सध्या सर्वत्र मेट गाला समारंभाची चर्चा सुरू आहे. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्समध्ये सोमवारी (६ मे) संध्याकाळी हा समारंभ पार पडला. जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती या समारंभात आपली उपस्थिती दर्शवितात. फॅशन जगतातील सर्वांत मोठा समारंभ म्हणूनही याची ओळख आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समारंभाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या समारंभातही अनेक सेलिब्रिटी सुंदर वेशभूषेपासून चित्र-विचित्र वेशभूषा परिधान करून आले होते. पूर्वनिर्धारित थीमवरच सर्व सेलिब्रिटी वेशभूषा परिधान करतात. पण, या समारंभाला इतके महत्त्व कसे? मेट गाला समारंभ आयोजित करण्यामागील उद्देश काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
मेट गाला म्हणजे नक्की काय?
‘मेट गाला’ला अधिकृतपणे मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूट बेनिफिट म्हणतात. हा समारंभ मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी वार्षिक निधी उभारणीसाठी आयोजित केला जातो. मेट गाला साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. १९४८ साली याची सुरुवात करण्यात आली होती. या समारंभातून मिळालेला निधी कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी वापरला जातो. हा निधी इतका असतो की, तो इन्स्टिट्यूटच्या वापरासाठी वर्षभर पुरतो.
हेही वाचा : काँग्रेस मंत्र्याच्या सचिवाच्या सेवकाकडे कोट्यवधींचं घबाड, कोण आहेत आलमगीर आलम?
दरवर्षी ‘मेट गाला’ची थीम वेगळी असते. समारंभाला हजेरी लावणार्या सेलिब्रिटींच्या वेशभूषा भिन्न असल्या तरी त्या एका थीमशी संबंधित असतात. मेट गाला समारंभाचे नियमही फार कठोर असतात. या समारंभात केवळ निमंत्रितांना येण्याची परवानगी असते. कॉस्च्युम इन्स्टिट्यूटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सुमारे ४०० लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच, १८ वर्षांखालील सेलिब्रिटींना यात सहभागी होता येत नाही आणि फोन वापरावर व धूम्रपान करण्यावरदेखील मेट गालामध्ये बंदी आहे. मेट गाला २०२४ ची थीम ‘’गार्डन ऑफ टाइम : ॲन ऑड टू आर्ट अँड इटरनिटी’ ही होती. ही थीम जे जी बॅलॉर्डच्या लघुकथेवर आधारित होती. या समारंभाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असल्याने फॅशनमधील क्रिएटिव्हिटीला वाव मिळाला आहे. त्यांच्या निराळेपणामुळे ‘मेट गाला’त परिधान केलेल्या वेशभूषांची चर्चा वर्षभर होते. त्यात अनेकांच्या वेशभूषेची प्रशंसा केली जाते; तर अनेक सेलिब्रिटी विनोदाचा विषयदेखील ठरतात.
कॉस्च्युम इन्स्टिट्यूट काय आहे आणि या इन्स्टिट्यूटसाठी निधी कसा उभारला जातो?
म्युझियमच्या वेबसाइटनुसार, “कॉस्च्युम इन्स्टिट्यूटकडे पंधराव्या शतकापासून ते आतापर्यंतचा ३३ हजारांहून अधिक वेशभूषा आणि वस्तूंचा संग्रह आहे. हा संग्रह पुरुष, स्त्रिया व मुलांशी निगडित आहे.” १९३७ मध्ये म्युझियम ऑफ कॉस्च्युम आर्ट्सची सुरुवात झाली. १९४६ मध्ये फॅशन उद्योगाच्या आर्थिक साह्याने ‘कॉस्च्युम आर्ट्स म्युझियम’चे विलीनीकरण ‘द मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स’मध्ये करण्यात आले.
‘मेट गाला’ला दरवर्षी विविध प्रायोजकांकडून निधी दिला जातो. यावेळी प्रायोजकांमध्ये टिकटॉक, स्पॅनिश लक्झरी फॅशन ब्रॅण्ड लॉवी व कोंडे नास्ट यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीही कोंडे नास्ट ब्रॅण्डचे नाव प्रायोजकांच्या यादीत होते. या समारंभाच्या तिकिटांच्या विक्रीतूनही मोठ्या प्रमाणात पैसा गोळा होतो. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या मते, या वर्षी एका तिकिटाची किंमत ७५ हजार डॉलर्स म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ हजार डॉलर्स जास्त होती. तर, समारंभातील टेबलची सुरुवात तीन लाख ५० हजार डॉलर्सपासून होती. टेबल सामान्यत: मोठ्या ब्रॅण्ड आणि फॅशन हाऊसद्वारे विकत घेतले जातात.
मेट गाला समारंभाला इतके महत्त्व का?
१९४८ मध्ये फॅशन प्रचारक एलेनॉर लॅम्बर्ट यांनी न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित व्यक्तींना निधीच्या उभारणीसाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासूनच मेट गाला समारंभाची सुरुवात झाली. त्यावेळी प्रत्येक तिकिटाची किंमत ५० डॉलर्स इतकी होती. १९७२ मध्ये फॅशनविषयी लेख लिहिणार्या डायना व्रीलॅण्ड वेशभूषा संस्थेच्या सल्लागार झाल्या. त्यांनीच थीमची कल्पना सुचवली आणि ‘मेट गाला’ न्यूयॉर्कपुरता मर्यादित न ठेवता, त्याला देश-विदेशांत पोहोचवले.
व्होग्यू या फॅशन मासिकाच्या मुख्य संपादक ॲना विन्टॉर आणि कोंडे नास्ट ब्रॅण्डचे ग्लोबल चीफ कंटेंट ऑफिसर यांच्यामुळेच गालाला सध्याचा दर्जा प्राप्त झाला आहे, असे अनेकांचे मत आहे. विन्टॉर या १९९९ पासून या समारंभाच्या मुख्य संयोजक आहेत. त्या वैयक्तिकरीत्या अतिथींची यादी तयार करतात. यावेळी ‘मेट गाला’मध्ये सहभागी झालेल्या भारतीयांमध्ये आलिया भट्टचाही समावेश होता.
हेही वाचा : देशात झपाट्याने वाढतोय कर्करोग, अहवालात धक्कादायक वास्तव उघड; काय आहेत कारणं?
समारंभामध्ये प्रत्येक वर्षासाठी अधिकृतपणे संचालक नियुक्त केले जातात. या वर्षी विन्टॉरव्यतिरिक्त लॅटिनो संगीत कलाकार बॅड बनी, जेनिफर लोपेझ, अमेरिकन अभिनेत्री झेंडया व ऑस्ट्रेलियन अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ यांचाही समावेश होता. रेड कार्पेटवर फोटो काढल्यानंतर पाहुणे नक्की काय करतात हे एक रहस्य आहे. कारण- आतील समारंभ कोणालाही पाहता येत नाही. समारंभात फोन घेऊन जाण्याची परवानगी नसते. त्यामुळे हे आजही एक गूढच आहे. परंतु, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे की, रात्री जेवणापूर्वीच्या समारंभात अतिथींच्या मनोरंजनासाठी अनेक कार्यक्रम होतात; ज्यात मोठमोठ्या कलाकारांचाही सहभाग असतो.