Postpartum preeclampsia बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो, असे म्हटले जाते. बाळंतपणाच्या वेळी स्त्रियांना असहाय वेदना सहन कराव्या लागतात. मात्र, प्रसूतीनंतरदेखील मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रिन्स हॅरी यांच्या पत्नी मेगन मार्कल यांनी नुकतेच बाळंतपणानंतर त्यांना झालेल्या मोठ्या आजाराविषयी सांगितले आहे. या आजाराचे नाव आहे पोस्टपार्टम प्री-एक्लाम्पसिया.

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या नवीन पॉडकास्ट ‘कन्फेशन्स ऑफ अ फिमेल फाउंडर’च्या पहिल्या भागात त्यांनी सांगितले की, बाळंतपणानंतर लगेचच त्यांना या आजाराचे निदान झाले. त्यांनी या आजाराचे वर्णन अतिशय दुर्मीळ आणि भयानक, असे केले. नेमका हा दुर्मीळ आजार काय आहे? हा आजार मातांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो का? त्याची लक्षणे काय आहेत? त्याचा उपचार कसा करावा? आणि मेगन मार्कल त्याविषयी काय म्हणाल्या? त्याविषयी जाणून घेऊ.

मेगन मार्कल काय म्हणाल्या?

मेघन मार्कल या त्यांच्या मैत्रीण ‘बंबल डेटिंग’ अॅपच्या संस्थापक व्हिटनी वोल्फ हर्ड यांच्याविषयी बोलताना म्हणाल्या की, प्रसूतीनंतरचा आमचा अनुभव सारखा होता. आम्ही त्यावेळी एकमेकांना ओळखत नव्हतो; पण आम्हा दोघींनाही पोस्टपार्टम प्री-एक्लाम्पसियाचे निदान झाले. या आजाराचा अनुभव भीतीदायक आहे. अजूनही मी त्या वैद्यकीय स्थितीचा सामना करीत आहे. वोल्फ हर्डनेही हीच भावना व्यक्त केली आणि या आजाराचा उल्लेख भयानक असा केला. त्यांच्या पॉडकास्टनंतर या आजाराविषयी नवी चर्चा सुरू झाली आहे. या आजाराबद्दल अनेकांनी आजवर ऐकलेले नाही; परंतु ही एक अशी स्थिती आहे, जी मातांसाठी जीवघेणीदेखील ठरू शकते.

पोस्टपार्टम प्री-एक्लाम्पसिया म्हणजे काय?

पोस्टपार्टम प्री-एक्लाम्पसिया हा एक दुर्मीळ परंतु धोकादायक आजार आहे. या स्थितीत उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. ही स्थिती बाळंतपणानंतर उद्भवू शकते. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार (एनएचएस) महिलांना पोस्टपार्टम प्री-एक्लाम्पसियाचे निदान प्रसूतीपूर्व किंवा काही महिलांना गर्भधारणेचा शेवटचा टप्पा म्हणजे तिसरा तिमाही, जो साधारणपणे २८ व्या आठवड्यापासून ते ४० व्या आठवड्यापर्यंत म्हणजेच ७ व्या महिन्यापासून ९ व्या महिन्यापर्यंत सुरू होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये याचे निदान लगेच प्रसूतीनंतर होते. हा आजार केवळ चार ते सहा टक्के महिलांना होऊ शकतो. असे असले तरी ही स्थिती महिलांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे मानले जाते आणि त्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या आजाराचा उपचार वेळेवर न केल्यास, स्ट्रोक, मेंदूचे नुकसान आणि अगदी मृत्यूसारख्या गंभीर स्थितीदेखील उद्भवू शकतात.

आजाराची लक्षणे कोणती?

‘क्लीव्हलँड क्लिनिक’नुसार, प्री-एक्लाम्पसियाचे सुरुवातीचे लक्षण उच्च रक्तदाब असल्याचे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला ही लक्षणे लगेच लक्षात येत नाहीत. मात्र, या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते. या आजाराची लक्षणे पुढीलप्रमाणे:

  • तीव्र स्वरूपाची डोकेदुखी
  • डोळ्यांवर परिणाम, जसे की अस्पष्ट दिसणे किंवा प्रकाशामुळे त्रास होणे
  • चेहरा, हात, पाय किंवा अंगावर सूज येणे
  • मळमळ आणि उलट्या
  • पोटदुखी
  • कमी लघवी होणे
  • जलद गतीने वजन वाढणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे आजाराचा धोका कोणाला?

प्री-एक्लाम्पसिया हा आजार होण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु, गर्भधारणेपूर्वी मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा मूत्रपिंडाचा आजार असलेल्या महिलांना या आजाराचा धोका जास्त असल्याचे मानले जाते. ल्युपस किंवा अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोमसारख्या ऑटोइम्युन आजार असलेल्यांनादेखील याचा धोका अधिक असतो. पूर्वीच्या गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब किंवा प्री-एक्लाम्पसियाचे निदान झालेल्यांनादेखील तो पुन्हा उद्भवू शकतो. ‘क्लीव्हलँड क्लिनिक’ने स्पष्ट केलेल्या आजार उद्भवणाऱ्या कारणांमध्ये, प्री-एक्लाम्पसियाचा कौटुंबिक इतिहास असणे, लठ्ठपणा असणे, ४० किंवा त्याहून अधिक वयाचे असणे किंवा २० वर्षांपेक्षा कमी वयाचे असणे आदी कारणांचा समावेश आहे. तसेच, जुळी मुले किंवा तीन मुले गर्भात असल्यास आणि बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ३५ किंवा त्याहून अधिक असल्यासदेखील या आजाराचे निदान होण्याची शक्यता वाढते.

आजारावरील उपचार काय?

‘क्लीव्हलँड क्लिनिक’नुसार, उपचारांमध्ये रक्तदाबाची पातळी कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. डॉक्टर मॅग्नेशियम सल्फेटसारखी औषधदेखील लिहून दिली जाऊ शकतात, ज्यामुळे सीझरची शक्यता कमी होते. सीझर होणाऱ्या महिलांना याचा धोका अधिक असतो. तसेच डॉक्टर रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी करण्यासाठी अँटीकोआगुलंट (रक्त पातळ करणारे) औषधेदेखील देतात. मुख्य म्हणजे प्री-एक्लाम्पसियामुळे जगभरात दरवर्षी ७० हजारांहून अधिक मातांचा मृत्यू होतो, आणि पाच लाख अर्भकांचा आईच्या पोटातच मृत्यू होतो.

उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळ फीट येणे किंवा स्ट्रोक येणे, हे बहुतांश जणांच्या मृत्यूचे कारण असते. प्री-एक्लॅम्पसिया हा आजार कोणाला होऊ शकतो याचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर वय, वांशिकता आणि वैद्यकीय पार्श्वभूमी यांसारख्या निदानाशी संबंधित जोखमीच्या घटकांवर अवलंबून आहेत. मात्र, त्याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही.