What is paraquat poisoning : प्रियकराची विष देऊन हत्या केल्याप्रकरणी केरळच्या तिरुवनंतपुरम न्यायालयाने एका २४ वर्षीय तरुणीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. ग्रीष्मा एसएस असं शिक्षा झालेल्या तरुणीचं नाव आहे. केरळच्या इतिहासात फाशीची शिक्षा झालेली ग्रीष्मा सर्वात तरुण महिला आहे. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीष्माने २०२२ मध्ये तिचा प्रियकर शेरॉन राज याला आयुर्वेदिक औषधात पॅराक्वॅट नावाचं विषारी रसायन दिलं होतं, ज्यामुळे शेरॉनचे अवयव निकामी झाले आणि त्याचा तडफडून मृत्यू झाला. दरम्यान, पॅराक्वॅट म्हणजे काय, त्याचा वापर नेमका कशासाठी केला जातो, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

पॅराक्वॅट म्हणजे नेमकं काय?

पॅराक्वॅट (Paraquat) हे शेतीसाठी वापरलं जाणारं विषारी रसायन आहे, ज्याचा उपयोग प्रामुख्याने तणनाशक म्हणून केला जातो. शेतात वाढलेले गवत कमी करण्याठी शेतकरी या रसायनाची फवारणी करतात. पॅराक्वॅटला डायक्लोराइड किंवा मिथाइल व्हायोलोजेन असंही म्हटलं जातं. कापूस, तांदूळ, बटाटा, वेल आणि अन्य काही पिकांचा वाढीचा वेग कमी करण्यासाठी पॅराक्वॅटची फवारणी केली जाते. जागतिक आरोग्य संघटनेनं पॅराक्वॅटची व्याख्या मध्यम धोकादायक आणि मध्यम प्रमाणात त्रासदायक रासायनिक औषध म्हणून केली आहे.

आणखी वाचा : Ghost Island: कॅस्पियन समुद्रातील ‘भुताटकीचं बेट’ नेमकं कुठे नाहीस होतं?; नेमकं काय घडतंय?

पॅराक्वॅटवर कोणकोणत्या देशांमध्ये बंदी?

पॅराक्वॅटच्या विषबाधेची तीव्र लक्षणे पाहता चीन आणि युरोपियन युनियनसह ७० हून अधिक देशांमध्ये त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सध्या अमेरिका आणि भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पॅराक्वॅटचा वापर करतात. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, २०१४ ते २०१८ या कालावधीत अमेरिकेत पॅराक्वाटचा वापर दुप्पट होऊन जवळपास ११ दशलक्ष पाउंडपर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण एजन्सी (EPA) नुसार, पॅराक्वॅटचा छोटासा घोट शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. पॅराक्वाटच्या संपर्कामुळे काही लोकांमध्ये पार्किन्सन रोगाचा धोका वाढतो, असा दावा केला जातो.

पॅराक्वॅटमुळे विषबाधा कशी होते?

पॅराक्वॅट हे विषारी रसायन चुकून एखाद्या व्यक्तीच्या तोंडात गेल्यास त्याला विषबाधा होते, असं सांगितलं जातं. मात्र, या रसायनच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास ते त्वचेद्वारे शरीरात शोषित होऊ शकते. पॅराक्वॅटची फवारणी करताना त्याचे कण श्वसनाद्वारे पोटात गेल्याने गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राच्या (CDC) माहितीनुसार, पॅराक्वॅट तोंडाच्या, पोटाच्या किंवा आतड्यांच्या संपर्कात आल्यास ते शरीरात वेगाने पसरते, ज्यामुळे फुफ्फुस, यकृत आणि किडनीसारख्या अवयवांवर हानिकारक परिणाम होतात. त्यामुळे पॅराक्वॅटची फवारणी करताना काळजी घेण्याची गरज आहे.

पॅराक्वॅट विषबाधेची लक्षणे काय आहेत?

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राच्या मते, पॅराक्वॅटच्या विषबाधेची लक्षणे ही त्याच्या संपर्काच्या प्रमाणावर, पद्धतीवर आणि कालावधीवर अवलंबून असतात. एखाद्या व्यक्तीने जर पॅराक्वॅटचे सेवन जास्त केले असेल तर मूत्रपिंड निकामी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, हृदय आणि यकृत निकामी होणे, झटके येणे आणि श्वसनक्रिया बंद पडणे याचा सामना करावा लागू शकतो. जर कमी प्रमाणात सेवन केले असल्यास एखाद्या व्यक्तीला अनेक दिवस किंवा आठवडे हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि फुफ्फुसासंबंधित आजारांचा सामना करावा लागतो. सीडीसीच्या मते, त्या व्यक्तींमध्ये तात्काळ पोटदुखी, तोंड आणि घशात सूज आणि वेदना, रक्तवाहिन्या पिळवटणे आणि उलटी होण्याची लक्षणे दिसू लागतात.

पॅराक्वॅटच्या विषबाधेवर काही उपचार आहेत का?

पॅराक्वॅट विषबाधेचा संशय असलेल्या कोणत्याही व्यक्तीने त्वरीत वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. सध्या पॅराक्वॅटच्या विषबाधेवर कोणतेही अँटीडोट्स उपलब्ध नाहीत, परंतु २०२१ मध्ये नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडियामध्ये (NMJI) प्रकाशित झालेल्या लेखात उपचारासाठी काही बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. पॅराक्वॅटमुळे विषबाधा झाल्यास तत्काळ उपाय म्हणून चारकोल किंवा मुलतानी माती खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीरात गेलेले विषारी द्रव्य त्या पदार्थ्यांवर चिकटून राहते. पॅराक्वॅटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने अंगावरील कपडे तातडीने टाकावेत आणि साबणाने किंवा वाशिंग पावडरने अंघोळ करावी, असंही सांगितलं जातं.

भारतात पॅराक्वॅटचा वापर किती प्रमाणात होतो?

अमेरिकेत पॅराक्वॅटच्या विक्रीची परवानगी फक्त परवानाधारक व्यावसायिकांनाच देण्यात आली आहे. वैयक्तिक वापरावर किंवा निवासी भागात त्याच्या वापरावर बंदी आहे. भारतात पॅराक्वॅटचा वापर केंद्रीय कीटकनाशक बोर्ड आणि नोंदणी समिती (CIBRC) यांच्या देखरेखीखाली केली जातो. या संस्थेच्या नियमांनुसार पॅराक्वॅट फक्त विशिष्ट पिकांसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. कीटकनाशक कायदा १९६८ मध्ये कीटकनाशकांची निर्मिती, विक्री, साठवण, वाहतूक आणि वापरावर नियंत्रण ठेवले जाते, ज्यात पॅराक्वॅटसारख्या विषारी रसायनाचादेखील समावेश आहे.

२०२१ मध्ये कृषी मंत्रालयाने पॅराक्वॅटच्या वापरासाठी काही प्रतिबंध लागू केले आहेत. गहू, तांदूळ, चहा, कॉफी, आलू, द्राक्षे, मका, रबरी झाड आणि सफरचंद यांसारख्या पिकांसाठीच पॅराक्वॅट वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय तलाव आणि कालव्यांचा मोकळा परिसर आणि नदी-नाल्यांच्या काठावरील जंगली गवत नष्ट करण्यासाठी पॅराक्वॅटची फवारणी करण्यास परवानगी आहे.

पॅराक्वॅटचा वापर करताना काय काळजी घ्यायला हवी?

पॅराक्वॅटच्या वापरावर मर्यादा असल्या तरी त्यावर योग्य नियंत्रण नाही, असा उल्लेख नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या लेखात करण्यात आला आहे. काही ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शेतकऱ्यांना पॅराक्वॅट विकले जात आहेत, ज्यामुळे विषबाधेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पॅराक्वॅटची सर्रास विक्री होत असल्याचा आरोपही लेखातून करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेत पॅराक्वॅटमध्ये सुरक्षेसाठी निळा रंग, तीव्र वास आणि सेवन झाल्यास उलटी करणारा पदार्थ असणं बंधनकारक आहे.

हेही वाचा : Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?

२०१५ मध्ये भारत सरकारने पॅराक्वॅटच्या वापराच्या अटी आणि शर्तींचे नियम कडक केले. शेतकऱ्यांना पॅराक्वॅटचा वापर करायचा असल्यास अगोदर प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, असंही सरकारने सांगितलं आहे. या उपाययोजनांमुळे रसायनाच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अजूनही बरेच शेतकरी पॅराक्वॅटचा वापर करताना मास्क आणि रासायनिक प्रतिकारक कपडे यांसारख्या सुरक्षा उपकरणांचा वापर करत नसल्याचं दिसून आलं आहे.

ग्रीष्माने तिच्या प्रियकराची हत्या कशी केली?

सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्याकुमारी येथील रहिवासी असलेल्या ग्रीष्माचे तिरुवनंतपुरममधील शेरॉन राज या तरुणाबरोबर २०२१ पासून प्रेमसंबंध होते. ग्रीष्मा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेत होती; तर शेरॉन बी.एस्सी. रेडिओलॉजीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. मार्च २०२२ मध्ये ग्रीष्माच्या कुटुंबाने तिचे लग्न तमिळनाडूमधील लष्करी अधिकाऱ्याशी ठरवले. यानंतर तिने शेरॉनशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो आपल्या प्रेमसंबंधांबाबत होणाऱ्या नवऱ्याला सांगेल, याची चिंता ग्रीष्माला वाटत होती. लग्नाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी ग्रीष्माची चिंता वाढत गेली.

परिणामांच्या भीतीने तिने तिचे काका निर्मलकुमारन नायर यांच्याबरोबर शेरॉनची हत्या करण्याचा कट रचला. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी ग्रीष्माने शेरॉनला भेटण्यासाठी तिच्या घरी बोलावलं आणि त्याला आयुर्वेदिक औषधात पॅराक्वॅट हे विषारी द्रव्य दिलं. आयुर्वेदिक पेये नैसर्गिकरीत्या कडू असल्याने, शेरॉनला त्यात असलेलं विषारी द्रव्य लक्षात आलं नाही. ग्रीष्माच्या घरून निघाल्यानंतर लगेचच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. तब्येत बिघडल्याने शॅरॉनच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, परंतु त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि ११ दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला.

Story img Loader