कदाचित, मी असे आयुष्य जगू शकलो असतो…हा किती आनंदी आहे…याचे घर किती सुंदर आहे…माझ्याकडेही अशी गाडी असती तर…. समोरच्या माणसाला पाहून तुम्हालाही असे विचार येतात का? तुम्ही पुरेसे पैसे कमावत नाही,असे तुम्हाला वाटते का? स्वतःची तुलना इतरांशी करता का?… अहो, तुम्हीच नाही अनेकांना हे विचार आणि अनेकांना हे प्रश्न पडतात. अलीकडे याचे प्रमाण वाढले आहे. त्याला कारणीभूत आहे सोशल मीडिया. तरुणांमध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे. कारण- इतर वर्गांच्या तुलनेत तरुण वर्ग सोशल मीडियाचा वापर जास्त करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल प्रत्येक गोष्ट तरुण पिढीला सोशल मीडियावर पोस्ट करणे आवडते. तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी जर कोणी महागडा फोन घेतला, गाडी घेतली, सुट्ट्यांमध्ये फिरायला गेला, तर त्याच्या पोस्ट पाहून तुम्हालाही हेवा वाटू शकतो. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आणखी चांगले काही करू शकला असता, असेही विचार तुमच्या मनात येतात. इतरांशी तुलना केल्यामुळे या गोष्टी घडतात. तुलनेमुळेच निराशा आणि नकारात्मक विचार येतात. असे म्हणतात तुलना कधीही संपत नाही, मात्र आपल्या आयुष्यातील आनंद याच तुलनेने संपतो. याच तुलनेच्या नादात तरुणांमध्ये आजकाल ‘मनी डिसमॉर्फिया’ हा आजार वाढत आहे. तुम्हालाही सारखी तुलना करण्याची सवय असेल, तर हा आजार तुम्हालाही असू शकतो. हा आजार काय आहे? सोशल मीडियामुळे हा आजार होतो का? यावर उपाय काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

‘मनी डिसमॉर्फिया’ म्हणजे काय?

“’मनी डिसमॉर्फिया’ हा आपल्या आर्थिक वास्तवाविषयीचा विकृत दृष्टिकोन आहे. ज्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेऊ शकतो,” असे कुटुंब आणि आर्थिक नियोजन तज्ञ वकील अली कॅटझ यांनी ‘बिझनेस इनसाइडर’ला सांगितले. ‘मनी डिसमॉर्फिया’ असल्यास आपल्या पैशांचे नियोजन कसे करावे? किती खर्च करावा? याचे भान राहत नाही. एकापाठोपाठ एक व्यक्ती चुकीचे निर्णय घेत जातो. वित्त कंपनी ‘क्रेडिट कर्मा’च्या अलीकडील अहवालानुसार, जवळजवळ एक तृतीयांश अमेरिकन लोकांमध्ये ‘मनी डिसमॉर्फिया’ आढळतो. असे व्यक्ती, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची तुलना इतरांशी करतात, ज्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता येते. तरुण पिढीमध्ये ‘मनी डिसमॉर्फिया’ अधिक सामान्य असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.

सुमारे ४३ टक्के ‘जेन झी’ आणि ४१ टक्के ‘मिलेनियल्स’मध्ये हा आजार आढळून येतो. ‘जेन झी’ आणि ‘मिलेनियल्स’ संदर्भात अनेकांना माहीत नसेल, तर ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, जेन झी म्हणजे जनरेशन झेड. १९९७ ते २०१५ या दरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या पिढीला ‘जेन-झी’ असे म्हटले जाते. तर १९८० आणि १९९०च्या मध्यकाळात जन्माला आलेल्या पिढीला ‘मिलेनियल्स’ असे म्हणतात. या दोन पिढ्यांमध्ये ‘मनी डिसमॉर्फिया’चे प्रमाण अधिक असण्याचे कारण म्हणजे, ते सतत त्यांच्या आर्थिक परिस्थितीची तुलना इतरांशी करतात आणि इतरांप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात.

यासाठी सोशल मीडिया कारणीभूत आहे का?

