सध्या लग्नाचा सीझन चालू आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्रत्येकाच्याच संपर्कातल्या कोणा ना कोणाचं तरी लग्न या काळात होत आहेच. यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्सही आपण पाहतो आहोत. या लग्नांच्या बाबतीत आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे सध्या अनेक जण सत्यशोधक पद्धतीने विवाह करत आहेत. पण सत्यशोधक पद्धतीचा विवाह म्हणजे काय? तो कसा आणि का करावा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. त्याबद्दल काही बाबी इथं जाणून घेणार आहोत.


सत्यशोधक विवाहाचा इतिहास


देशातला पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणला. पुरोहितांशिवाय झालेल्या या विवाहात वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधूचं नाव राधा असं होतं. या लग्नाचा खर्च सावित्रीबाई फुले यांनी स्वतः केला होता. महात्मा फुले यांचा कर्मकांडाला विरोध असल्याने या विवाहामध्ये कर्मकांडाला फाटा दिला जातो. अशा पद्धतीच्या लग्नामध्ये अनिष्ट रुढी, मानपान, परंपरा, अनावश्यक खर्चाला विरोध करत साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते. या विवाहप्रसंगी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला अभिवादन केलं जातं.


कसा केला जातो सत्यशोधक विवाह?


धान्याच्या अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्या वधूवरांच्या डोक्यावर टाकल्या जातात. पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी महात्मा फुले यांनी रचलेल्या मंगलाष्टका म्हटल्या जातात. या मंगलाष्टका संस्कृतऐवजी मराठीत लिहिलेल्या आहेत. जेणेकरून सामान्य माणसाला या लग्नसोहळ्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर या मंगलाष्टका छापील स्वरुपात उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानंतर वधुवरांसाठी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शपथा वधू- वर घेतात. सप्तपदीऐवजी सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्वांना मानलं जातं.


यानंतर लग्नगाठीप्रमाणेच महासत्यगाठ बांधली जाते. काही वेळा अशा प्रकारच्या लग्नांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहितीही दिली जाते. काळ बदलला तसं या सत्यशोधक पद्धतीच्या विवाहाचं स्वरुपही बदललं. काही जोडपी विवाहासाठीचं गिफ्ट म्हणून केवळ पुस्तकंच स्विकारतात.


नुकतंच सत्यशोधक पद्धतीने लग्न केलेला प्रवीण शिंदे सांगतो की, मी आणि माझी पत्नी आम्हा दोघांच्याही आयुष्यातल्या माणसांना भौतिक रुपातला मान देण्याऐवजी त्यांचं आमच्या आयुष्यातलं स्थान सगळ्या जगाला कळावं यासाठी आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. लग्नाचा खर्च मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी उचलला. दोन्ही बाजूंनी निस्वार्थ भावनेने ह्या लग्नसोहळ्याचा आनंद लुटला. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही या प्रकारच्या विवाहपद्धतीमध्ये केवळ माणूस मानलं जातं. त्यामुळे विवाह हे वधूपक्ष किंवा वरपक्ष, अशा कोणा एकावरचंच ओझं बनत नाही.