आयपीएलचा हंगाम आता ऐन भरात आहे. मुंबई आणि चेन्नई या संघांच्या नावावर १० जेतेपदं आहेत. यापैकी चेन्नईचं आव्हान गुंडाळल्यात जमा आहे. मुंबईचा संघ जेतेपदासाठी सरसावला आहे. प्रस्थापित संघांना धक्का देत पहिल्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी बंगळुरू तसंच पंजाबचा संघ उत्सुक आहे. सातत्यपूर्ण खेळासाठी ओळखला जाणारा गुजरातचा संघ दमदार खेळतो आहे. सगळ्या सामन्यांमध्ये एका गोष्टीची वारंवार चर्चा होते आहे ते म्हणजे मॅचअप्स. सामना सुरू होण्याआधी, सामन्यादरम्यान आणि सामना संपल्यानंतरही समालोचक मॅचअप्सबद्दल बोलत असतात. दर्दी चाहत्यांनाही मॅचअप्सचं गणित चांगलंच ठाऊक झालं आहे.
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सामना खेळला. या सामन्यात मुंबईने उत्तम फॉर्मात असलेल्या फिरकीपटू मिचेल सँटनरला अंतिम अकरातून वगळण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कर्णधार, अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करणारा, अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असलेल्या सँटनरला वगळण्याचा निर्णय चाहत्यांसाठी धक्कादायक होता. सँटनर दुखापतग्रस्त आहे म्हणून काढलं का अशी विचारणा होऊ लागली. सोशल मीडियावरही सँटनरच्या नसण्याची चर्चा होऊ लागली. याच चर्चेदरम्यान मॅचअप्सचा मुद्दा ऐरणीवर आला.
असं करताना मुंबईने विल जॅक्स या ऑफस्पिनरला प्राधान्य दिलं. ऑफस्पिनरचा चेंडू डावखुऱ्या फलंदाजांपासून दूर जातो. यामुळे त्यांना हवेत फटका मारणे कठीण जातं. लखनौच्या संघात डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, ऋषभ पंत असे एकापेक्षा एक तडाखेबंद डावखुरे फलंदाज आहेत. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने पूरन आणि पंत खेळायला आल्यावर विल जॅक्सला गोलंदाजी दिली. त्याने एकाच षटकात दोघांना बाद करत मोहीम फत्ते केली. यानंतर डावखुरा डेव्हिड मिलर खेळायला उतरल्यावर जॅक्सला गोलंदाजी दिली. अख्ख्या सामन्यात जॅक्सने दोनच षटकं टाकली पण या दोन षटकांनी मुंबईचं काम झालं.
सँटनर डावखुरा फिरकीपटू आहे. उत्तम फॉर्मात आहे पण मुंबईचं वानखेडे मैदान छोटं आहे. डावखुरे फिरकीपटू डावखुऱ्या फलंदाजांना रोखण्यात फार यशस्वी ठरत नाहीत. टी२० सामन्यात प्रत्येक गोलंदाजाला चार षटकं मिळतात. सँटनर या त्रिकुटाला रोखू शकेल किंवा त्यांना तंबूत धाडू शकेल असा विश्वास संघव्यवस्थापनाला नसेल किंवा तशी आकडेवारीच असल्यामुळे सँटनरला संघातून वगळण्यात आलं. सँटनरच्या नावाचा समावेश इम्पॅक्ट प्लेयर्स यादीतही नव्हता. विल जॅक्सने मुंबईला सँटनरची अनुपस्थिती जाणवू दिली नाही.
काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्ज यांच्या लढतीदरम्यान पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलला १७व्या षटकापर्यंत गोलंदाजीच दिली नाही. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स चहलच्या नावावर आहेत. पंजाबने लिलावात तब्बल १८ कोटी रुपये खर्चून चहलला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. मात्र चेन्नईविरुद्धच्या लढतीत चहलला गोलंदाजी देण्यात आली नाही. सामना जिंकल्यानंतर बोलताना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, ‘शिवम दुबे आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. फिरकीपटू त्याला खास आवडतात. त्यांच्या गोलंदाजीवर दुबे तुटून पडतो. दुबेला वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागला असं मला वाटलं म्हणून चहलला गोलंदाजी देण्याचा निर्णय लांबवला’. दुबेच्या बॅटचा तडाखा चहलला सोसावा लागू नये आणि याचा संघाला फटका बसू नये यासाठी श्रेयसने तो निर्णय घेतला. १६व्या षटकात दुबे बाद झाला आणि पुढच्याच षटकात श्रेयसने चहलला गोलंदाजीसाठी पाचारण केलं.