अमेरिकेत आर्थिक परिस्थितीविषयी शंका वाटणे, अगदी सामान्य आहे. अमेरिकतील नागरिकांमधील दुसर्‍या महायुद्धातील पिढीमध्ये आर्थिक परिस्थितीविषयी भीती आहे. मुळात जन्मापासून ते त्याच मानसिकतेत जगत आले आहेत. “अशी मानसिकता त्यांना मिळालेल्या संगोपनातूनच निर्माण झाली आहे. आर्थिक अडथळे, पैशांचा विचार याच गोष्टी त्यांच्यासमोर घडत आल्या आहेत.” असे एरिन लॉरी यांनी ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या महितीत सांगितले. परंतु, जे अश्या परिस्थितीत जगले नाहीत, त्यांच्यात आपल्या आर्थिक परिस्थितीविषयी संभ्रम निर्माण होणे सामान्य नाही.

देशातील जेन झी आणि मिलेनियल्स पिढीने आयुष्यात एकदाच युद्धासारख्या परिस्थितीचा सामना केला आहे. ते म्हणजे कोविड-१९ च्या काळात. परंतु यात मोठा बदल असा आहे की, आजच्या तरुणांना सतत माहिती उपलब्ध होत असते. देशभरात किंवा इतर देशात काय घडत आहे, याची माहिती त्यांना २४ तास सोशल मीडियावर मिळत असते. याचा थेट परिणाम तरुणांच्या मानसिकतेवर होतो. शेअर मार्केटमध्ये मंदी आली, या अमुक देशातील अर्थव्यवस्था ढासळली, अशा बातम्या सोशल मीडियावर येत असतात. त्यामुळे ‘मनी डिसमॉर्फिया’ सारख्या परिस्थितीसाठी कुठे न कुठे सोशल मीडिया कारणीभूत आहे.

‘एडेलमन फायनान्शिअल इंजिन्स’च्या आर्थिक नियोजन संचालक इसाबेल बॅरो यांनी ‘सीएनबीसी’ला सांगितले की, “तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल वाईट वाटणे आणि तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता, या दोन्हींचा एकमेकांशी थेट संबंध आहे.” यूएस-आधारित वित्तीय सेवा फर्मच्या अभ्यासानुसार, एक चतुर्थांश ग्राहक सोशल मीडियामुळे त्यांच्याकडे असलेल्या पैशाबद्दल समाधानी नसतात. यामुळे ते लक्झरी वस्तू खरेदी करण्यावर किंवा इतर व्यर्थ गोष्टींवर जास्त खर्च करतात.

“अशी धारणा आहे की, तुम्ही जर स्वतःला यशस्वी समजत असाल तर तुमच्याकडे महागडे घड्याळ किंवा चांगली कार असणे आवश्यक आहे. परंतु यात काहीही सत्य नाही, ” असे आर्थिक नियोजक आणि फ्लोरिडामधील लाईफ प्लॅनिंग पार्टनर्सच्या संस्थापक कॅरोलिन मॅक्लानाहन यांनी ‘सीएनबीसी’ला सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आर्थिक परिस्थितीबद्दल चिंता असणे, ही समस्या अनेक काळापासून आहे आणि सामान्य आहे. परंतु सोशल मीडियाने याला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवले आहे.”

‘मनी डिसमॉर्फिया’चा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?

डिसमॉर्फिया हा आजार नसून एखाद्या विसंगती किंवा विकृतीसारखे आहे. यात आपल्याला आपण कुठे आहोत आणि आपण कुठे असायला हवे यामधील अंतर जाणवते, असे थेरपिस्ट लिंडसे ब्रायन-पॉडविन यांनी ‘लाइफहॅकर’ला सांगितले.

हेही वाचा : चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे गुन्हा आहे का? सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय?

‘मनी डिसमॉर्फिया’ होऊ नये यासाठी ‘लाउड बजेटिंग’ नावाचा एक ट्रेंड सुरू करण्यात आला आहे; ज्यात तरुणांना वायफळ खर्च करण्यापासून रोखले जाते. टिकटॉकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील याचा प्रचार केला जात आहे. ‘लाउड बजेटिंग’मध्ये एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करताना, ती गोष्ट खरंच गरजेची आहे का? हा विचार येण्यास भाग पाडले जाते आणि अवास्तव खर्च करण्यापासून रोखले जाते. यासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा पर्यायदेखील तज्ञांनी सुचवला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is money dysmorphia rac