अमेरिकेत २० जणांना ओरोपूश या गूढ विषाणूची बाधा झाल्याचे अमेरिकेतील रोगनियंत्रण व प्रतिबंध संस्थेने २७ ऑगस्टला जाहीर केले. क्युबातून परतलेल्या प्रवाशांमध्ये हा संसर्ग दिसून आला. ॲमेझॉन खोऱ्यात आढळून येणारा हा विषाणुसंसर्ग अमेरिकेत प्रथमच नोंदविण्यात आला आहे. हा कीटकजन्य आजार असून, २०२३ पासून ॲमेझॉन खोऱ्याच्या बाहेर त्याचा संसर्ग आढळून येत आहे. यामुळे ब्राझीलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या विषाणूचा शोध लागल्यापासून ७० वर्षांत आतापर्यंत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. यामुळे दक्षिण अमेरिकेतील देशांमधील आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. त्यातच आता हा रोग अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. मातेपासून गर्भाला या रोगाचा संसर्ग होऊ शकतो आणि त्यावर अद्याप कोणतीही लस अथवा उपचार उपलब्ध नाहीत. या गूढ रोगामुळे जगासमोर आता नवीन आरोग्य संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वाधिक प्रादुर्भाव कुठे?

दक्षिण अमेरिकेत यंदा या आजाराचे ८ हजार रुग्ण आढळले आहेत. त्यात ब्राझीलमध्ये सर्वाधिक रुग्ण असून, बोलिव्हिया, कोलंबिया आणि क्युबातही रुग्ण आढळले आहेत. प्रथमच या रोगामुळे मृत्यू झाले असून, यामुळे पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनने या रोगाची धोक्याची पातळी मध्यमवरून तीव्र केली आहे. ओरोपूश संसर्गात रुग्णाला पूर्वी सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे जाणवत असत. आता त्यात बदल होऊन रुग्णांचा मृत्यूही होऊ लागला आहे. ब्राझील आणि क्युबामध्ये प्रवास केलेल्या अमेरिका, स्पेन, इटली आणि जर्मनीतील नागरिकांना हा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

हेही वाचा: इस्रोने गगनयानमधील ह्युमनॉइडच्या मेंदूसाठी कवटीची रचना कशी केली?; काय आहेत तिची वैशिष्ट्ये?

संसर्ग कसा होतो?

ओरोपूश हा विषाणू असून, तो कीटकांमार्फत पसरतो. डेंग्यू, झिका, पीतज्वर अथवा चिकुनगुन्या या कीटकजन्य आजारांच्या विषाणूपेक्षा तो वेगळा आहे. हे सर्व आजार डासांमार्फत पसरतात. ओरोपूश या विषाणूचा वाहक मिज माशी आहे. या माशीमार्फत मानवाला या विषाणूचा संसर्ग होतो. या विषाणूचे इतर कीटकही वाहक असण्याची शक्यता संशोधक आता व्यक्त करीत आहेत. कारण डासांसह इतर कीटकांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे.

साथ किती मोठी?

कॅरेबियन बेटांतील त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये १९५५ मध्ये हा विषाणू सर्वप्रथम आढळला. त्यानंतर १९६० मध्ये ब्राझीलमध्ये स्लॉथ प्राण्याच्या रक्ताच्या नमुन्यात हा विषाणू सापडला. तेव्हापासून ॲमेझॉन खोऱ्यात अधूनमधून या रोगाची साथ येते. या रोगाची साथ ॲमेझॉन खोऱ्याबाहेर दिसून येत आहे. आधी या विषाणूवर लक्ष ठेवले जात नव्हते. त्यामुळे त्याचा प्रसार ॲमेझॉनच्या खोऱ्याच्या बाहेर झाला असला, तरी त्याची नोंद नाही. आता त्यावर लक्ष ठेवले जात असून, युरोप आणि अमेरिकेपर्यंत त्याचे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे या रोगाची साथ सुरू होण्याचा धोका आहे.

हेही वाचा: भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं, महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्वाधिक तणावात; कारण काय?

लक्षणे कोणती?

ओरोपूश आजाराची लक्षणे ही डेंग्यूसारखी आहेत. त्यात ताप, डोकेदुखी, स्नायू अथवा सांधेदुखी, डोळ्यांच्या मागील बाजूस दुखणे, उलट्या आणि मळमळणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे केवळ लक्षणांवरून रुग्णाचे निदान करणे अशक्य ठरते. प्रयोगशालेय तपासणीतूनच या रोगाचे निदान केले जाऊ शकते. या रोगाची लक्षणे आधीपासून सौम्य स्वरूपाची नोंदविण्यात आली आहेत. काही तीव्र स्वरूपाची लक्षणेही नोंदविण्यात आली असून, त्यात मेंदूच्या क्रियेत बिघाड अथवा मेंदूत रक्तस्राव झाल्याची उदाहरणेही आहेत. सर्वसाधारणपणे या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर सात ते आठ दिवसांत रुग्ण बरा होतो.

विषाणू अधिक धोकादायक?

नवजात बालकांमध्ये पहिल्यांदाच ओरोपूशची प्रतिपिंडे आढळून आली आहेत. त्यातून मातेपासून गर्भाला संसर्ग होत असल्याची बाब समोर आली आहे. मात्र, गर्भावर या संसर्गाचा नेमका काय परिणाम होतो, यावर अद्याप संशोधन झालेले नाही. एका प्रकरणात गर्भवतीला ओरोपूशची लक्षणे दिसून आली. काही आठवड्यांनंतर तिच्या गर्भाचा मृत्यू झाला. या गर्भाच्या अनेक अवयवांत हा विषाणू आढळून आला. आणखी एका प्रकरणामध्ये ओरोपूशचा संसर्ग झालेल्या महिलेने बाळाला जन्म दिला मात्र, काही आठवड्यांतच त्याचा मृत्यू झाला. या बाळाच्या शरीरातील ऊती आणि मेंदूमध्ये या विषाणूचे अंश आढळून आले. या रोगावर अद्याप फारसे संशोधन झालेले नसल्याने त्यापासून निर्माण होणारा धोका समोर आलेला नाही. मात्र, आरोग्य संघटनांनी आधीच या संकटांची नांदी करून जगाला सावध करण्याची भूमिका घेतली आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is mysterious oropouche virus spread in usa europe know the symptoms and origin print exp css