Hajj Yatra 2024 सौदी अरेबियातील मक्का येथे दरवर्षी होणार्‍या हज यात्रेला मुस्लीम धर्मात खूप महत्त्व आहे. या यात्रेसाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने यात्रेकरू मक्का येथे पोहोचतात. मात्र, यंदा या यात्रेत निर्माण झालेल्या परिस्थितीचे चित्र काहीसे वेगळे अन् दु:खदायी आहे. उष्माघाताने आतापर्यंत येथे एक हजार यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. अनेक उष्माघातग्रस्त यात्री रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले जात आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या हज यात्रेतील अनेक छायाचित्रे, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात पांढरे वस्त्र परिधान केलेले काही यात्रेकरू रस्त्यावर पडले आहेत, काहींना स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेले जात आहे, अनेक मृत व्यक्तींचे चेहरे कपड्याने झाकले आहेत. ही सर्व दृश्ये भयावह आहेत. अतिउच्च तापमान, राहण्याची अयोग्य व्यवस्था व पाण्याची कमतरता या कारणांमुळे या यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकड्यात ६८ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. हज यात्रेत नेमके काय घडले? एक हजार हजयात्रींच्या मृत्यूला जबाबदार कोण? याविषयी आपण जाणून घेऊ..

इस्लामचे सर्वांत पवित्र शहर मानल्या जाणाऱ्या मक्कामधील तापमान गेल्या आठवड्यात ५१.८ अंश सेल्सिअस (१२५ अंश फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचले होते. जगभरातील सुमारे १.८ दशलक्ष मुस्लीम सौदी अरेबियात हज यात्रेसाठी येतील, अशी अपेक्षा होती. जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक संमेलनांपैकी एक असलेली हज यात्रा, इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. इस्लाममधील धार्मिक मान्यतेनुसार जे लोक आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात, त्यांना आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे बंधनकारक असते.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
मक्कामधील तापमान गेल्या आठवड्यात ५१.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : मुस्लीम धर्मियांसाठी हज यात्रेचे महत्त्व काय? या यात्रेत मुस्लीम कोणते विधी करतात?

सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांच्याकडे उष्माघाताची २,७०० प्रकरणे नोंदली गेली आहेत. उष्माघाती मृत्यूचे वृत्त समोर येण्यापूर्वी हा अधिकृत आकडा सांगण्यात आला होता; परंतु त्यानंतर देशाने अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. ‘एएफपी’ वृत्तसंस्था काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्रोत आणि देशांद्वारे मृत्यूंच्या संख्येची नोंद करत आहे. या वृत्तसंस्थेनेच मृतांची संख्या एक हजारवर पोहोचली असल्याचे वृत्त दिले. मृतांमध्ये इजिप्त, इंडोनेशिया, सेनेगल, जॉर्डन, इराण, इराक, भारत व ट्युनिशिया या देशांतील यात्रेकरूंचा समावेश आहे. त्यापैकी ३०० पेक्षा जास्त यात्री इजिप्तमधील आहेत; तर इंडोनेशियन आरोग्य मंत्रालयानेदेखील १४० हून अधिक नागरिकांच्या मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सौदी अधिकाऱ्यांनी मिस्टिंग स्टेशन्स आणि वॉटर डिस्पेंसर यांसारख्या उपाययोजना करून उच्च तापमानाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी असे मानले जात आहे की, अलीकडील बहुतेक मृत्यू उष्णतेमुळे झाले आहेत. या हज यात्रेकरूंपैकी अनेक व्यक्ती वृद्ध आहेत.

बेपत्ता कुटुंबीयांच्या शोधात

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक मित्र आणि कुटुंबे अजूनही सौदी रुग्णालयात आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत आणि बेपत्ता प्रियजनांचा शोध घेण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करीत आहेत. “दगडफेकीच्या वेळी लोक जमिनीवर कोसळत होते. यात्रेचे हे वर्ष अत्यंत वाईट होते,” असे दक्षिण इजिप्तमधील अस्वान येथील इहलसा नावाच्या यात्रेकरूने सांगितले. हज यात्रेतील जमारात नामक विधित यात्रेकरू प्रतीकात्मक स्वरूपात सैतानाला दगड मारतात. “मी अनेक वेळा सुरक्षा कर्मचाऱ्यांना जमिनीवर पडलेल्या यात्रेकरूंबद्दल सांगितले. दगड फेकण्याचे अंतर खरोखर खूप दूर होते आणि त्याच वेळी अतिउच्च तापमान होते,” असेही इहलसा म्हणाली.

हज यात्रेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हजारोंच्या मृत्यूला जबाबदार कोण?