चहलबाबत श्रेयसने अवलंबलेलं धोरण माजी फिरकीपटू पीयूष चावलला पसंत पडलं नाही. तो म्हणाला, ‘आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चावला तिसऱ्या स्थानी आहे. ज्या पद्धतीने चहलला वागणूक देण्यात आली ते मला आवडलं नाही. लोक मॅचअप्स वगैरे गोष्टी बोलत असतात. युझवेंद्र चहल हा स्पर्धेतला सर्वाधिक विकेट्स पटकावणारा गोलंदाज आहे. बंगळुरूतल्या चिन्नास्वामीसारख्या छोट्या मैदानावर फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर त्याने वर्षानुवर्ष विकेट्स घेतल्या आहेत. यापेक्षा चांगलं उदाहरण असू शकत नाही. शिवम दुबे त्याच्या गोलंदाजीवर आक्रमण करू शकतो हे मान्य पण चहल त्याची विकेटही काढू शकतो हेही लक्षात घ्यायला हवं होतं. चहलच्या खात्यात अनेक अस्त्रं आहेत, तो परिस्थितीनुरुप योग्य शस्त्र परजू शकतो’.
मॅचअप्स म्हणजे काय?
मॅचअप्स म्हणजे एखाद्या विशिष्ट फलंदाजाची किंवा गोलंदाजाची विशिष्ट संघाविरुद्ध किंवा फलंदाज-गोलंदाजाविरूद्धची कामगिरी. सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या फलंदाजाचे कच्चे दुवे काय आहेत किंवा एखाद्या गोलंदाजाचं बलस्थान काय आहे हे ओळखून डावपेच आखणे. एखादा फलंदाज प्रामुख्याने लेगसाईडला फटकेबाजी करत असेल तर त्यानुसार क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. एखादा फलंदाज स्वीपचा फटका सातत्याने खेळतो हे डेटातून स्पष्ट होत असेल तर या फटक्यावरच त्याला बाद करण्यासाठी आखणी केली जाते.
मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराहसारखं हुकूमी अस्त्र आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या बुमराहचा वापर एखाद्या ट्रम्पकार्डसारखा करतो. बुमराहची अॅक्शन आणि अचूकता खेळपट्टीवर नव्या आलेल्या फलंदाजांसाठी अवघड ठरते. म्हणूनच नवा फलंदाज खेळपट्टीवर आल्यानंतर हार्दिक बुमराहला गोलंदाजी देतो. बुमराह बहुतांशवेळा त्या फलंदाजाला बाद करत मोहीम फत्ते करतो.
पंजाबचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीची फिरकी खेळू शकत नाही. वरुणच्या पोतडीतील विविध अस्त्रं मॅक्सवेलच्या पचनी पडत नाहीत. त्यामुळे कोलकाता-पंजाब लढतीत मॅक्सवेल फलंदाजीला आला की कोलकाताचा कर्णधार तातडीने वरुणला गोलंदाजीस पाचारण करतो. वरुण मॅक्सवेलला माघारी धाडत कर्णधार आणि संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवतो.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी संथ आणि धीमी आहे. या खेळपट्टीवर खोऱ्याने धावा होत नाहीत हे लक्षात घेऊन चेन्नईचा संघ फिरकीबहुल आक्रमणावर भर देतं. पॉवरप्लेच्या षटकापासून म्हणजे ६ आणि हाणामारीच्या षटकांच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे १६ पर्यंत या षटकांमध्ये अधिकाअधिक फिरकी गोलंदाज गोलंदाजी करतात आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवतात.
मॅचअप्ससाठी काय उपयोगी पडतं?
आयपीएल संघांच्या ताफ्यात विविध प्रकारचे प्रशिक्षक असतात. यामध्ये अॅनालिस्टचाही समावेश असतो. फलंदाज कुठल्या पद्धतीचे फटके खेळतो, मैदानाच्या कुठल्या भागात फटके मारतो, कुठला फटका मारताना तो बाद होतो, कुठल्या गोलंदाजांसमोर तो निरुत्तर ठरतो, बाद होण्यात काही साम्यस्थळं आहेत का हा सगळा डेटा व्हीडिओसकट उपलब्ध असतो. गोलंदाज असेल तर कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी कशी आहे, कुठल्या फलंदाजाला जाळ्यात अडकवलं आहे, कुठल्या फलंदाजाची धास्ती आहे, छोट्या मैदानात गोलंदाजी कशी आहे, दव पडलेलं असताना गोलंदाजी कशी आहे, नवा चेंडू हाताळताना गोलंदाजी कशी आहे असे सगळे तपशील उपलब्ध असतात. या तपशीलांमधून अन्यवार्थ शोधून त्यानुसार डावपेच-योजना आखल्या जातात.