केंद्र सरकारनं २०१६मध्ये नोटाबंदी जाहीर केली आणि ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. या नोटा चलनातून बाद झाल्यानं सगळेच ‘कॅशलेस’ झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली. डिजीटल इंडिया शब्द ऐकणाऱ्या जनतेच्या कानी कॅशलेस हा शब्द देखील पडू लागला. कॅशलेस इंडियाचा उद्देश सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन करणं, हा होता. डिजीटल इंडिया आणि कॅशलेस इंडिया या अभियानांमुळे आपल्या सर्वांना डिजीटल पेमेंटची सवय लागली एवढं मात्र नक्की. गेल्या दोन वर्षात करोना आल्यापासून हे प्रमाण वाढलंय. शॉपिंग, लाईट बिल भरण्यापासून ते किराणा दुकानातून सामान आणण्यासाठी आपण डिजीटल पेमेंट करतो. आपल्या खिशात एक रुपयाही नसेल आणि फक्त आपला फोन असेल तरी आपण कुठेही जाऊन येऊ शकतो किंवा कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो.
तुम्ही देखील डिजीटल पेमेंट नक्कीच करत असाल, पण हे करताना तुम्हाला काही प्रश्न पडले आहेत का. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्याही दुकानात डिजीटल पेमेंटसाठी फक्त एकच QR कोड ठेवलेला असतो. परंतु तो कोड स्कॅन करून शेकडो किंबहुना हजारो लोक पेमेंट करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक दुकानात प्रत्येकाला वेगळा Gpay QR code मिळतो. एवढे अगणित एकमेकांपेक्षा वेगळे QR कोड वेगवेगळे बनतात कसे? आणि ते काम कसे करतात? याचंच उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.
QR कोडचा फुल फॉर्म आहे क्विक रिस्पॉन्सिबल कोड. ट्रेड मार्कसाठी हा एक प्रकारचा मॅट्रिक्स बार कोड आहे. १९९४ मध्ये सर्वात आधी हा कोड जपानी ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी वापरला गेला होता. बार कोड हा मशिनला वाचता येणारा ऑप्टिकल लेबल आहे. हा QR कोड ज्या वस्तूवर लावलेला असतो, त्यासंबंधीत वस्तूंची सर्व माहिती त्यावर लिहिलेली असते. QR कोडमध्ये चार एन्कोडिंग मोड असतात. हे चार मोड संख्यात्मक, अल्फान्यूमेरिक, बायनरी आणि स्पेशल कोडिंग आहेत. हा कोड खुप लवकर वाचता येऊ शकतो तसे याची स्टोरेज क्षमता जास्त असल्याने हा QR कोड लवकरच ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या बाहेर इतर बाजारपेठांमध्ये देखील वापरला जाऊ लागला. स्टँडर्ड यूपीसी बार कोडच्या तुलनेत हा QR कोड खूप उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं.
QR कोड कसा तयार केला जातो?
ऑनलाइन कोणत्याही वेबसाइटच्या मदतीने QR कोड तयार करणं खूप सोपं आहे, ज्यामध्ये तुम्ही Google वर QR कोड जनरेटर शोधून Google सर्च रिझल्टमध्ये येणाऱ्या कोणत्याही वेबसाइटच्या मदतीने तुमचा स्वतःचा QR कोड तयार करू शकता. आता हा QR कोड बनवण्याची प्रोसेस पाहुयात.
– सर्वप्रथम, तुमच्या डेस्कटॉप किंवा मोबाइलवर वेब ब्राउझर उघडा, Google वर QR कोड जनरेटर शोधल्यानंतर, Google सर्च रिझल्टपैकी कोणत्याही वेबसाइटवर क्लिक करून ते उघडा किंवा तुम्ही येथून थेट QR कोड जनरेटर वेबसाइट उघडू शकता.
– आता दुसऱ्या स्टेपमध्ये या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वेबसाईटचा URL, टेक्स्ट, ई-मेल, पीडीएफ आणि फोटोचा QR कोड तयार करू शकता.
– आता तयार केलेला QR कोड आता डाउनलोड बटणावर क्लिक करून सहजपणे डाउनलोड केला जाऊ शकतो. डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही तुमचा तयार केलेला QR कोड तुम्हाला हव्या त्या लोकांची सहज शेअर करू शकता.
QR कोड कसा काम करतो?
QR कोड पेपर आणि स्क्रीन दोन्हीवरून स्कॅन केले जाऊ शकतात. आजकाल, अनेक QR कोड स्कॅन अॅप्स देखील उपलब्ध आहेत, जे युजर्सना अत्यंत सहजतेने QR कोड स्कॅन करण्यास परवानगी देतात. युजरला फक्त कॅमेरा ऑन करून QR कोडवर ठेवावा लागतो. त्यानंतर ते स्कॅन झालं की पेमेंट तसेच संबंधित काम पूर्ण करण्यासाठी एकदा क्लिक करावं लागतं.
स्थिर क्युआर कोड –
स्थिर QR कोडमध्ये आत एक पेमेंट URL असते. हे कोड स्थिर असतात त्यामुळे यातील मजकूर किंवा माहिती बदलता येत नाही आणि कोड देखील ट्रॅक करता येत नाहीत. जलद आणि सोप्या ऑनलाइन पेमेंटसाठी हे क्युआर कोड वापरले जातात. ग्राहकांना फक्त QR कोड स्कॅन करावा लागतो, जेवढे पैसे द्यायचे आहेत ती रक्कम टाकावी लागते आणि दुकानाचं नाव कंफर्म केलं की पेमेंट पूर्ण केलं जातं. आपण लहान दुकानं, रेस्तराँ, हार्डवेअर स्टोअर्स, मेडिकल्स किंवा इन-स्टोअरमध्ये स्थिर QR कोडवरून पेमेंट करतो.
आपल्या बँक अकाउंटच्या आधारे डिजीटल पेमेंटसाठी QR कोड बनवता येतो. या क्युआर कोडमध्ये तुमच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती असते. मात्र, कोणीही ती माहिती वाचू शकत नाही. तो कोड स्कॅन करून फक्त पेमेंट करता येतं.