“ए भिडू, क्या हाल?”, “चल भिडू, आयेगा क्या?” अशा स्वरूपाची वाक्ये ऐकली की आपसुकच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. त्यांच्याकडून वापरली जाणारी ही भाषा ‘बंबईया भाषा’ म्हणून ओळखली जाते. जॅकी श्रॉफ यांनी ही भाषा आणि आपली हटके देहबोली यांचा वापर करून एक खास शैली तयार केली आहे. ते वारंवार वापरत असलेला ‘भिडू’ हा शब्द मराठी असून आता तो जॅकी श्रॉफ यांची ओळख म्हणूनच प्रस्थापित झाला आहे. आता याच ‘भिडू’ शब्दावर आणि आपल्या बोलण्या-चालण्याच्या शैलीवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी जॅकी श्रॉफ यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
जॅकी श्रॉफ यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये मंगळवारी (१४ मे) एक याचिका दाखल केली आहे. त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही कंपनी, सोशल मीडिया चॅनेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ॲप्स आणि जीआयएफ बनवणाऱ्या प्लॅटफॉर्मला त्यांचे नाव, आवाज, प्रतिमा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित इतर कोणत्याही गुणधर्माचा वापर करण्यापासून रोखणारी ही याचिका आहे. कुणी असा वापर केलाच तर संबंधित व्यक्ती वा संस्थेला दोन कोटी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. पर्सनॅलिटी राईट्स अर्थात व्यक्तिमत्वविषयक अधिकारांचा वापर करून जॅकी श्रॉफ यांनी ही याचिका दाखल केली असून उच्च न्यायालय आज (१५ मे) या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. पर्सनॅलिटी राईट्स अर्थात व्यक्तिमत्वविषयक अधिकार म्हणजे नेमके काय आणि त्याचा वापर करून ‘भिडू’ या शब्दावर जॅकी श्रॉफ आपला दावा प्रस्थापित करू शकतात का, याची माहिती आता आपण घेणार आहोत.
हेही वाचा : विश्लेषण : इराणचे चाबहार बंदर भारताच्या दृष्टीने का महत्त्वाचे? चीन आणि पाकिस्तानवर कुरघोडी शक्य?
काय आहे जॅकी श्रॉफ यांचा दावा?
जॅकी श्रॉफ यांचे वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयात म्हटले आहे की, “जॅकी श्रॉफ यांना विडंबनाबाबत काहीही हरकत नाही. मात्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वापर परवानगी न घेताच जाहिरातींसाठी तसेच बदनामीकारक आणि विकृत पद्धतीने करण्यावर मनाई हुकूम हवा आहे.” जॅकी श्रॉफ, जॅकी, जग्गू दादा तसेच भिडू या नावांवरही त्यांनी दावा केला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही ठिकाणी या नावांचा वापर केला जाऊ नये, असे याचिकेत म्हटले आहे.
पुढे जॅकी श्रॉफ यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, “परवानगी न घेता त्यांचा चेहरा, आवाज अथवा व्यक्तिमत्त्वाचा वापर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. जॅकी श्रॉफ यांच्या नावाला बाजारात किंमत आहे, त्यामुळे परवानगी न घेता त्यांचे नाव कुणीही वापरू शकत नाही. ते सुप्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे त्यांनीच एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली आहे, असे लोकांना वाटू शकते.
पुढे वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, लोक त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो, आवाज, शब्द व नाव वापरून त्यांची प्रतिमा मलीन करत आहेत. अश्लील मीम्समध्ये त्यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. याशिवाय त्यांच्या आवाजाचाही गैरवापर होत आहे. त्यामुळेच त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन थांबविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
अनिल कपूर, अमिताभ बच्चन यांनीही घेतली होती धाव
जॅकी श्रॉफ यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांचेही उदाहरण दिले. नोव्हेंबर २०२२ मध्ये अमिताभ बच्चन यांनीही याचप्रकारे आपल्या व्यक्तिमत्त्वाविषयक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अनिल कपूर यांच्या व्यक्तिमत्त्व अधिकारालाही अशाच प्रकारचे संरक्षण दिले होते. अनिल कपूर यांचा चेहरा, आवाज, व्यक्तिमत्त्व याबरोबरच त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या ‘झकास’ हा शब्दही विनापरवानगी वापरण्यावर बंदी घातली होती.
