राजेंद्र येवलेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन करोना म्हणजे सीओव्हीआयडी 19 विषाणूची जागतिक साथ जाहीर केली आहे. सध्या 114 देशात या विषाणूचा प्रसार झालेला आहे व एकूण संसर्ग असलेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजाराच्या पुढे गेली आहे. करोनाची जागतिक साथ जाहीर करण्याची मागणी आधीच करण्यात आली होती पण ती उशिरा का होईना फलद्रुप झाली आहे. यात जागतिक साथ म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

जागतिक साथ (पँडेमिक) म्हणजे काय ?

जेव्हा एखादा नवीन रोग जगाच्या जास्तीत जास्त भागात पसरतो व त्याचा धोका खूपच वाढलेला असतो तेव्हा जागतिक आरोग्य संघटना जागतिक साथ म्हणजे पँडेमिक जाहीर करत असते. सीओव्हीआयडी 19 संदर्भात ती जाहीर करण्यात आली आहे. पँडेमिक हा शब्द पँडेमॉस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे यात डिमॉस म्हणजे लोकसंख्या व पॅन म्हणजे सर्व जण असा अर्थ आहे. जागतिक साथ जाहीर केली म्हणजे जगातील जास्तीत जास्त लोक या विषाणूमुळे आजारी पडण्याची शक्यता आहे असा त्याचा अर्थ. अनेक खंडात रोगाचा प्रसार होणे हा जागतिक साथीचा मुख्य निकष आहे, त्यात कुठल्या आकड्यांचा निकष मात्र नाही. रोगाच्या गंभीरतेपेक्षा प्रसाराचा वेग वाढला की, जागतिक साथ जाहीर केली जाते. आताच्या परिस्थितीत व्यक्ती-व्यक्ती पातळीवर विषाणूच्या प्रसाराची दुसरी लाट सुरू सुरू झाल्यानंतर ही जागतिक साथ जाहीर करण्यात आली आहे. अंटार्क्टिका सोडून सर्व खंडात हा विषाणू पसरला आहे.

स्थानिक साथ (एंडेमिक) व जागतिक साथ (पँडेमिक) यात काय फरक असतो ?

स्थानिक साथ ही काही भौगौलिक प्रदेशापुरती मर्यादित असते. तर जागतिक साथ ही अनेक खंडात रोगाचा प्रसार झाल्यानंतर जाहीर होते. जागतिक साथीचा धोका अर्थातच खूप मोठा असतो. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ.घेब्रेसस यांच्या मते जागतिक साथ या शब्दाला खूप गांभीर्य आहे त्यामुळे त्याचा वापर करताना काळजी घेतली जाते. त्यातून संबधित विषाणूविरोधात लढण्यात मानवजात अपयशी ठरली असा चुकीचा संदेश जाऊन भीती निर्माण होऊ शकते. प्रत्यक्षात जागतिक साथ जाहीर करण्याचा उद्देश हा सर्व देशांनी गांभीर्याने उपाययोजना कराव्यात हा असतो.

जागतिक साथ जाहीर केल्याने काय फरक पडणार आहे?

जागतिक साथ जाहीर केल्याने सर्व देशांसाठी तो वेगाने उपाययोजना करण्याचा इशारा असतो. बरेच देश ज्या पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजेत ते करीत नसल्याचे दिसून आल्यानेच बरीच चर्चा करून जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक साथ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे सर्वच देशांना वेगाने प्रतिबंधात्मक व इतर उपाय करावे लागतील जेणेकरून या रोगाचा आणखी प्रसार होणार नाही. शाळा बंद ठेवणे, व्यक्तींमधील संपर्क टाळणे, कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगणे, पर्यटक व्हिसा रद्द करणे असे ते उपाय आहेत.यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला निधी वाढवून मिळतो वगैरे गोष्टी मात्र खऱ्या नाहीत. यातून नवीन औषधे व लसी शोधण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे.

यापूर्वी कधी जागतिक साथ जाहीर करण्यात आली होती का ?

याआधी 2009 मध्ये फ्लूच्या एच 1 एन1 विषाणूचा प्रसार झाला त्यावेळी जागतिक साथ जाहीर करण्यात आली होती त्यावेळीही जगात हजारो लोक बळी पडले होते. पण फार गंभीर परिस्थिती नसताना जागतिक साथ जाहीर केली अशी टीका त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेवर झाली त्यामुळे यावेळी त्यांनी जागतिक साथ जाहीर करण्यास विलंब लावला. यापूर्वी सिव्हीयर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) या रोगाची साथ 2003 मध्ये 26 देशात पसरली व 8000 लोकांना संसर्ग झाला होता पण त्यावेळी जागतिक साथ जाहीर केली नव्हती. मिड इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे एमइआरएसच्यावेळीही जागतिक साथ जाहीर केली नव्हती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is pandemic emergencies why who declaired coronavirus pandemic disease