मंदिर, स्थळ आणि व्यक्ती यांच्या शुद्धीकरणाच्या घटना अनेक ठिकाणी घडताना दिसतात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरणही अलीकडेच करण्यात आले. पण, मुळात शुद्धीकरण म्हणजे काय ? शुद्ध, स्वच्छ आणि अशुद्ध म्हणजे काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
शुद्धीकरण आणि धर्म
शुद्धीकरण ही संकल्पना धार्मिक अंगाने मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. धर्मांतरण आणि शुद्धीकरण या सहसंबंध असणाऱ्या संकल्पना आहे. हिंदू, ख्रिश्चन, ज्यू धर्मांमध्ये शुद्धीकरण ही संकल्पना दिसून येते. जेव्हा एखादी व्यक्ती त्या धर्मातील मूळ रूढींच्या विरुद्ध जाऊन किंवा परंपरा किंवा लोक समजुतींच्या विरुद्ध एखाद्या व्यक्तीने कृती केली आणि त्या व्यक्तीला त्या कृत्याचा पश्चाताप झाला, तर प्रायश्चित म्हणून शुद्धीकरण केले जाते. हे शुद्धीकरण हिंदू, ख्रिश्चन, ज्यू धर्मांमध्येही दिसते. एखादी व्यक्ती धर्मांतरीत झालेली असेल आणि तिला परत मूळ धर्मात यायचे असेल तर शुद्धीकरण केले जाते. इतिहासामधील प्रसिद्ध शुद्धीकरणाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बजाजी नाईक-निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना शुद्धीकरण करून परत हिंदू धर्मामध्ये घेतले.
हेही वाचा : विश्लेषण : व्हिस्की, रम आणि रमी; रमीची रंजक कथा
मुघल, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या आक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण झाले. धर्मांतरीत हिंदूंना शुद्धीकरण करून पुन्हा मूळ धर्मात घेण्यात आले. याविषयी रामकृष्ण मिशनद्वारे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबुद्ध भारत’च्या एप्रिल १८९९ च्या अंकात स्वामी विवेकानंदांनी शुद्धीकरणाची आवश्यकता का आहे, या विषयी विचार मांडले होते. धार्मिक शुद्धीकरणामध्ये प्रायश्चित, धार्मिक विधी करून शुद्धीकरण केले जाते आणि ती व्यक्ती शुद्ध झाली, असे समजून तिला मूळ धर्मात घेतले जाते. आता यामध्ये शुद्धता ही दृश्य स्वरूपात नसते. मानसिक पातळीवर शुद्धता झाली, असे समजले जाते. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, देवलस्मृती अशा स्मृती ग्रंथांमध्ये शुद्धीकरण विधी दिलेले आहेत.
केरळमध्ये १८-१९व्या शतकात हिंदू-मुस्लिम, हिंदू-ख्रिश्चन आणि ख्रिश्चन-मुस्लिम आणि मुस्लिम-ख्रिश्चन धर्मांतरणे झालेली दिसतात. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी इस्लाम धर्मातील ‘घरवापसी’विषयी सांगतात, ”इस्लाम धर्मामध्ये शुद्धीकरण ही संकल्पना अस्तित्वात नाही. एखाद्याला इस्लाम स्वीकारायचा असेल किंवा धर्मांतरित मुस्लिम व्यक्तीला पुन्हा स्वधर्मात यायचे असेल, शुद्धीकरण विधी असा कोणताही विधी नसतो.’ला इलाहा इल्ललाहू : मुहंम्मद – उर – रसुलल्लाह’ याचे उच्चारण करून मौलवी पाण्यावरती फुंकर घालतात आणि काहीतरी गोड पदार्थ खायला देऊन हे पाणी प्यायला देतात, हा विधी इस्लाम स्वीकारण्यासाठी , पुन्हा इस्लाम धर्मात परत येताना केला जातो. परंतु, याला शुद्धीकरण विधी म्हणता येणार नाही.” ख्रिश्चन धर्मामध्ये शुद्धीकरण विधी वेगळ्या प्रकारे दिसतो. ख्रिश्चन धर्मामध्ये ‘बाप्तिस्मा’ केला जातो. त्यात लहान मुलांचा ‘बाप्तिस्मा’ आणि प्रौढांचा ‘बाप्तिस्मा’ असे प्रकार आहेत. ‘बाप्तिस्मा’ या विधीनंतर दृढीकरण (कन्फर्मेशन) विधी केला जातो. त्याच्यानंतर ‘लॉर्ड्स सपर’ हा विधी केला जातो. ‘बाप्तिस्मा’ आणि ‘कन्फर्मेशन’ विधी झालेल्यांना यामध्ये सहभाग घेता येतो, असे डी. व्ही. हिल्डब्रँड (Hildebrand) लिखित ‘ख्रिश्चन एथिक्स’ या पुस्तकात दिलेले आहे. याचाच अर्थ शुद्धीकरण म्हणजे मानसिक शुद्धता करणे. ती मार्गदर्शन, धर्माची तत्त्वे समजून घेणे आणि अंगीकारणे याने होते.
