, त्याला नंतर लौंडा नाच म्हणून संबोधले गेले. इतर नाच प्रकारात मात्र महिला सहभागी होत आहेत.
लौंडा कुणाला बोलतात
लौंडा शब्दाचा अर्थ होतो एक तरुण पुरुष. पण वास्तविक जेव्हा स्थानिक पातळीवर हा शब्द उच्चारला जातो, तेव्हा त्यातून विविध अर्थ काढले जातात. जे अपमानित करणारे आहेत. जसे की, बायल्या, अश्लिल, बालिश आणि खालच्या जातीतून येणारा तरुण. लौंडा हा शब्द नैतिकतेच्या आड येतो आणि समाजाने त्याला पुर्णपणे स्वीकारलेले नाही. त्यामुळेच लौंडा नाच हा प्रकार समाजापासून तुटलेला वाटतो.
लौंडा नाच कलाकृतीसाठी रामचंद्र मांझी यांनी वाहून घेतले
जगातील बहुतेक लोककला या बंडखोरीतून उत्पन्न झालेल्या आहेत, असे मानले जाते. लौंडा नाचबद्दलही असेच बोलले जाते. बिहारमधील स्थलांतरीत झालेले दलित मजूर आणि इतर वंचित जातींनी लौंडा नाचला आपली अभिव्यक्ती बनविले. समाजातील उच्च वर्गाने जेव्हा वंचितांचे सामाजिकीकरण नाकारले तेव्हा अशा लोककलांमधून वंचित समाजाने आपली अभिव्यक्ती सादर केली. दिवंगत लोककलावंत पद्मश्री रामचंद्र मांझी यांनी वयाच्या ११ व्या वर्षापासून या लोककलेसाठी आपले संपुर्ण आयुष्य दिले. मांझी यांच्या पालकांना त्यांच्या या लौंडा नाच बद्दल काहीच हरकत नव्हती. उलट या कामामुळे मांझी यांना पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. २०२१ साली मांझी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
अश्लिलता, बीभत्स नृत्य यामुळे लौंडा नाच बदनाम
दुर्दैवाने लौंडा नाचबद्दल जगाने प्रागतिक दृष्टी ठेवली नाही. लौंडा नाचमध्ये आजही खालच्या जातीतील लोकच सहभाग घेतात. लौंडा नाच हा अश्लिल, बीभत्स प्रकार असल्याचा समज आज पसरलेला आहे. काही लोक त्याप्रकारे सादरीकरणही करत आहेत. बिहारचे शेक्सपिअर म्हणून ओळखले जाणारे भिखारी ठाकूर आणि रामचंद्र मांझी यांनी लौंडा नाच सारख्या लोककलेला जी प्रतिष्ठा मिळवून दिली, ती प्रतिष्ठा इतरांना राखता आली नाही. सप्टेंबर २०२२ मध्ये रामचंद्र मांझी यांचे निधन झाले. त्यानंतर लौंडा नाचच्या भवितव्याबद्दल आणखीच काळजी केली जाते. एकेकाळी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारी ही कला आता अश्लीलतेसाठी ओळखली जाते. त्यामुळे एकूण समाज देखील त्यापासून लांब होत चालला आहे.