हज यात्रेतील मृत्यूंच्या वृत्तानंतर कोणाला दोष द्यायचा याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. हज यात्रेसाठी यात्रेकरूंना देशात प्रवेश करायचा असल्यास सौदी अरेबियाची अधिकृत परवानगी आवश्यक आहे. कारण- सौदी अरेबियात दरवर्षी कोटा प्रणाली चालवली जाते. जास्त गर्दी आणि अतिउष्णता या पूर्वीही गंभीर समस्या राहिल्या आहेत. सौदी अरेबियाच्या सहलीची सोय ट्रॅव्हल एजन्सीद्वारे केली जाते. या एजन्सी मुस्लीम समुदाय संस्थेशी जोडलेल्या असतात. त्या मक्कामध्ये निवास, भोजन आणि वाहतूक व्यवस्था करतात. नोंदणीकृत यात्रेकरू त्या ट्रॅव्हल एजंटद्वारे चालविल्या जाणाऱ्या मक्कामधील मिशन किंवा कॅम्पचा भाग असतात. काही पीडित कुटुंबे लोकांची योग्य रीतीने सोय न केल्याबद्दल आणि अतिउष्णतेपासून पुरेसा निवारा देण्यात अपयशी ठरल्याबद्दल सौदी अधिकाऱ्यांना दोष देत आहेत.

तर काहींनी या बाबतीत नोंदणी न करता मक्केत आलेल्या नागरिकांना दोष दिला आहे. सौदीचे सार्वजनिक सुरक्षा संचालक मोहम्मद बिन अब्दुल्ला अल-बासामी यांनी आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की, हज यात्रा सुरू होण्यापूर्वी १,७१,००० हून अधिक नोंदणीकृत नसलेले यात्रेकरू देशात आले होते. सौदी सुरक्षा सेवांनी यापूर्वी हजमध्ये बेकायदा आलेल्या यात्रेकरूंना अटक करण्यासाठी मोहीम सुरू केली होती. नोंदणी न केलेल्या यात्रेकरूंना देशाकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येत नाही. वातानुकूलन, पाणी, सावलीची व्यवस्था, तसेच मिस्टिंग किंवा कूलिंग सेंटरचा लाभ केवळ नोंदणीकृत व्यक्तीच घेऊ शकतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, इतर बेकायदा यात्रेकरूंचा मृत्यू होऊ शकतो.

हज यात्रा सुरू होण्यापूर्वी १,७१,००० हून अधिक नोंदणीकृत नसलेले यात्रेकरू देशात आले होते. (छायाचित्र-रॉयटर्स)

पुरेश्या तंबूंच्या व्यवस्थेचा अभाव

‘डीडब्ल्यू’ने एका खासगी इजिप्शियन टूर कंपनीच्या व्यवस्थापकाशी संवाद साधला; जे अनेक वर्षांपासून इजिप्शियन यात्रेकरूंना मक्का येथे आणत आहेत. व्यवस्थापकाने त्याचे नाव सांगणे टाळले. तो म्हणाला, “तापमान जास्त होते आणि लोकांची संख्या खूप जास्त होती. हे उष्ण तापमान आपल्यासाठी जीवघेणे ठरू शकते, याची जागरूकताही त्यांना नव्हती. संपूर्ण सोई- सुविधांबाबतची व्यवस्था वाईटरीत्या केली गेली होती. त्याव्यतिरिक्त पुरेशा प्रमाणात तंबूही उभारले गेले नव्हते.”

“माझा दृष्टिकोन असा आहे की, जेव्हा लोकांना कळले की, त्यांना हे ऊन आता सहन होणार नाही, तेव्हा त्यांनी पर्वतावर केल्या जाणार्‍या प्रथेला जाणे टाळायला हवे होते,” असे त्याने सांगितले. इस्लामिक प्रथेनुसार एका विधीसाठी यात्रेकरू सफा आणि मरवा या दोन पवित्र मानल्या जाणार्‍या पर्वतांवर चढतात. तो पुढे म्हणाला, “यात्रेकरूंनी अधिक चांगले शिक्षित आणि अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. देशाची जबाबदारी देश पार पाडत आहे; परंतु काही यात्रेकरूंच्या वर्तनातून जागरूकतेचा अभाव जाणवला.”

हेही वाचा : संसदेची सुरक्षा कशी असते? संसदेच्या सुरक्षेत बदल का करण्यात आले?

सध्या या ठिकाणी अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परिस्थिती पाहता, यात्रेकरू हताश झाले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, मक्का येथील तापमानात आणखी वाढ होणार आहे. २०१९ च्या एका अभ्यासातून हज यात्रेकरूंना उष्ण तापमानापासून वाचविण्याचे सौदीचे प्रयत्न यशस्वी झाले की नाही याचा निष्कर्ष काढला गेला. या निष्कर्षात सांगण्यात आले आहे की, अधिकृत उपायांची काही प्रमाणात मदत झाली असली तरी हवामान बदलामुळे दरवर्षी तापमानात आणखी वाढ होणार आहे आणि त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे.