पहिल्यांदाच भारतीय कंपन्यांनी दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशातून पेटकोकची आयात केली आहे. भारतात होणाऱ्या आयातीसंदर्भातील आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. मात्र तेल उत्पादक देशांपैकी आघाडीचा देश असणाऱ्या व्हेनेझुएलामधून पहिल्यांदाच भारताने पेटकोकची आयात का केली आहे? पेटकोक म्हणजे नेमकं काय? त्याचा वापर कशासाठी केला जातो? या सर्व प्रश्नांची उत्तरं या लेखातून जाणून घेऊयात…
भारतात आयात किती?
पेटकोक हा तेल रिफायनरीमधील एक जोड-उत्पादन (बायप्रोडक्ट) आहे. पेट्रोलियम कोक या नावावरुन हा शब्द तयार झाला आहे. जागतिक स्तरावर कोळश्याची किंमत वाढल्याने भारतामधील अनेक उद्योगांनी आपला मोर्चा पेटकोककडे वळवला आहे. भारतामधील सिमेंट उत्पादक कंपन्यांनी चार कार्गो भरुन म्हणजेच एक लाख ६० हजार टन पेट्रोलियम कोक एप्रिल ते जूनदरम्यान आयात केलं आहे. रेफिनेटीव्ह शिप ट्रॅकींग आणि व्हेनेझुएलामधून जहाजांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या निर्यातीच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या महिन्यामध्ये ५० हजार टन कार्गो आणि ३० हजार टन पेटकोक ऑगस्ट संपण्याआधी भारतामध्ये आयात केला जाणार आहे.
व्हेनेझुएलामधूनच का केली जात आहे आयात?
रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोळसा आणि कच्च्या तेलाची किंमत जगातिक बाजरपेठेमध्ये वाढली आहे. यामुळेच भारतातील सिमेंट निर्माती करणाऱ्या कंपन्यांपैकी जेएसडब्ल्यू सिमेंट, रॅमको सिमेंट्स आणि ओरिएट सिमेंट या कंपन्यांनी व्हेनेझुएलामधून पेटकोक आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी ऑर्डरही या कंपन्यांनी दिली आहे. भारतीय कंपन्या व्हेनेझुएलाकडून पेटकोक मागवण्याचं आणखीन एक विशेष कारण आहे. अमेरिकेच्या तुलनेत व्हेनेझुएलाकडून भारतीय कंपन्यांना पेटकोक पाच ते १० टक्के सवलतीच्या दरात दिलं जात आहे.
जगातील सर्वाधिक पेटकोक वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. भारतामधील कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या पेटकोकपैकी अर्ध्याहून अधिक आयात ही अमेरिकेतून केली जाते. अमेरिकेतून भारतामध्ये २७ मिलियन टन पेटकोक आयात करण्यात आला आहे. सन २०१९ पासून अमेरिकेने व्हेनेझुएलावर काही आर्थिक निर्बंध घातले आहेत. व्हेनेझुएलामधील तेल उद्योग हा या देशातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
पेटकोक म्हणझे नेमकं काय?
पेट्रोलियम कोक किंवा पेटकोक म्हणजे ऑइल रिफायनरीमध्ये तेलावर प्रक्रिया केल्यानंतर उतरलेलं पहिलं जोड-उत्पादन असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऊसापासून साखर तयार केल्यानंतर मळी हे जोड-उत्पादन मिळते त्यापासून इतर पदार्थ तयार केले जातात. तशाच प्रकारे कच्च्या तेलापासून तेलाचं उत्पादन घेतल्यानंतर बाकी उरलेल्या जोड-उत्पादनांमध्ये पेटकोक एक आहे. हा पदार्थ स्पंजप्रमाणे असतो. पेटकोकला जाळून त्याचा कोळश्याप्रमाणे वापर करता येतो. अनेकदा पेटकोकचा वापर हा कोळश्याला पर्याय म्हणून वापरला जातो.
