रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी (९ जुलै) रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ सेंट ॲण्ड्र्यू द अपोस्टल’ असे या पुरस्काराचे नाव असून, हा रशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर होते. हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान मोदींना दिलेल्या या पुरस्काराची घोषणा २०१९ मध्ये करण्यात आली होती. “रशियाबरोबर विशेष असे धोरणात्मक संबंध वाढविण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणे, तसेच रशियन आणि भारतीय लोकांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करणे या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.”
हेही वाचा : रशियाचा झार जेव्हा भारत गिळंकृत करायला निघाला होता!
काय आहे या पुरस्काराचे स्वरूप आणि तो कुणाला मिळतो?
हा पुरस्कार रशियाच्या प्रमुख सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती, सैन्यदलातील अधिकारी तसेच विज्ञान, संस्कृती, कला आणि अर्थव्यवस्थेशी निगडित इतर अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो. हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांनाही दिला जातो. जे नेते रशियाबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सेंट ॲण्ड्र्यू यांच्या नावाने दिला जातो. सेंट ॲण्ड्र्यू हे येशू ख्रिस्ताच्या बारा मूळ अपोस्टलपैकी (अनुयायी) एक होते. येशू ख्रिस्तांनी स्वत:च्या शिकवणीच्या प्रसारासाठी पाठविलेल्या या बारा जणांना ‘अपोस्टल’ असे म्हणतात. येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढविण्यात आल्यानंतर याच बारा अनुयायांनी जगभर प्रवास करीत येशू ख्रिस्तांच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार केला, असे मानले जाते.
या बारा अनुयायांपैकी सेंट ॲण्ड्र्यू हे रशिया, ग्रीस आणि आशिया व युरोपातील इतर काही ठिकाणी येशूच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी फिरले. त्यांनीच या भागामध्ये कॉन्स्टँटिनोपल चर्चची स्थापना केली. त्यातूनच नंतर रशियन ऑर्थोडॉक्स चर्चची स्थापना झाली आहे. रशियाची एकूण लोकसंख्या १४० दशलक्ष असून, त्यापैकी ९० दशलक्ष रशियन लोक या चर्चचे अनुसरण करतात. सेंट ॲण्ड्र्यू यासाठीच रशिया, तसेच स्कॉटलंडसारख्या देशात फारच महत्त्वाचे ठरतात. त्यांना या भागात फारच आदराचे स्थान दिले जाते. स्कॉटलंड देशाच्या झेंड्यावर ‘X’ असे चिन्ह आहे. या चिन्हाला ‘सॉल्टायर’, असे म्हटले जाते. तेदेखील सेंट ॲण्ड्र्यू यांच्या चिन्हातूनच घेण्यात आले आहे. एवढा त्या देशांवर या ख्रिश्चन संताचा प्रभाव आहे. असे मानले जाते की, त्यांनादेखील अशाच आकाराच्या क्रूसावर चढविण्यात आले होते. झार पीटर द ग्रेटने (१६७२-१७२५) इसवीसन १६६८ मध्ये सेंट ॲण्ड्र्यू यांना पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळवून दिले आणि उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना त्यांच्या नावाने सन्मानित करण्यास सुरुवात केली. या सन्मानचिन्हामध्ये एक माळ दिली जाते. त्या माळेवर १७ छोटी पदके समाविष्ट आहेत. मुख्य पदकावर रशियन फेडरेशनचे प्रतीक असून, त्यावर सेंट ॲण्ड्र्यू यांची सोनेरी प्रतिमा आहे. याच प्रतीकावर दुहेरी डोक्याचा गरुडही दाखविण्यात आला आहे. एकूणच या सन्मानामध्ये एक बॅज, स्टार व फिकट निळ्या रेशमाने बनवलेली रिबन समाविष्ट आहे. युद्धामध्ये चांगली कामगिरी केलेल्या सैनिकांना बॅज, स्टार यांसोबतच तलवारही दिली जाते. रशियन राज्यक्रांतीने झारशाही उलथवून टाकल्यानंतर १९१८ साली हा सन्मान बंद करण्यात आला होता. मात्र, १९९८ साली रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानंतर अशा प्रकारचा सन्मान पुन्हा सुरू करण्यात आला.
हेही वाचा : जबरदस्तीने नसबंदीचा ‘तो’ कायदा असंवैधानिक; जपानमधील हा निर्णय महत्त्वपूर्ण का मानला जातोय?
अलीकडे कुणाकुणाला मिळाला हा सन्मान?
अलीकडे हा पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आहे, त्यामधील बहुतांश व्यक्ती या रशियाच्याच आहेत. त्यामध्ये मिलिटरी इंजिनीयर मिखाईल कलाश्निकोव्ह, लेखक सर्गेई मिखाल्कोव्ह, सोविएत युनियनचे शेवटचे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह, रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे नेते पॅट्रियार्क अलेक्सी II व रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे सध्याचे प्रमुख पॅट्रियार्क क्रिल यांचा समावेश आहे. याआधी ज्या परदेशी नेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे; त्यामध्ये २०१७ साली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व कझाकस्तानचे माजी अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव यांचा समावेश आहे.