-शैलजा तिवले
प्राण्यापासून होणाऱ्या मंकीपॉक्स (What is Monkeypox) या आजाराचा उद्रेक जगभरात १२ देशांमध्ये आढळून आला आहे. विशेष म्हणजे या देशांमध्ये यापूर्वी या आजाराचा प्रादुर्भाव नसूनही हा उद्रेक झाल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंकीपॉक्स म्हणजे नेमके काय?
मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून होणारा संसर्गजन्य आजार असला तरी प्राण्यांद्वारे माणसांमध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील वर्षावनांच्या (ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट) भागात म्हणजेच मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळतो. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेमध्ये या आजाराचे दोन वेगवेगळे प्रकार आढळतात. खार, उंदीर, माकडाच्या विविध प्रजातींसह इतर प्राण्यांमध्ये या आजाराचे विषाणू आढळले आहेत.

माणसाला हा आजार कसा झाला?
माणसामध्ये मंकीपॉक्स हा आजार प्रथम १९७० मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो येथे नऊ वर्षाच्या बालकांमध्ये आढळला. या भागामध्ये देवी रोगाचे निर्मूलन १९६८ साली झाले होते. त्यानंतर काँगो खोऱ्यातील वर्षावनांचा विभाग आणि ग्रामीण भागांमध्ये अनेक रुग्ण आढळले. बेनिन, कॅमेरून, द सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो, लिबेरिया, नायजेरिया, दक्षिण सुदान अशा आफ्रिकेतील ११ देशांमध्ये १९७० पासून या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. नायजेरियामध्ये या आजाराचा २०१७ पासून मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. अद्यापही हे उद्रेक सुरू असून आत्तापर्यत ५०० संशयित तर २०० रुग्ण आढळले आहेत.

इतर देशांमध्ये हा आजार यापूर्वी आढळला आहे का?
आफ्रिकेव्यतिरिक्त बाहेरील देशात, अमेरिकेत २००३ मध्ये प्रथम या आजाराचे रुग्ण आढळले होते. मंकीपॉक्स बाधित कुत्र्याच्या संपर्कात आल्याने हा आजार तेव्हा माणसाला झाल्याचे निदर्शनास आले होते. घानामधून आलेल्या प्राण्यासोबत हे कुत्रे अमेरिकेत निर्यात करून आणले होते. त्यानंतर २०१८, २०१९ आणि २०२१ मध्ये विविध देशांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे.

एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो का?
मंकीपॉक्स हा प्राण्यापासून होणारा संसर्गजन्य आजार असला तरी प्राण्यांद्वारे माणसांमध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा आजार आहे. बाधित व्यक्तीच्या थुंकीद्वारे, शिंकल्यानंतर बाहेर पडणारे थेंब, अंगावर आलेले पुरळ किंवा त्यामधून बाहेर पडणारे द्रव याच्याशी दुसऱ्या व्यक्तीचा संपर्क आल्यास त्या व्यक्तीलाही मंकीपॉक्सची बाधा होऊ शकते. बाधित व्यक्तीच्या सर्वाधिक काळ संपर्कात आणि अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तींना या आजाराची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. गर्भामध्ये असलेल्या बाळालाही आईपासून या आजाराची बाधा होऊ शकते.

लक्षणे काय आहेत? (Monkeypox Symptoms)
या आजाराची लक्षणे देवीच्या रोगासारखीच आहेत. बाधा झाल्यापासून लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी ६ ते १३ दिवसांचा असतो. काही रुग्णांमध्ये हा ५ ते २१ दिवसांपर्यतचाही असू शकतो. या काळात व्यक्तीमार्फत सहसा आजाराचा प्रसार होत नाही. बाधित व्यक्तीला लागण झाल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये संक्रमण दिसून येते.

पहिल्या टप्प्यात रोगाच्या आक्रमण स्थितीमध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, पाठदुखी, स्नायू आणि अंगदुखी, खूप थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. अंगावर पुरळ येणे हे आजाराचे एक प्रमुख लक्षण असून सुरुवातीला कांजिण्या, गोवर किंवा देवीसारखे हे पुरळ दिसते. पुरळ येण्याच्या एक ते दोन दिवस आधी बाधीत व्यक्तीमार्फत आजाराचा प्रसार होण्याची शक्यता असते.

