करोना महासाथ सुरू झाल्यानंतर विषाणू संसर्गाशी संबंधित ज्या नव्या संकल्पना आपल्याला ज्ञात झाल्या आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात रूढ झाल्या त्यांमध्ये आर व्हॅल्यू आणि सीटी व्हॅल्यू या दोन प्रमुख संकल्पना आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या करोनाच्या ओमायक्रॉन उत्परिवर्तनाने भारतात करोनाची तिसरी लाट आणली आहे. त्याच वेळी देशात संसर्ग वाढण्याचा वेग म्हणजेच आर व्हॅल्यू १.३० पर्यंत घटल्याचे ताज्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एका बाजूला रुग्णसंख्या धडकी भरवणारी असली तरी घटलेली आर व्हॅल्यू मात्र दिलासा देत आहे. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला सीटी व्हॅल्यू २४ किंवा त्याहून अधिक असलेल्या लक्षणविरहित रुग्णांना करोना निगेटिव्ह समजावे का याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे विचारणा केली गेली आहे. त्यानिमित्ताने आर व्हॅल्यू आणि सिटी व्हॅल्यू म्हणजे काय याचा धांडोळा पुन्हा एकदा घेणे आवश्यक आहे.
आर व्हॅल्यू म्हणजे काय?
करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग म्हणजे त्याची आर व्हॅल्यू होय. संसर्ग झालेला एक रुग्ण किती नागरिकांमध्ये त्या संसर्गाचा प्रसार करतो, याला विषाणूची आर व्हॅल्यू असे म्हणतात. एक रुग्ण जर अनेकांना संसर्गाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरत असेल तर विषाणूची आर व्हॅल्यू अधिक आहे असा स्वाभाविक निष्कर्ष निघतो. भारतात ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येत वाढ दिसू लागल्यानंतर १३ जानेवारीला तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक म्हणजे २.८९ आर व्हॅल्यू नोंदवण्यात आली होती. २४ जानेवारीला त्यात लक्षणीय घट होऊन १.३० आर व्हॅल्यू नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे साथीचा वेगही नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सीटी व्हॅल्यू म्हणजे काय?
करोना संसर्गाचे निदान करण्यासाठी उपलब्ध असलेली सर्वांत अचूक – गोल्ड स्टँडर्ड चाचणी म्हणून – रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन टेस्ट – अर्थात – आरटी – पीसीआर चाचणीचा लौकिक आहे. आरटी – पीसीआर चाचणीतून रुग्णाच्या वैद्यकीय नमुन्यातील आरएनएचे रूपांतर डीएनएमध्ये केले जाते. म्हणजेच आरएनएची डीएनए प्रत (कॉपी) निर्माण केली जाते. या प्रक्रियेत रुग्णाच्या वैद्यकीय नमुन्यामध्ये करोना विषाणू आहे किंवा नाही याचे निदान करणे शक्य होते. विषाणूचे निदान होण्यासाठी आरएनएची डीएनए कॉपी किती वेळा करावी लागली याला ‘सायकल थ्रेशहोल्ड’ व्हॅल्यू म्हणजेच सीटी व्हॅल्यू असे म्हटले जाते.
सीटी व्हॅल्यू कशी मोजतात?
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ३५ ही सीटी व्हॅल्यू निश्चित केली आहे. ज्या रुग्णाच्या आरटी – पीसीआर चाचणीतून ३५ सीटी व्हॅल्यू नोंदवण्यात येईल तो रुग्ण करोना बाधित आहे असे म्हटले जाते. आरएनएची डीएनए कॉपी तयार होताना एक-दोन, दोन-चार, चार-आठ या पटीत ही प्रक्रिया होते. बहुतांश रुग्णांमध्ये ८-१० आवर्तनांमध्ये विषाणूचे निदान होते. काही रुग्णांमध्ये मात्र ३० ते ३५ आवर्तनांनंतर विषाणू आढळतो. कमी आवर्तनांमध्ये विषाणू सापडला तर रुग्णाच्या वैद्यकीय नमुन्यामध्ये विषाणूचे प्रमाण (व्हायरल लोड) अधिक आहे हे स्पष्ट होते. अधिक आवर्तनांनंतर विषाणू सापडला असता विषाणूचे प्रमाण कमी आहे असा निष्कर्ष निघतो.
सीटी व्हॅल्यू आणि आजाराची तीव्रता यांचा संबंध किती?
रुग्णाच्या आरटी-पीसीआर चाचणीच्या अहवालात सीटी व्हॅल्यू नमूद केलेली असते. सीटी व्हॅल्यू कमी असलेल्या रुग्णामध्ये विषाणूचे प्रमाण (व्हायरल लोड) अधिक असते. सीटी व्हॅल्यू अधिक असलेल्या रुग्णांमध्ये तो तुलनेने कमी असतो. मात्र, सीटी व्हॅल्यू आणि रुग्णाची प्रकृती यांचा परस्पर संबंध असेलच असे नाही. विषाणूचे प्रमाण अधिक असलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर असण्याची शक्यता अधिक असते. त्याच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोकाही अधिक असतो. मात्र, रुग्णाची प्रकृती, प्रतिकारशक्ती यांवरही या बाबी अवलंबून असल्याने सीटी व्हॅल्यू कमी असलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीरच असेल, किंवा सीटी व्हॅल्यू अधिक असलेल्या रुग्णाची प्रकृती चांगली असेल असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. त्याबाबतचे निदान किंवा निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतरच करणे योग्य ठरेल.
bhakti.bisure@expressindia.com