सिद्धार्थ केळकर
निवडणूक प्रचारातील कृत्रिम प्रज्ञेचे ‘हत्यार’
कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर करून चीन भारत, अमेरिका आणि दक्षिण कोरियातील निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतो, असा इशारा ‘मायक्रोसॉफ्ट’ने दिला. त्या पार्श्वभूमीवर, कृत्रिम प्रज्ञा निवडणुकांवर नेमका कशा पद्धतीने प्रभाव टाकू शकते, याचा घेतलेला आढावा…
‘मायक्रोसॉफ्ट’चा नेमका इशारा काय आहे?
भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत यंदा होत असलेल्या निवडणुकांत चीन स्वतःचे हित साध्य करणारा मजकूर कृत्रिम प्रज्ञेद्वारे तयार करून प्रसारित करील, असा इशारा ‘मायक्रोसॉफ्ट थ्रेट ॲनलिसिस सेंटर’ने दिला आहे. तैवानच्या अध्यक्षीय निवडणुकीत चीनने अशाच प्रकारे खोटी माहिती प्रसारित करून तेथील जनतेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. चित्रफिती, ध्वनिफिती, मीम्स आदी माध्यमांतून चुकीची माहिती खरी वाटेल, अशा पद्धतीने प्रसारित करण्याची हातोटी कृत्रिम प्रज्ञेवर आधारित साधनांकडे आहे. त्याचा वापर करून चीन हा हस्तक्षेप घडवून आणेल, अशी भीती ‘मायक्रोसॉफ्ट’ने व्यक्त केली आहे. अर्थात, त्याचा फार मोठा प्रभाव पडेल असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
एआयद्वारे चुकीची माहिती कशी तयार केली जाते?
एआय आधारित साधनाचा – उदाहरणार्थ, चॅटजीपीटी – वापर करायचा झाल्यास आधी त्या साधनाकडे संबंधित विषयाचा मोठा विदा असावा लागतो. कृत्रिम प्रज्ञेवर आधारित अनेक साधने इंटरनेटवरील विदेचा वापर करत असल्याने माहितीचा भरपूर साठा त्यांच्याकडे असतोच. आता आपल्याला हवी ती माहिती या साधनाद्वारे गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे, हे काम माणसेच करतात. त्यासाठी दिला जाणारा ‘प्रॉम्प्ट’ इथे महत्त्वाची भूमिका बजावतो. निवडणुकांचेच उदाहरण घ्यायचे, तर प्रचारात एखादा विषय संबंधित पक्षाला वा उमेदवाराला कशा पद्धतीने लोकांसमोर मांडायचा आहे, हे ठरवून त्याप्रमाणे ‘प्रॉम्प्ट’ देऊन ही माहिती मिळवली जाते आणि त्याचे विश्लेषण केले जाते.
संदेश प्रसारणाचे माध्यम कसे ठरते?
माहितीच्या विश्लेषणानंतर पुढचा टप्पा येतो तिच्या प्रसारणाचा. कोणत्या प्रेक्षकवर्गापर्यंत ही माहिती पोचवायची आहे, त्यानुसार माध्यम ठरते. उदाहरणार्थ, शहरी भागात एखादा संदेश इन्स्टाग्रामवरून पाठवला जाईल, तर ग्रामीण भागात व्हॉट्सॲपचा वापर केला जाऊ शकतो. त्यातही व्हॉट्सॲपवर पाठवायचा संदेश कसा असेल, तो लिखित स्वरूपात असेल, तर किती मोठा ठेवायचा, छायाचित्र वा चित्रफितीच्या माध्यमातून पोचवायचा, तर त्यात चित्रे, छायाचित्रे, अर्कचित्रे, चित्रफिती कशा वापरायच्या, त्याचे संकलन कशा पद्धतीने करायचे, मीम्स कोणते तयार करायचे, याबाबत केवळ ‘प्रॉम्प्ट’ देऊन कृत्रिम प्रज्ञेवर आधारित साधनाद्वारे संदेश तयार केला जातो. चित्र वा ध्वनिचित्रफितींसाठी सोरा, दाली-२ आदी कृत्रिम प्रज्ञेवर आधारित साधने वापरता येतात. यामध्ये कोणत्या प्रेक्षकवर्गाला कोणता संदेश द्यायचा, याचेही नियोजन करून त्याप्रमाणे संदेश प्रसारित करता येतो. संदेश कोणत्या वेळेला पाठवायचा, त्याचे शब्दांकन कसे असेल, त्याचे पॅकेजिंग कसे असेल, हे सर्व कृत्रिम प्रज्ञेद्वारे ठरवता येते.
या संदेश प्रसारणाचे परिणाम काय?
सन २०१६ मध्ये अमेरिकेतील निवडणुकीत ‘केंब्रिज ॲनॅलिटिका’ने या प्रकारच्या संदेश प्रसारणाचा वापर केल्याचे बोलले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे संदेश कशा प्रकारे पोचवायचे, याची विश्लेषणातून मिळालेली माहिती प्रचारात वापरली गेली. याचा उपयोग विशिष्ट प्रकारचे कथानक (नरेटिव्ह) रचता येण्यासाठी होत असल्याने साहजिकच समाजमनावर परिणाम करणे आणि त्याद्वारे निवडणुकीत एखाद्या पक्षाबाबत वा उमेदवाराबाबत सकारात्मक वा नकारात्मक मत तयार करणे शक्य होते. ‘डीपफेक’चा वापर हे यातील आणखी एक आव्हान. याद्वारे तर चुकीची माहिती खरी म्हणून प्रसारित करणे सहज शक्य झाले आहे. एखाद्याच्या आवाजाची हुबेहुब नक्कल उतरवून ती व्यक्तीच जणू संदेश पाठवते आहे, असे भासवणे कृत्रिम प्रज्ञेद्वारे शक्य आहे. त्याचप्रमाणे, ‘डीपफेक’द्वारे आधीच घडलेल्या एखाद्या अप्रिय घटनेचा व्हिडिओ केवळ राजकीय फायद्यासाठी निवडणुकीच्या वेळी, तो विरोधकांनी घडविल्याचे भासविले गेल्यास त्यातून अनर्थही घडू शकतो. कृत्रिम प्रज्ञेच्या साधनांना आता भारतीय प्रादेशिक भाषांतही विदा मिळण्याची सोय होत आहे. त्यामुळे तर भारतासारख्या देशात याचा अधिक व्यापक गैरवापरही होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम प्रज्ञेच्या गैरवापराचे नियमन हेच आता अनेक देशांच्या सरकारांपुढचे मोठे आव्हान असणार आहे.