ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवल्यानंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाची यशस्वी अखेर झाली. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी द्रविड यांची मुदत या स्पर्धेपर्यंतच होती. द्रविड यांनी नव्याने अर्ज करण्यात रस दाखवला नव्हता. त्यामुळे ही स्पर्धा आणि विजेतेपद त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीतला सर्वोत्तम क्षण ठरला. भारतीय संघातील वरिष्ठ आणि युवा खेळाडूंचा मेळ घालण्यापासून, दुंभगलेला संघाला एकत्र ठेवण्यापासून सुरुवात केल्यानंतर त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ विश्वविजेतेपदापाशी थांबला. खेळाडू म्हणून विश्वविजेतेपदाचे अर्धवट राहिलेले स्वप्न त्यांनी प्रशिक्षक म्हणून अखेरीस पूर्ण केले.
सिनियर संघाच्या प्रशिक्षकपदाचा प्रवास..
‘आयसीसी’च्या २०२१ मधील ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर द्रविड यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. अर्थात, तेव्हाही ते या जबाबदारीसाठी पूर्ण तयार नव्हते. अत्यंत सावध भूमिका घेतच द्रविड यांनी आपल्या नव्या खेळीला सुरुवात केली. खेळाडू आणि कर्णधार यांच्यामधील दुवा इतक्या साध्या आणि सरळ पद्धतीने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा >>>विश्लेषण: ताज्या नियम बदलांमुळे क्रेडिट कार्डाचा वापर महागणार?
कुठली आव्हाने होती?
द्रविड यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा रवी शास्त्री आणि विराट कोहली युगाचा शेवट झाला होता. प्रशिक्षक-कर्णधार म्हणून या जोडीने चांगले यश मिळवले होते. मात्र, एका वळणावर ही जोडी तुटली आणि संघ, ड्रेसिंग रुममधील वातावरण दुंभगलेले होते. अशा वेळी द्रविड यांनी खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळ कसा काढून घेता येईल याकडे लक्ष दिले. आपल्याला कुणा एखाद्यासाठी नाही, तर संघासाठी चांगले क्रिकेट खेळायचे आहे ही भावना खेळाडूंमध्ये निर्माण केली. यामुळे खेळाडूंमध्ये आपल्या पाठीशी कोणीतरी आहे असा विश्वास निर्माण झाला.
द्रविड यांचे प्रशिक्षक म्हणून महत्त्व कसे?
शास्त्री आणि कोहली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बरेच यश मिळवले होते. याचे दडपण द्रविड यांच्यावर सुरुवातीच्या काळात होते. मात्र, द्रविड यांनी संघाची मोट उत्तम पद्धतीने बांधली. त्यांनी भारतीय संघाला एकाच वर्षात ‘आयसीसी’च्या तीन स्पर्धांत अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. जागतिक कसोटी अजिंक्यपद, एकदिवसीय विश्वचषक आणि नंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक अशा तीन स्पर्धांची अंतिम फेरी भारताने गाठली. कसोटी क्रिकेटला प्राधान्य देणाऱ्या द्रविड यांनी काळाची गणिते ओळखून त्यानुसार आपले नियोजन केले आणि कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी २० अशा तीनही प्रारुपांमध्ये एक समान दर्जाचा संघ उभा केला.
हेही वाचा >>>मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगवास; आंदोलने, उपोषणे, कारावास आणि संघर्ष; कशी होती ‘नर्मदा बचाव’ची ३९ वर्षे?
वेस्ट इंडिज २००७ ते वेस्ट इंडिज २०२४!
प्रत्येक खेळाडूप्रमाणे द्रविड यांनीही खेळत असल्यापासून विश्वविजेतेपदाचे स्वप्न पाहिले होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. कॅरेबियन बेटांवरच २००७ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून द्रविड यांच्या पदरी निराशा पडली होती. भारतीय संघ तेव्हा साखळीतच गारद झाला होता. मात्र, १७ वर्षांनी तेथेच भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला, तेव्हा द्रविड प्रशिक्षक होते. त्यांच्यासाठी एक चक्रच जणू पूर्ण झाले.
द्रविड यांचा सर्वोत्तम निर्णय कोणता?
परिवर्तनातून जात असताना संघ बांधणीचे आव्हान पेलणाऱ्या द्रविड यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहलीने माघार घेतली आणि केएल राहुल जायबंदी झाला. अशा वेळी पुन्हा एकदा निवड समितीला पुजारा, रहाणे अशा जुन्या खेळाडूंकडे परतण्याचा मोह झाला होता. मात्र, प्रशिक्षक या नात्याने द्रविड यांनी तरुण खेळाडूंबरोबर जाण्याचे ठरवले. उदयोन्मुख खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी पटवून दिले. तरुण रक्ताला वाव देण्याच्या त्यांच्या निर्णयाने भारतीय संघाला नवा चेहरा आणि अनेक नवे खेळाडू मिळाले.
द्रविड यांची सर्वांत मोठी छाप कुठली?
क्रिकेटपटू आणि नंतर कर्णधार म्हणून द्रविड यांना खेळ पुढे नेण्याची इच्छा होती. मात्र, ती फारशी पूर्ण होऊ शकली नाही. पुढे प्रशिक्षक बनल्यावर त्यांना आपल्याप्रमाणेच विचार करणारा रोहित शर्मासारखा कर्णधार लाभला आणि द्रविड यांनी भारतीय संघ सुरक्षित स्थानावर नेऊन ठेवला. संक्रमणाच्या काळातून जाणारा भारतीय संघ सांभाळताना विजेतेपदाला गौण मानून एका वर्षात तीन ‘आयसीसी’ स्पर्धांची अंतिम फेरी गाठून भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवलेले अढळ स्थान हीच द्रविड यांच्या प्रतिभेची आणि निर्णय क्षमतेची खरी साक्ष ठरते.