चार प्रकारचा असतो पेटकोक
पेटकोकला ‘बॅटम ऑफ द बॅरल’ इंधनही म्हटलं जातं. कच्च्या तेलामधून पेट्रोलसारखे इंधन निर्माण केल्यानंतर हा पदार्थ तळाशी शिल्लक उरतो. मात्र यामध्ये मोठ्याप्रमाणात कार्बन असल्याने कोळश्याचा स्वस्त पर्याय म्हणून याचा इंधन म्हणून वापर केला जातो. पेटकोकचे एकूण चार प्रकार आहेत, त्यांची नावं पुढीलप्रमाणे निडल कोक, हनीकोंब कोक, स्पंज कोक आणि शॉर्ट कोक.
पेटकोकच्या निर्मितीचा इतिहास आणि वापर
पेटकोकचं उत्पादन १९३० पासून घेतलं जात आहे. अॅल्यूमिनियम, स्टील, ग्लास, रंग आणि खत उद्योगांमध्येही याचा वापर केला जातो. याप्रमाणे सिमेंट कंपन्या, ऊर्जा निर्मिती केंद्र आणि इतर उद्योगांमध्येही इंधन म्हणून याचा वापर केला जातो. भारतामध्ये पेटकोक प्रामुख्याने ऊर्जा निर्मिती केंद्रांबरोबरच सिमेंट निर्मिती कंपन्यांमध्येही वापरलं जातं. तसेच स्टील आणि कापड उद्योगामध्येही पेटकोकचा वापर केला जातो. अनेक रिफायनरी पेटकोकचं उत्पादन घेतात कारण त्याच्या निर्मितीबरोबरच त्याची वाहतूक करणंही तुलनेनं सोप्प आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार भारतामध्ये २०२२ मध्ये पेटकोकची आयात दुपटीने वाढणार आहे. पेटकोकचा वापर ३४ टक्क्यांनी वाढला आहे. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये ४.२ मिलियन टन पेटकोकचा वापर करण्यात आला आहे. मागील सहा वर्षांमध्ये हा पेटकोकचा झालेला सर्वाधिक वापर आहे. मात्र पेटकोकच्या वापरामुळे प्रदूषण वाढत असल्याने भारतामध्ये याच्या वापरासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.
भारतात सर्वाधिक वापर सिमेंट उद्योगात
सामान्यपणे पेटकोकच्या ज्वलनानंतर निर्माण होणाऱ्या विषारी उत्सर्जनामुळे अनेक देशांमध्ये इंधन म्हणून त्याचा वापर केला जात नाही. सिमेंट उद्योगामध्ये पेटकोकच्या वापरामुळे सल्फर डायऑक्साइड निर्माण होतो. हा शोषून घेण्यासाठी चुन्याचा वापर केला जातो. आपल्या देशातील पेटकोकच्या एकूण वापरापैकी तीन चतुर्थांश वापर हा एकट्या सिमेंट उद्यागामध्ये होतो.
आरोग्य आणि वातावरणासाठी धोकादायक
पेटकोकमध्ये ९० टक्के कार्बन असतो. ज्वनलानंतर पेटकोकमधून कोळश्यापेक्षा ५ ते १० टक्के अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो. सल्फरबरोबरच पेटकोकच्या ज्वलनामधून नायट्रस ऑक्साइड, पारा, अर्सेनिक, क्रोमियम, निकेल, हायड्रोजन क्लोराइडही वातावरणात मिसळतो. कमी प्रतीच्या पेटकोकमध्ये अधिक प्रमाणात सल्फर असतो. यामध्ये धातूच्या अंशांचा समावेश अधिक असतो. पेटकोक जाळल्यानंतर हा अंश वातावरणामध्ये मिसळतो. पेटकोकच्या ज्वलनामधून छोट्या आकाराचे धुळीचे कण निर्माण होतात. हे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात.