गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात किंवा नवीन वस्तूची खरेदी शुभमुहूर्तावर करण्याची प्रथा आहे. ते काम यशस्वी होईल, अशी त्यामागची भावना आहे. शेअर बाजारमध्ये गुंतवणूकदेखील याच मुहूर्तावर गुंतवणूक करून येणाऱ्या वर्षांमध्ये भरपूर नफा मिळेल, अशी पूर्वापार धारणा आहे. मुहूर्त ट्रेडिंग काय असते, ते कधी पार पडते, याबद्दल जाणून घेऊया.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात १९५७मध्ये, तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईमध्ये १९९२मध्ये झाली होती. दिवाळीच्या दिवसातील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका तासाच्या कालावधीसाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात येते. व्यापाऱ्यांसाठी हा बाजारात प्रवेश करण्याचा एक शुभ मुहूर्त समजला जातो. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार मुहूर्ताच्या वेळा निर्धारित करतात. जो कुणी या एका तासाभराच्या काळात ट्रेडिंग करतो त्याच्याकडे संपूर्ण वर्षभर धनसंचय आणि भरभराट साधण्याची सर्वोत्तम संधी असते, अशी शेअर बाजारातील दलाल (ब्रोकर), ट्रेडर आणि गुंतवणूकदार यांची धारणा आहे.

मुहूर्त ट्रेडिंगची वेळ काय?

भांडवली बाजारातील परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजनानिमित्त सोमवारी संध्याकाळी बाजारात मुहूर्ताचे सौदे पार पडणार आहेत. राष्ट्रीय तसेच मुंबई शेअर बाजारात मुहूर्ताचे हे विशेष सौदे संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ या तासाभरादरम्यान पार पडतील. हिंदू नववर्ष अर्थात विक्रम संवत २०७९चे स्वागत या निमित्ताने बाजाराकडून केले जाईल. मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा सुमारे ६०पेक्षा अधिक वर्षांपासून सुरू असली तरी बहुतांश भारतीयांना त्याबद्दल फारशी माहिती नाही.

मुहूर्त ट्रेडिंगबाबत इतिहास काय सांगतो?

मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सामान्यत: वधारून बंद होतो. स्टॉक्स एक्स्चेंजेस पाठोपाठ आता कमोडिटी एक्स्चेंजेसनेही गुंतवणूकदारांसाठी मुहूर्त ट्रेडिंग सुरू केले आहे. व्यापारी समुदायासाठी दिवाळीपासून नव्या वित्तवर्षाचा प्रारंभ होत असतो. यात व्यापारी ‘चोपडा’ किंवा ‘शारदा पूजा’ करतात. यात सर्व जुनी खातेपुस्तके वा वहीखाते बंद करून नव्या उघडल्या जातात. गेल्या वर्षातील १५ मुहूर्त ट्रेडिंग व्यवहारात आतापर्यंत ११ वेळा भांडवली बाजार वधारून बंद झाला होता. तर चारवेळा निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

मुहूर्त ट्रेडिंगसाठी समभाग कसे निवडावे?

अनेक दलालीपेढ्या दिवाळीच्या मुहूर्तावर समभाग खरेदीसाठी विविध क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सुचवत असतात. मात्र या दिवशी समभाग खरेदी केल्यास चांगला परतावा मिळेलच असे नाही. तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या दिवशी एखाद्या समभागाने चांगली कामगिरी केली तरी भविष्यात त्याची कामगिरी त्याच्या मूलभूत आणि कंपनीच्या धोरणांवर अवलंबून असते. यामुळे अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

या काळात गुंतवणुकीचा विचार करताना समभाग नाही तर एका उद्योगात किंवा व्यवसायात गुंतवणूक अथवा तो व्यवसाय विकत घेत असल्याचा विचार करून समभागाची निवड करावी.

समभाग निवडण्यासाठी हे महत्त्वाचेच :

कंपनीचे व्यवस्थापन

कंपनीचे बिझनेस मॉडेल

कंपनीचे इतर स्पर्धक

कंपनी काम करत असलेल्या क्षेत्राला भविष्यातील मागणी

कंपनीची मागील काही वर्षातील आर्थिक कामगिरी, नफा, तोटा, महसूल.