हेही वाचा : विश्लेषण : भारतीय निवडणूक पद्धतीवर श्रीलंकेचा प्रभाव ? जाणून घ्या निवडणूक चिन्हांचा रंजक इतिहास
शुद्धता म्हणजे काय ?
शुद-शुध या धातूपासून शुद्धी हा शब्द तयार झाला आहे. या शब्दाचा अर्थ सामान्यपणे ‘स्वच्छ’ असा घेतला जातो. परंतु, शुद्ध हा शब्द शुचितेशी संदर्भित आहे. शौच किंवा शुचिता यांचे संदर्भ हे पावित्र्याशी निगडित आहेत आणि पावित्र्य ही संकल्पना धार्मिक भावना आणि लोकसमजुतीतून निर्माण झाली आहे. आज मंदिर, स्थळ किंवा व्यक्तींचे होणारे शुद्धिकरण याचे धागेदोरे वैदिक साहित्यामध्येही सापडतात. वैदिक साहित्यातील ब्राह्मण ग्रंथांमध्ये यज्ञाकरिता जागा पवित्र करणे, यज्ञासाठी लागणारे साहित्य शुद्ध करून घेणे हे विधी सांगितलेले आहेत. यामध्ये स्थलशुद्धता ही इप्सित कार्य निर्विघ्न पार पडावे, कोणतेही नकारात्मक भाव त्यामध्ये नसावेत, अशी समजूत असल्याचे दिसते. वैदिक साहित्यात समंत्रक विधी केले जात होते. कारण, शब्द किंवा मंत्र यांच्यामध्ये शक्ती असते, असा लोकमानस होता. आजही कोणत्याही पूजा या समंत्रक म्हणजेच मंत्र म्हणून केल्या जातात. या शुद्धतेला पुढे धार्मिक रंग देण्यात आला. विविध परंपरा, समजुती, रूढी यांचे मिश्रण झाले. परंतु, मुळात शुद्धता ही मानसिक भावना आहे.
हेही वाचा : विश्लेषण : दुसऱ्या महायुद्धातील भारत आणि ‘कोका कोला’चे स्थान
शुद्धता आणि स्वच्छता यातील फरक
आज शुद्ध म्हणजे स्वच्छ असे समजले जाते. परंतु, यामध्ये फरक आहे. कोविड काळामध्ये स्वच्छतेला सर्वोच्च स्थान मिळाले. शारीरिक स्वच्छता, वस्तूंची स्वच्छता मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली. ‘हायजिन’ याच्याशी स्वच्छतेचा संदर्भ जोडला जाऊ लागला. स्वच्छता ही स्वच्छतेच्या साधनांनी म्हणजे झाडू, साबण इ. यांच्या साहाय्याने केली जाते. ही बाह्य स्वच्छता झाली. शुद्धता ही मानसिक संकल्पना आहे. ही दृश्य घटना नाही. परंतु, पाणी शुद्धीकरण असा शब्दप्रयोग केला जातो. यामध्ये दूषित पाणी स्वच्छ झाल्यावर पारदर्शक झालेले दिसते. तेव्हा पाणी शुद्ध झाले असा शब्दप्रयोग केला जातो. स्वच्छ दिसणारी प्रत्येक गोष्ट ही शुद्ध असतेच असे नाही. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ‘क्लीन’ शब्दाची व्याख्या ‘ क्लीन टू रिमूव्ह डर्ट ऑर डस्ट फ्रॉम समथिंग, एस्पेशली बाय युजींग वॉटर ऑर केमिकल्स.’ अशी केलेली आहे. ‘प्युअर’ या शब्दाची व्याख्या ‘ नॉट मिक्स्ड. नॉट मिक्स्ड विथ एनिथिंग एल्स’ अशी केलेली आहे. यावरून स्वच्छ आणि शुद्ध यातील मूलभूत फरक समजू शकेल. शुद्ध हा शब्द काहीही मिश्रित नाही किंवा भेसळयुक्त नसलेल्या घटकांसाठी सहजपणे वापरला जातो. उदाहरणार्थ, शुद्ध धातू, शुद्ध स्वर.
यावरून शुद्धीकरणामध्ये असणारी ‘शुद्धता’ ही मानसिक शुद्धतेकडे झुकते. यजुर्वेदामध्ये ‘तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु’ म्हटले आहे म्हणजेच आपले मन चांगल्या विचारांनी युक्त असावे. त्यामुळे बाह्य स्वच्छतेसह ही आंतरीक शुद्धता अधिक महत्त्वाची आहे.