Onset Of Monsoon नैर्ऋत्य मोसमी वारे हळूहळू पुढे सरकत आहेत. पुढील चार दिवसांत केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा ३१ मेपर्यंत मान्सूनचे आगमन केरळमध्ये होईल, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी (२७ मे) सांगितले. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीतून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जूनमध्ये काही दिवसांनी पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे. मान्सून ऑनसेट म्हणजे काय? कोणत्या निकषांवर मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते? मान्सून कुठे तयार होतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
मान्सून ऑनसेट म्हणजे काय?
भारतात साधारणत: ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस नैर्ऋत्य मान्सूनमुळे पडतो. भारतात जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्येकडून म्हणजेच अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वारे वाहतात; ज्यांना नैर्ऋत्य मौसमी वारे किंवा नैर्ऋत्य मान्सून म्हटले जाते. भारताच्या आर्थिक दिनदर्शिकेत मान्सूनचे ज्यादिवशी आगमन होते, त्या दिवसाला फार महत्त्व असते.
हेही वाचा : भारतात २५ वर्षांत दोनपैकी एक बालक ‘मायोपिया’ग्रस्त होण्याचा धोका; हा आजार किती गंभीर?
हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहतात. या वार्यांबरोबर बाष्पही येते आणि ढगांची निर्मिती होते; ज्यानंतर पाऊस पडतो. भारतीय हवामान विभागाच्या मते, पावसाचे प्रमाण, वार्याचा वेग व तापमानाच्या स्थितीवरच मान्सून ऑनसेट झाल्याची म्हणजेच मान्सून सुरू झाल्याची घोषणा केली जाते. जून- सप्टेंबरमधील मान्सूनच्या काळात वर्षभरातील साधारणतः ७० टक्के पाऊस पडतो. जलसाठे भरण्यासाठी हा मान्सून महत्त्वाचा असतो.
कोणत्या निकषांवर मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते?
वारे : पश्चिमेकडून वाहणारे वारे मध्य अक्षांशांवर असावेत आणि त्याची दिशा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे असावीत. वारे कमी उंचीवरून वाहायला हवेत म्हणजेच हवेचा दाब ६०० हेक्टोपास्कल असावा. मान्सूनला ढकलणारे वारे पाच ते १० अक्षांश असावे आणि ७० ते ८० रेखांश असावे. या क्षेत्रावरील वाऱ्याचा वेग ९२५ हेक्टोपास्कल म्हणजेच ताशी २८ ते ३७ किलोमीटर असावा.
उष्णता : भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, उपग्रहाकडून प्राप्त झालेले आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन मूल्य (पृथ्वीचा पृष्ठभाग, महासागर आणि वातावरणाद्वारे अवकाशात उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेचे मोजमाप) २०० वॉट प्रतिचौरस मीटरच्या कमी असावेत. त्याची दिशा पाच ते १० अक्षांश असावी आणि ते ७० ते ७५ अंश पूर्वेकडे असावेत.
सर्वसाधारणपणे अंदमान आणि निकोबार बेटांवर दरवर्षी १५ मे ते २० मेदरम्यान मान्सूनची सुरुवात होते आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळ किनारपट्टीवर पाऊस सुरू होतो. परंतु, निर्धारित निकष पूर्ण होत नाही, तोवर मान्सूनच्या सुरुवातीची अधिकृत घोषणा केली जात नाही.
पाऊस : १० मेनंतर केरळ आणि लक्षद्वीपमधील १४ ठरावीक हवामान केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रांवर कोणत्याही वेळी सलग दोन दिवस किमान २.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यास भारतीय हवामानशास्त्र विभाग मान्सूनची सुरुवात झाली, असे घोषित करते.
केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हवामान खात्याची १४ केंद्रे : मिनिकॉय, अमिनी, तिरुवनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, कोची, त्रिशूर, कोझिकोड, थलासेरी, कन्नूर, कासारगोड व मंगळुरू.