२६ जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपल्याला प्रजासत्ताक मिळालं म्हणजे नक्की काय झालं? आणि हा दिवस २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो? भारताचा नागरिक म्हणून हे माहीत असणे आवश्यक आहे. अशाच काही प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया..
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व काय? हा दिवस २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो?
राज्यघटनेचा स्वीकार करण्यापूर्वी दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस सार्वजनिक अधिवेशनांमध्ये विधानसभेची १६६ दिवस बैठक झाली. २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी दस्तावेजाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर स्वाक्षरी केली. याच्या दोन दिवसांनंतर म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना देशभर लागू झाली. नवीन संविधानाच्या तरतुदींनुसार संविधान सभा भारताची संसद बनली.
ही तारीख निवडण्यामागील कारण म्हणजे १९३० साली याच तारखेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला होता. १९२९ मध्ये रावी नदीच्या काठावर ३१ डिसेंबरला काँग्रेसचे अधिवेशन सुरू झाले. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षस्थानी होते. त्यांनी २६ जानेवारी १९३० रोजी अधिवेशनात तिरंगा फडकावला आणि पूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला. अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वी स्वराज्याचा प्रस्ताव मांडला होता. जर ब्रिटीश सरकारने भारताला २६ जानेवारी १९३० पर्यंत डोमोनियन पद (वर्चस्व) दिले नाही, तर भारत स्वतःला स्वतंत्र घोषित करेल, असे या प्रस्तावात मांडण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिन हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी ब्रिटीश वासाहतवादी भारत सरकार कायदा (१९३५) बदलून भारतीय राज्यघटना औपचारिकपणे स्वीकारण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली नवीन राज्यघटनेचे नामनिर्देशन करण्यात आले, त्यामुळे त्यांना राज्यघटनेचे शिल्पकारही म्हणतात. या राज्यघटनेनुसार भारत लोकशाहीप्रधान देश बनला. याशिवाय आपल्या देशाच्या संविधानाला जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते. भारतीय राज्यघटनेत महत्त्वपूर्ण तत्त्वे असून, या तत्त्वाच्या आधारावर देशातील सरकार आणि नागरिकांसाठी अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे ठरवण्यात आले आहेत.
प्रजासत्ताकदिनी तिरंगा कोण फडकवतं?
देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झेंडा फडकवण्यात येतो. तर राज्यांच्या राजधानीत राज्यपालांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात येतो. राष्ट्रपती हे देशाचे सांविधानिक प्रमुख आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींना हा अधिकार आहे. पहिल्या प्रजासत्ताकदिनी डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते. राज्यघटना लागू झाल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर इर्विन स्टेडियममध्ये त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला.
नवी दिल्लीतील संचलनात सलामी कोण स्वीकारतात? पहिले संचलन कधी झाले होते?
राष्ट्रपती हे भारताच्या सशस्त्र दलांचे कमांडर इन चीफ असतात, त्यामुळे नवी दिल्लीतील संचलनात भारताचे राष्ट्रपती सलामी स्वीकारतात. संविधान लागू झाल्यानंतर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिल्लीच्या जुन्या किल्ल्याजवळ इर्विन स्टेडियमवर पहिल्यांदा ध्वजसंचलन केले. त्यानंतर परेड झाली. यावेळी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारीही उपस्थित होते. इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना पहिल्या प्रजासत्ताक दिनाला पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
राष्ट्रीय ध्वज कुणी तयार केला?
पिंगली वेंकया यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज तयार केला होता. सुरुवातीला पिंगली यांनी तयार केलेल्या ध्वजात लाल आणि हिरवा रंग होता. हा तयार केलेला ध्वज त्यांनी महात्मा गांधी यांच्यासमोर सादर केल्यानंतर गांधीजींच्या सूचनेनुसार यात पांढऱ्या रंगाची पट्टी जोडण्यात आली. यासह राष्ट्रीय प्रतीक म्हणून अशोक चक्रही यात जोडण्यात आले. हा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी आयोजित घटनासभेच्या बैठकीत स्वीकारण्यात आला.