गौरव मुठे

चालू कॅलेंडर वर्षात प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून भांडवली बाजारात प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या पदरी पदार्पणातच मोठा परतावा घातला आहे. प्राथमिक भांडवली बाजारासाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ नंतर विद्यमान आर्थिक वर्ष खूपच बहारदार ठरले आहे. मात्र सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२२-२३ मध्ये कंपन्यांनी प्रारंभिक भागविक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ५२,११६ कोटी रुपये उभारले. त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो निम्म्याहूनही अधिक घटला होता, जागतिक प्रतिकूल परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक कंपन्यांनी प्राथमिक बाजाराकडे पाठ केल्याचा तो परिणाम होता. मात्र चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लघू आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या सूचिबद्धतेसाठी असलेल्या ‘एसएमई मंचा’वरदेखील सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या मत्तेत दुपटीने वाढ केली आहे. तर आणखी काही नवीन कंपन्यांचे आयपीओ भांडवली बाजारात धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रारंभिक समभाग विक्री म्हणजे काय, आणि भागधारकांसाठी आयपीओच्या सूचिबद्धतेच्या कालावधीबाबत ‘सेबी’ने काय निर्णय घेतला आहे हे जाणून घेऊया.

Sukhbir Singh Badal resignation
विश्लेषण: अकाली दलावर संकटाचे ‘बादल’; देशातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष अडचणीत का आला?
sugarcane harvester
महाराष्ट्रात ऊसतोडणीचे वेगाने यांत्रिकीकरण… मजुरांऐवजी यंत्रांना प्राधान्य का?…
india big fat wedding economy
लग्न सोहळ्यांमुळे होणार सहा लाख कोटींची उलाढाल; भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मिळणार चालना?
Did NASA accidentally kill living creatures on Mars?
NASA killed Life on Mars?: नासाने मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचा नाश केला का? नवीन संशोधन काय सुचवते?
Gautam Adani allegedly offering bribes
विश्लेषण : गौतम अदानींविरोधात अमेरिकेत भ्रष्टाचाराचे आरोप काय आहेत? भारतीय अधिकाऱ्यांचा काय संबंध?
Demisexuality
तुम्ही ‘Demisexual’ आहात का? या नवीन लैंगिक ओळखीची इतकी चर्चा का?
italy village selling house in 84 rs
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने निराश लोकांना इटलीत केवळ ८४ रुपयांत घर; काय आहे नेमका प्रकार?
india first bullet train project
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?
Octopus Have Blue Blood
Blue Blood: तीन हृदय असणाऱ्या ‘या’ प्राण्याच्या रक्ताचा रंग निळा; काय आहे नेमकं शास्त्रीय कारण?

प्रारंभिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफर) म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या कंपनीला निधी उभारण्याची गरज असते किंवा खासगी कंपनी सार्वजनिक होण्याचा निर्णय घेते तेव्हा कंपनी आपले समभाग पहिल्यांदा थेट गुंतवणूकदारांना विकते. यालाच प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) असे म्हणतात. आयपीओच्या माध्यमातून थेट कंपनी आणि गुंतवणूकदारांचा संबंध येत असतो. कंपनी पहिल्यांदाच आपल्या कंपनीचे समभाग थेट गुंतवणूकदारांला विकते. आयपीओ बाजारात दाखल करण्याआधी कंपनीला भांडवली बाजार नियत्रंक सेबीची परवानगी घेणे आवश्यक असते. कंपनीकडून सेबीकडे आयपीओबाबत मसुदा प्रस्ताव पाठवला जातो. त्यामध्ये कंपनीची आर्थिक स्थिती, संचालक मंडळाची माहिती दिली जाते. त्याचबरोबर कंपनी आयपीओच्या माध्यमातून उभारलेला निधी कशासाठी वापरणार याबाबत माहिती दिलेली असते.

कंपनीकडून आलेल्या मसुदा प्रस्तावाची पाहणी सेबीकडून करण्यात येते. तो योग्य असल्यास सेबीकडून आयपीओ बाजारात दाखल करण्यासाठी परवानगी मिळाल्यावर कंपन्या आयपीओची तारीख निश्चित करतात. हे करताना आयपीओची किंमत कंपन्यांमार्फत दोन पद्धतीने निश्चित केली जाते. किंमत निश्चित करताना समभागाचा एक निश्चित दर (फिक्स्ड प्राइस), किंवा समभागासाठी किंमतपट्टा (प्राइस बँड) जाहीर केला जातो. यामध्ये समभागाचा किमान व कमाल दर जाहीर केला जातो. आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना समभाग प्राप्त झाल्यानंतर थोडयाच दिवसात कंपनीचे समभाग शेअर बाजार मंचावर (राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार) सूचिबद्ध केले जातात. त्यानंतर दुय्यम बाजारात (सेकंडरी मार्केट) समभागांची खरेदी-विक्री करता येते.

