८ डिसेंबरपासून नेपाळ-भारत सीमेवरील बरियापूर गावात गढीमाई उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवात दूरदूरहून हजारो भाविक एकत्र येतात. या भागात गढीमाई सणाला फार महत्त्व आहे. मात्र, याच ठिकाणी या उत्सवावरून वाददेखील निर्माण झाला आहे. वादाचे कारण म्हणजे दर पाच वर्षांनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवात हजारो प्राण्यांची हत्या केली जाते. या प्राण्यांमध्ये उंदीर, कबुतरे, बकऱ्या व म्हशींचादेखील समावेश असतो. या उत्सवात सामूहिक बळी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे हिंदू देवी गढीमाई संतुष्ट झाल्यामुळे समृद्धी मिळते, अशी मान्यता आहे. या उत्सवाला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव म्हणूनही ओळखले जाते जगभरातील प्राणीप्रेमींकडून या उत्सवाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. काय आहे गढीमाई सण? आणि त्यादरम्यान हजारो प्राण्यांचा बळी का दिला जातो? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
गढीमाई उत्सव म्हणजे काय?
राजधानी काठमांडूच्या दक्षिणेस सुमारे १६० किलोमीटर अंतरावर १२ जिल्ह्यातील बरियारपूरच्या गढीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी गढीमाई उत्सव आयोजित केला जातो. गढीमाई उत्सवाची सुरुवात २५० वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले जाते. अशी आख्यायिका आहे की, गढीमाई मंदिराचे संस्थापक भगवान चौधरी यांना स्वप्न पडले की, देवी गढीमाईला वाईटापासून संरक्षण करण्यासाठी आणि समृद्धी व शक्तीचे आश्वासन देण्यासाठी रक्त हवे आहे. देवीने मानवी बलिदान मागितले; परंतु चौधरी यांनी त्याऐवजी एका प्राण्याचे बलिदान दिले. तेव्हापासून या सणाला दर पाच वर्षांनी प्राण्यांचा सामूहिक बळी दिला जातो.
हेही वाचा : ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
आज या उत्सवात सहभागी होणाऱ्यांना असा विश्वास आहे की, बकरी, उंदीर, कोंबडी, डुक्कर, एक कबूतर व म्हशी यांचा समावेश असलेल्या पशुबळींमुळे वाईट गोष्टींचा अंत होतो आणि समृद्धी येते. या वर्षीच्या उत्सवात किमान ४,२०० म्हशी, हजारो बकऱ्या व कबुतरांचा बळी दिला गेल्याचे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल (एचएसआय) च्या अंदाजानुसार २००९ मध्ये ५,००,००० जनावरांची कत्तल करण्यात आली होती. तेव्हापासून हे प्रमाण घटले असून, २०१४ व २०१९ मध्ये एकूण २,५०,००० जनावरांचा बळी देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
गढीमाई उत्सव रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न
जगभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी गढीमाई उत्सवाचा निषेध केला असून, अनेक प्राण्यांच्या मृत्यूंबद्दल संताप व्यक्त केला आहे. पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा)ने नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना पत्र लिहून, या वर्षीच्या गढीमाई उत्सवापूर्वी प्राण्यांची सामूहिक कत्तल थांबविण्यासाठी निर्णायक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पेटा इंडियाच्या व्हेगन प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापक किरण आहुजा म्हणाले, “केवळ प्राण्यांसाठीच नाही, तर आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सामूहिक पशुबलिदान थांबवले पाहिजे.” त्यांनी पुढे सांगितले, “संपूर्ण परिसर म्हशींची डोकी आणि रक्ताने भरलेला होता. तो परिसर अगदी अस्वच्छ होता; ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. बळी दिला जात असताना तिथे अनेक लहान मुले होती. ते त्यांच्यासाठी अत्यंत क्लेशकारक असू शकते,” असे ‘साउथ चायना मॉर्निंग’ पोस्टने म्हटले आहे. माजी फ्रेंच अभिनेता ब्रिजिट बार्डोट यांनी नेपाळ सरकारला एक पत्र लिहून या हत्या हिंसक, क्रूर व अमानवीय असल्याचा युक्तिवाद केला होता.
एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आचार्य प्रशांत यांनीदेखील भक्तांना गढीमाई उत्सवाच्या काळात पावित्र्य राखण्यास सांगितले आहे. त्यांनी असे म्हटले होते की, ईश्वराच्या नावाखाली प्राण्यांची कत्तल केल्याने उपासनेची भावना कमी होते. प्राणी कल्याण कार्यकर्त्या गौरी मौलेखी यांच्या याचिकेनंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सीमेपलीकडे नेपाळमध्ये जिवंत प्राण्यांची वाहतूक करण्यास मनाई केली. त्यामुळे २०१४ मध्ये प्राण्यांची कत्तल करण्याचे प्रमाण कमी झाले. योगायोगाने सणासाठी बळी दिले जाणारे अनेक प्राणी भारतापासून नेपाळपर्यंत सीमा ओलांडतात. फेडरेशन ऑफ ॲनिमल वेल्फेअर ऑफ नेपाळच्या अध्यक्षा स्नेहा श्रेष्ठ यांच्या म्हणण्यानुसार, ८० टक्के प्राणी भारतातून येतात.
त्याच्या एक वर्षानंतर गढीमाई मंदिराच्या काळजीवाहूंनी घोषणा केली की, हा उत्सव ‘रक्तमुक्त’ असेल. परंतु, त्यांनी नंतर स्पष्ट केले की, ते जनावरांची कत्तल करणार नसले तरी ते भक्तांना तसे करण्यापासून रोखणार नाहीत. मंदिराचे पुजारी मंगल चौधरी यांनी ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ला सांगितले, “लोक या विश्वासाने येतात की, येथील यज्ञ त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करील. आम्ही भाविकांना प्राण्यांचा बळी देण्यास प्रोत्साहन देत नाही; परंतु जर त्यांनी ते आणले, तर आम्ही त्यांच्याकडे पाठ फिरवत नाही. या वर्षीच्या उत्सवापूर्वी भारताच्या माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनीही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून यज्ञासाठी राज्यातून नेपाळमध्ये गुरांची अवैध वाहतूक थांबवण्याची विनंती केली होती. गांधींनी त्यांच्या पत्रात म्हटले की, सुमारे १० दशलक्ष (एक कोटी) किमतीच्या भारतीय म्हशींची दर महिन्याला तस्करी केली जाते आणि नेपाळच्या बाजारपेठेत त्यांची विक्री होते.
भक्तांची प्रतिक्रिया काय?
परंतु, प्राणी हक्क कार्यकर्त्यांच्या अनेक प्रयत्नांनंतर आणि अगदी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने सणातील जिवंत प्राणी बलिदान बंद करण्याच्या बाजूने निर्णय देऊनही ही प्रथा सुरूच आहे. उपेंद्र कुशवाह यांचे कुटुंब वर्षानुवर्षे या उत्सवाचा भाग आहे. त्यांनी ‘सीएनएन’ला सांगितले, “हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे, ही आमची परंपरा आहे, ते कधीही थांबवू शकणार नाहीत.” काठमांडूच्या पाटण मल्टिपल कॅम्पसमधील मानववंशशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक बिष्णू प्रसाद दहल यांचे मत आहे की, ही प्रथा बंद करण्यासाठी धार्मिक रचनेत संपूर्णपणे बदल करणे आवश्यक आहे. गढीमाईचे महापौर श्याम प्रसाद यादव यांनी ‘द टेलिग्राफ’ला सांगितले, “पशुबलिदानाचा मुद्दा हा लोकांच्या विश्वासाचा विषय आहे. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि ही प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले असले तरी भविष्यात तसे होण्याची शक्यता दिसत नाही.”