दुसऱ्या टप्प्यांत अंगावर पुरळ येण्यास सुरूवात होते. ताप आल्यानंतर साधारण एक ते तीन दिवसांनी या प्रक्रियेस सुरुवात होते. आजारात सर्वात जास्त पुरळ हे चेहऱ्यावर येतात, असे लक्षात आले आहे. हळूहळू हे पुरळ पाण्यासारखा द्रव निर्माण करतात, त्यानंतर कोरडे होणे आणि गळून जाणे अशा क्रमाने निघून जातात. पुरळाची खपली जाईपर्यत ही व्यक्ती संसर्ग पसरवू शकते. या आजाराची लक्षणे दोन ते चार आठवडे असतात.

देवीचा विकार आणि मंकीपॉक्स यांचा काही संबध आहे का ?
ऑर्थोपॉक्स विषाणूच्या वर्गातील मंकीपॉक्स या विषाणूपासून हा आजार होतो. देवी रोगाचे विषाणू देखील ऑर्थोपॉक्स विषाणूच्या वर्गातीलच होते. मंकीपॉक्स या आजाराचे स्वरुप हे देवीच्या रोगासारखेच आहे. जगभरातून देवीच्या रोगाचे उच्चाटन १९८० मध्येच झाले आहे.
आजाराच्या तीव्रतेच्या तुलनेत मंकीपॉक्स

देवीच्या रोगाच्या तुलनेत हा विकार सौम्य आहे. बालकांमध्ये आजाराची तीव्रता जास्त आढळत आहे. देवीच्या रोगाचे जगभरातून उच्चाटन झाल्यानंतर या आजाराचे लसीकरण जवळपास ४० किंवा त्याहून अधिक वर्षे बंद केले आहे. देवीच्या लशीने मंकीपॉक्सपासूनही संरक्षण मिळते. त्यामुळे सध्या या आजाराची बाधा देवीची लस न मिळालेल्या साधारण ४० ते ५० वर्षाखालील व्यक्तींमध्ये होण्याची जास्त शक्यता आहे. पूर्वी या आजाराचा मृत्यूदर जवळपास ११ टक्क्यांपर्यत आढळून आला आहे. परंतु गेल्या काही वर्षात हे प्रमाण तीन ते सहा टक्के झाले आहे.

यावर उपचार उपलब्ध आहेत का? (Monkeypox Treatment)
बाधित व्यक्तीच्या अंगावरील पुरळाचा पापुद्रा किंवा त्यामधील द्रवाच्या तपासणीतून या आजाराचे निदान केले जाते. रक्ताच्या तपासणीमध्ये याचे निदान फारसे होत नाही.

देवीची लस मंकीपॉक्सच्या प्रतिबंधावर सुमारे ८५ टक्के प्रभावशाली असल्याचे आढळले आहे. मंकीपॉक्सवरील नवीन लशीला २०१९ साली परवानगी देण्यात आली आहे. हा आजार झाल्यानंतर लक्षणांनुसार उपचार केले जातात. देवीच्या आजारावरील औषधाचा मंकीपॉक्सवर वापर करण्यास युरोपीयन मेडिकल असोसिएशनने याचवर्षी परवानगी दिली आहे.

प्रतिबंधासाठी काय करता येईल? (Monkeypox Prevention)
माणसांमध्ये या आजारांचा प्रसार बहुतांशपणे प्राण्याच्या माध्यमातून झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आजारी किंवा मृत प्राण्यांशी थेट संपर्क शक्यतो टाळावा. प्राण्यांचे मांस योग्य शिजवून खावे. बाधित व्यक्तींशी किंवा त्यांच्या वापरातील वस्तूशी संपर्क टाळावा. बाधित व्यक्तीची काळजी घेताना शरीराचे रक्षण होईल असे हातमोजे वापरावेत तसेच संरक्षणासाठी इतर साधनांचा वापर करावा.

सध्या कोणत्या देशांमध्य या आजाराचे रुग्ण आढळले आहेत?
जगभरात सध्या आजाराचा प्रादुर्भाव अंतर्जन्य स्थितीत नसलेल्या १२ देशांमध्ये १३ ते २१ मे या काळात ९२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण पोर्तुगाल, स्पेन आणि ब्रिटन या देशांमध्ये आढळले आहेत. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, अमेरिका, इटली. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, नेदरलॅंडस, कॅनडा या देशांमध्येही रुग्ण आढळले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is monkeypox causes symptoms treatment and prevention print exp scsg