काय आहे व्यक्तिमत्वविषयक अधिकार?
पर्सनॅलिटी राईट्स अथवा व्यक्तिमत्वविषयक अधिकार हे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतात. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित गोष्टींचे राईट टू प्रायव्हसी किंवा मालमत्ता अधिकाराच्या अंतर्गत संरक्षण करणे हे या व्यक्तिमत्वविषयक अधिकारांमध्ये अपेक्षित असते. यामध्ये त्या व्यक्तीचे फोटो, व्हिडीओ, आवाज, नाव किंवा या प्रकारच्या इतर गोष्टींचा समावेश होतो. खासकरून सेलिब्रिटींसाठी हा अधिकार फार महत्त्वाचा ठरतो. कारण आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी या सेलिब्रिटींच्या नावाचा, फोटोचा वापर उत्पादकांकडून केला जाऊ शकतो. विनापरवानगी छोटे-मोठे व्यावसायिक तसेच समाजमाध्यमांवरील कंटेन्ट क्रिएटर्स त्यांचा वापर करत असल्याने व्यक्तिमत्वविषयक अधिकाराअंतर्गत त्यांना संरक्षण देणे आवश्यक ठरते.
व्यक्तिमत्त्वविषयक अधिकार हे एखाद्या व्यक्तीच्या रोजगाराचे साधन असू शकते, हे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे सेलिब्रिटींच्या व्यक्तिमत्त्वाचा बेकायदेशीर वापर करणे हे त्यांच्या कमाईवर केलेले आक्रमण ठरू शकते. त्यामुळेच उच्च न्यायालयाने जॅकी श्रॉफ यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, फोटो, आवाज आणि ‘भिडू’ हा शब्द वापरणाऱ्यांविरुद्ध समन्स जारी केले आहेत. तसेच त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला जॅकी श्रॉफ यांच्या वैयक्तिक अधिकारांचे हनन करणाऱ्या सर्व लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
व्यक्तिमत्वविषयक हक्कांचे महत्त्व
व्यापारी मुद्रेप्रमाणेच (ट्रेडमार्क) व्यक्तिमत्त्वविषयक अधिकारही महत्त्वाचे ठरतात. एखाद्या व्यक्तीचे नाव, फोटोग्राफ आणि आवाजदेखील विनापरवाना व्यावसायिक दृष्टिकोनातून वापरला जाऊ शकतो, त्यामुळेच व्यक्तिमत्त्वविषयक अधिकाराचे जतन करणे महत्त्वाचे ठरते. सर्वोच्च न्यायालयाचे वकील तुषार अग्रवाल यांनी ‘मनीकंट्रोल’ला माहिती देताना म्हटले आहे की, “अगदीच सोप्या शब्दात सांगायचे झाले, तर व्यक्तिमत्त्वविषयक अधिकार अशा व्यक्तींना लागू पडतात, ज्यांचे नाव, आवाज, चेहरा वा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कोणतीही सुप्रसिद्ध गोष्ट व्यावसायिक फायद्यासाठी, समाजावर प्रभाव पाडण्यासाठी अथवा लोकप्रियतेसाठी वापरली जाऊ शकते. यामध्ये सामान्यत: सुप्रसिद्ध व्यक्तींचाच समावेश होतो. भारतातील व्यक्तिमत्त्वविषयक अधिकारांवर आजवर फारशी चर्चा झालेली नसल्याने ते बाल्यावस्थेत आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. ट्रेड मार्क ॲक्ट, १९९९ आणि कॉपीराईट ॲक्ट १९५७ प्रमाणेच त्यांचेही स्वरूप आहे.”
भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ मध्ये नमूद केलेल्या नागरिकांच्या अधिकारांमध्ये याची व्याख्या करण्यात आली आहे. ‘राईट टू प्रायव्हसी’नुसार व्यक्तिमत्वविषयक अधिकार मांडण्यात आले आहेत. त्याबरोबरच, ‘इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ’मध्येही अधिक व्यापक स्वरूपात व्यक्तिमत्वविषयक अधिकारांचा समावेश करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, कॉपीराईट ॲक्ट १९५७ मध्ये साहित्यिक आणि कलाकारांना असलेल्या अधिकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेते, गायक, संगीतकार अशा सर्वच कलाकारांचा समावेश होतो.