बिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ग्रीसचे पंतप्रधान कायरीकोस मित्सोटाकिस या दोन्ही नेत्यांतील बैठक रद्द झाली. ऐतिहासिक मूल्य असलेल्या ‘पार्थेनॉन शिल्पां’मुळे या दोन्ही देशांतील संबंध बिघडल्याने ही बैठक रद्द झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थेनॉन शिल्प काय आहेत? ग्रीस आणि या शिल्पांचा संबंध काय? ग्रीस आणि ब्रिटन या दोन्ही देशांत हा वाद का रंगला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
शिल्पे परत करण्याची ग्रीस सरकारकडून केली जाते मागणी
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रीस देशाकडून ब्रिटन सरकारकडे पार्थेनॉन शिल्पांची मागणी केली जाते. ही शिल्पे आमच्या मागणीची आहेत, असे ग्रीसचे म्हणणे आहे. ब्रिटनकडून या शिल्पांसदर्भात चर्चा करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा दावाही ग्रीसकडून केलो जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही देशांत पार्थेनॉन शिल्पांबाबत वाद सुरू आहे. ही शिल्पे देण्यास ब्रिटनचा नकार आहे.
पार्थेनॉन शिल्प नेमके काय आहे?
ब्रिटनच्या संग्रहालयात एकूण ३० पेक्षा अधिक पार्थेनॉन शिल्पे आहेत. ही शिल्पे २ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जाते. यातील बहुतांश शिल्पे, मूर्ती या अथेन्समधील एक्रोपोलिस (Acropolis)टेकडीवरील पार्थेनॉन मंदिरातील असल्याचे सांगितले जाते. ब्रिटनच्या ताब्यात असलेली ही शिल्पे पार्थेनॉन मंदिराच्या भिंतीवर तसेच खाली मैदानावर सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेली होती. या मंदिराचे काम इसवी सनपूर्व ४३२ मध्ये पूर्ण करण्यात आले होते. हे मंदिर अथेना देवीचे आहे. अथेन्सच्या सुवर्ण युगाची साक्ष म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.
ब्रिटनकडे असलेल्या अनेक शिल्पांमध्ये एक ७५ मीटर उंचीचे विशेष शिल्प आहे. अथेना देवीच्या जन्मदिनानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक या शिल्पावर चितारलेली आहे. तर अन्य शिल्पांवर देव-देवता, पौराणिक प्राणी कोरण्यात आलेले आहेत.
ही शिल्पे ब्रिटनमध्ये कशी आली?
सध्या ब्रिटनकडे असलेली पार्थेनॉन शिल्पे ऑटोमन साम्राज्याचे तत्कालीन ब्रिटिश राजदूत तसेच सातवे अर्ल ऑफ एलिग्न थॉमस ब्रुस यांनी १९ शतकाच्या पूर्वार्धात पार्थेनॉन मंदिरातून हलवले होते. त्यानंतर ही शिल्पे १८१६ मध्ये ब्रिटनमध्ये आणण्यात आली. ब्रिटनमध्ये आणल्यानंतर ब्रिटिश संग्रहालयाने ती शिल्पे खरेदी केली होती.
ब्रिटिशांनी ही शिल्पे चोरून आणली होती का?
ही शिल्पे पार्थेनॉन मंदिरातून काढल्यानंतर थॉमस ब्रुस यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला. मात्र मी चोरी केली नसून मला ही शिल्पे काढण्याची ऑटोमन साम्राज्याने परवानगी दिलेली आहे, असा दावा ब्रुस यांनी केला होता. मात्र अशा प्रकारची परवानगी देणारे मूळ पत्र सध्या हरवलेले आहे. त्यामुळे तेव्हापासून या पत्रातील मजकुराबाबत वाद सुरूच आहे.
१९८० च्या दशकात विशेष शिल्पे परत करण्याच्या मागणीला जोर
दरम्यान १८३० मध्ये ग्रीसला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून ही शिल्पे परत द्यावीत अशी मागणी ग्रीसकडून केली जाते. या मागणीला १९८० च्या दशकात विशेष बळ मिळाले. कारण या दशकात ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या अभिनेत्री मेलिना मर्कोरी यांनी ही शिल्पे परत मिळावीत यासाठी विशेष मोहीम राबवली होती. १९८१ ते १९८९ या काळात त्या सांस्कृतिक मंत्री होत्या. त्यामुळे या काळात ही शिल्पे ब्रिटनने परत द्यावीत, या मागणीने विशेष जोर धरला होता.
ग्रीसच्या दाव्यावर ब्रिटनचे मत काय?
पार्थेनॉन शिल्पांची काळजी घेण्याची जबाबदारी ही सध्या ब्रिटिश संग्रहालयाकडे आहे. एलग्न यांनी ऑटोमन साम्राज्याशी कायदेशीर करार करून ही शिल्पे घेतली होती, असा दावा या ब्रिटिश संग्रहालयाकडून केला जातो. तसेच आम्ही ही शिल्पे परत करणार नाहीत, असेही या संग्रहालयाने स्पष्ट केलेले आहे.
“या शिल्पांना एकत्र करणे अशक्य”
सध्या ही शिल्पे दोन वेगवगेळ्या संग्रहालयांत असणेच फायद्याचे आहे. यामुळे लोकांना जास्त फायदा होईल. सध्या या शिल्पांना एकत्र करणे अशक्य आहे, कारण यातील काही शिल्पे ही हरवलेली आहेत किंवा खराब झालेली आहेत. विशेष म्हणजे ही शिल्पे ग्रीसला दिल्यानंतर ते तेवढ्याच सुरक्षितपणे परत केले जाणार नाहीत, असेही ब्रिटिश संग्रहालयाकडून सांगितले जाते. या वर्षाच्या मार्च महिन्यात सुनक यांनी या शिल्पांबाबत प्रतिक्रिया दिली होती. आपल्या देशासाठी ही एक मोठी संपत्ती आहे, असे ते म्हणाले होते. तसेच ही शिल्पे ग्रीसला परत करण्यासंदर्भात कायद्यात कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता पुढे काय?
ऋषी सुनक आणि कायरीकोस मित्सोटाकिस यांच्यातील बैठक रद्द झाल्यानंतर ग्रीसच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पार्थेनॉन शिल्पांच्या बाबतीत ब्रिटिश संग्रहालयाशी चर्चा करत राहू. ही शिल्पे परत देण्याची मागणी आम्ही करत राहू, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ही शिल्पे ब्रिटनच्याच मालकीची आहेत, अशी भूमिका सध्याच्या ब्रिटन सरकाची आहे. मात्र आगामी वर्षात राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत मजूर पक्षाला विजय होण्याची अपेक्षा आहे. मजूर पक्षाचा विजय झाल्यास ब्रिटिश संग्रहालय आणि ग्रीस सरकार यांच्यात या शिल्पांदर्भातील करार प्रत्यक्षात येऊ शकतो. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे.