बुधवारी (३ एप्रिल) सकाळी तैवानच्या पूर्व किनार्‍याला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे. या भूकंपाच्या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच या भूकंपामुळे पूर्व किनाऱ्यावरील हुआलियन येथील मोठमोठ्या इमारतींचे नुकसान झाले आहे. हेच ठिकाण भूकंपाचे केंद्रही होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर तैवानला नेहमीच भूंकपाचा धोका असतो. कारण हे बेट प्रशांत महासागरातील रिंग ऑफ फायरच्या शेजारी आहे. महत्त्वाचे म्हणजे रिंग ऑफ फायरच्या क्षेत्रातच जगभरातील जवळपास ९० टक्के भूकंप होतात. असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार, १९८० पासून तैवान आणि आजूबाजूच्या भागात ४.० रिश्टर स्केल किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेच्या २००० पेक्षा जास्त भूकंपाच्या घटनांची नोंद झाली आहे, तर ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या १०० भूकंपाच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, ज्या भागात जगभरातील ९० टक्के भूकंप होतात, ते रिंग ऑफ फायर नेमकं काय आहे? आणि या भागातच सर्वाधिक भूकंप का होतात? याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : ईव्हीएममध्ये नोंदलेल्या प्रत्येक मताची पडताळणी शक्य आहे का? ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट वाद वारंवार का उद्भवतो?

‘रिंग ऑफ फायर’ नेमकं काय आहे?

रिंग ऑफ फायर ही प्रशांत महासागराच्या सभोवताली असलेली ज्वालामुखी आणि भूकंपाच्या ठिकाणांची एक शृंखला आहे. हे क्षेत्र अर्धवर्तुळाकार किंवा घोड्याच्या नालीच्या आकारासारखे असून ४० हजार २५० किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रालाच सर्कम-पॅसिफिक बेल्ट असेही म्हणतात. महत्त्वाचे म्हणजे या भागात ४०० पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत. रिंग ऑफ फायरचा भाग दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारा तसेच जपान आणि न्यूझीलंडपर्यंत पसरला आहे.

रिंग ऑफ फायरमध्ये बोलिव्हिया, चिली, इक्वेडोर, पेरू, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा, रशिया, जपान, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका या ठिकाणांचा समावेश होतो.

या भागात मोठ्या प्रमाणात भूकंप का होतात?

या भागातील टेक्टॉनिक प्लेट्सच्या सततच्या सरकण्याने, एकमेकांवर आदळण्याने किंवा एकमेकांच्या वर खाली जाण्याने या भागात मोठ्या प्रमाणात भूकंप होतात. मुळात या प्लेट्सचे कडे खडबडीत असतात. त्यामुळे ते एकमेकांना चिकटून राहतात आणि उर्वरित प्लेट सतत हलत राहते. मात्र, भूकंप तेव्हा होतो, जेव्हा या प्लेट एकमेकांपासून दूर जातात आणि दुसऱ्या प्लेटच्या वर किंवा खाली सरकतात. तैवानच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, फिलीपीन सी प्लेट आणि युरेशियन प्लेट या दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या एकमेकांवर आदळण्याने तैवानमध्ये अनेकदा भूंकप होऊ शकतो.

हेही वाचा – विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

रिंग ऑफ फायरमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी का?

टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे रिंग ऑफ फायरमध्ये ज्वालामुखींचे अस्तित्व आढळून येते. जेव्हा महाप्रचंड आकारमानाचे दोन भूस्तरखंड एकमेकांवर आदळतात, त्यावेळेस वजनदार असलेला भूस्तरखंड दुसऱ्या भूस्तरखंडाच्या खाली सरकतो. तेव्हा तो पृथ्वीचे आवरण भेदून त्याखाली शिरलेला असतो. या प्रक्रियेला भूगोलात ‘सबडक्शन’ असे म्हटले जाते. हा आवरण भेदून आत घुसलेला भूस्तरखंड साहजिकच हळूहळू गरम होत जातो आणि त्या ठिकाणी लाव्हारस तयार होतो. हा लाव्हारस भूस्तरखंड एकमेकांवर आदळण्याच्या प्रक्रियेत बाहेर येऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरतो. रिंग ऑफ फायर च्या भागात ही सबडक्शन प्रक्रिया मोठ्याप्रमाणावर घडते. त्यामुळेच याच ठिकाणी ज्वालामुखी मोठ्या प्रमाणावर तयार होतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is ring of fire and why do most earthquakes occur in this area know in details spb