तांत्रिक बिघाड झाल्यानंतर अमेरिकेतील हजारो विमानांचे उड्डाण प्रभावित झाले असून तेवढ्याच अनेक विमानांचे उ्डडाण रद्द करण्यात आले आहे. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या प्रणालीमध्ये (FAA) बिघाड झाल्यानंतर विमानतळाची सेवा ठप्प झाली. या प्रणालीद्वारे पायलट आणि विमान उड्डाणासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संभाव्य धोके किंवा महत्त्वाच्या सूचना याविषयी सतर्क केले जात असते. FAA च्या सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार जी प्रणाली बाधित झाली आहे त्याचे नाव NOTAM (Notice to Air Missions) असे आहे. ही प्रणाली पुर्ववत कधी होईल याबाबत कोणतीही माहिती FAA ने दिलेली नाही.
NOTAM प्रणाली काय आहे?
FAA च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, नोटम मार्फत महत्त्वाची माहिती विमानतळ आणि विमानातील कर्मचाऱ्यांना दिली जाते. ही माहिती अतिशय संवेदनशील आणि गोपनीय असते, त्यामध्ये हस्तक्षेप करणे इतरांसाठी खूप अवघड आहे.
- नोटम हे, नॅशनल एअरस्पेस प्रणाली (NAS) च्या वापरकर्त्यांना रिअल टाइम डेटा आणि वास्तविक माहिती पुरविण्याचे महत्त्वाचे काम करते.
- नॅशनल एअरस्पेस प्रणाली (NAS) प्रभावित होऊ शकेल अशी प्रत्येक संवेदनशील माहिती, सुविधा, काही बदल याबाबत आगाऊ माहिती देण्याचे काम नोटम कडून होते.
- नोटममध्ये स्वतःची एक भाषा आहे. ज्याच्यामुळे विमानतळ ऑपरेशनमध्ये सोप्या पद्धतीने संवाद साधला जातो. मात्र इतरांसाठी ते समजून घेणे अवघड आहे.
जर नोटम नसेल तर? उदाहरणच घ्यायचे झाल्यास वैमानिकांना हवेत पक्षी धडकण्याचा किंवा विमान उतरवत असताना निसरड्या झालेल्या धावपट्ट्यांची माहिती मिळू शकणार नाही. नोटम प्रणाली विमानांच्या चारही बाजूंच्या २५ नौटिकल माइल्सचा परिसरावर नजर ठेवून असते. तेवढ्या अंतरात जी काही विमानासाठी महत्त्वाची माहिती आहे, ती पुरविण्याचे काम केले जाते.
नोटमची काही उदाहरणे
हवामानातील बदल, ज्वालामुखी बद्दलची माहिती, प्रतिबंधित उड्डाण क्षेत्र किंवा अन्य काही महत्त्वाच्या घडामोडींबाबत सूचना देण्यासाठी नोटमचा वापर होत असतो. तसेच काही अडचणी उद्भवल्यास जसे की, पॅराशूट जम्प, रॉकेट लाँच, लष्करी कारवाई असा परिस्थितीत या प्रणालीचा लाभ वैमानिकांना होतो. तसेच विमानतळावर उतरण्यासाठी वैमानिकाला धावपट्टीची अद्ययावत माहिती जसे की, बर्फवृष्टी, विद्युत रोषणाईतील बिघाड किंवा धावपट्टीवर पक्ष्यांचा थवा बसला असल्यास त्याबाबत अपडेट केले जाते. त्यानुसार वैमानिक लँडिगची योजना आखतो.
केंद्रीय प्रणाली अपयशी कशी झाली?
अमेरिकेच्या डरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) द्वारे केंद्रीय नोटम प्रणाली चालवली जाते. एका स्क्रिनवर या प्रणालीद्वारे आलेली माहिती दिसत असते. मात्र केंद्रीय प्रणालीमध्येच जर बिघाड झाला तर संपूर्ण देशातील विमानतळांना त्याचा फटका बसू शकतो. जो आता अमेरिकेला बसला आहे. एपी या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार FAA ने भारतीय वेळेनुसार ९ वाजेपर्यंत अमेरिकेतील सर्व विमानांचे उड्डाण थांबविले आहे.
सध्यातरी ही प्रणाली कशी बिघडली, त्यात काय तांत्रिक अडचणी आल्या. याची माहिती मिळू शकली नाही. प्रणाली पुन्हा ऑनलाईन येईपर्यंत अमेरिकेतील विमानसेवा ठप्प असेल.