‘सेबी’चा सूचिबद्धतेच्या कालावधीबाबत महत्त्वाचा निर्णय काय?

– भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने प्रारंभिक समभाग विक्रीपश्चात (आयपीओ) समभागांच्या सूचिबद्धतेचा कालावधी कमी केला आहे. प्रारंभिक विक्री पूर्ण केल्यानंतर व्यवहार झाला तो दिवस अधिक सहा (टी प्लस ६) दिवसांत समभाग बाजारमंचावर सूचिबद्ध केला जात असे, आता हा कालावधी तीन (टी प्लस ३) दिवसांवर आणला गेला आहे. डिसेंबर २०२३ पासून हा नवीन नियम लागू होणार असून, ‘आयपीओ’च्या माध्यमातून समभाग विक्री बंद झाल्यानंतर कंपन्यांना तीन दिवसांत समभागांची बाजारात सूचिबद्धता करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन नियम १ सप्टेंबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर बाजारात ‘आयपीओ’ आणणाऱ्या कंपन्यांना ऐच्छिक आधारावर लागू होईल आणि १ डिसेंबर २०२३ पासून आणि त्यानंतर ‘आयपीओ’ दाखल करणाऱ्या कंपन्यांसाठी तो अनिवार्य असेल.

सूचिबद्धतेचा कालावधी कमी केल्याने काय साधले जाणार?

– भांडवली बाजारात समभाग सूचिबद्धतेचा कालावधी कमी करून, ‘टी प्लस ३’ प्रणाली राबवल्याने आता ‘आयपीओ’पश्चात तीन कामकाज दिवसांत यशस्वी गुंतवणूकदारांच्या ‘डिमॅट’ खात्यात समभाग जमा केले जातील. यामुळे गुंतवणूकदारांसह कंपन्यांनाही फायदा होईल. कंपन्यांना लवकर निधी प्राप्त होईल, तर कमी कालावधीत समभाग सूचिबद्ध होणार असल्याने भागधारकांनादेखील खरेदी-विक्री लवकर करता येणार असून त्यांची गुंतवणूकही लवकर मोकळी होण्यास मदत होईल. भांडवली बाजारासाठी तरलतेच्या दृष्टिकोनातूनही कमी अवधीची व्यवहार प्रणाली फायदेशीर आहे.- विद्यमान वर्षात आयपीओला उदंड प्रतिसाद का लाभला?

विद्यमान कॅलेंडर वर्षात जानेवारीपासून जुलैपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे १०.६८ टक्के आणि १०.७३ टक्क्यांहून अधिक मजल मारली. जानेवारी २०२३ मध्ये सेन्सेक्सने ६१,०३८ अंशानी सुरुवात केली होती तर जुलै महिन्यात ६७,६१९.१७ अंशांची ऐतिहासिक सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक बाजारात प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून चालू वर्षात सूचिबद्ध झालेल्या ४९ कंपन्यांपैकी ३३ कंपन्यांचे समभागांनी बहुप्रसवा परतावा दिला आहे. जागतिक स्तरावर भांडवली बाजारांसमोर आव्हाने असूनही, २०२३ मध्ये अलीकडेच सूचिबद्ध झालेल्या असंख्य छोट्या व्यवसायांनी प्रभावी कामगिरी दाखवली आहे. विशेष म्हणजे, काही कंपन्यांच्या समभागांचे मूल्य दुप्पट झाले आहे.एसएमई मंचावर २०२३ मध्ये आतापर्यंत ४९ कंपन्यांनी ९३० कोटी रुपयांची निधी उभारणी केली, तर मुख्य मंचावर ५ मोठ्या कंपन्यांनी ५,८२४ कोटी रुपये उभारले आहेत. एसएमई मंचावर सूचिबद्ध झालेल्या ३ कंपन्यांनी १० टक्क्यांपर्यंत तर ४ कंपन्यांनी १० ते २० टक्के, १० कंपन्यांनी २० ते ५० टक्के आणि १६ कंपन्यांनी ५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

आयपीओ बाजारात आगामी आकर्षण काय?

टाटा समूहातील डिजिटल धाटणीच्या अभियांत्रिकी सेवा पुरवणारी जागतिक कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ भांडवली बाजारात धडकणार आहे. १८ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर टाटा समूहातील कंपनी खुल्या बाजारात गुंतवणूकदारांचा कल यानिमित्ताने अजमावणार आहे. तसेच एनएसडीएल या भारतातील आकाराने सगळ्यात मोठ्या डिपॉझिटरीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) भांडवली बाजार नियामक सेबीकडे अर्ज केला आहे.आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी काय काळजी घेतली पाहिजे?

आयपीओ गुंतवणुकीचा निर्णय घेताना ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (डीआरएचपी) तपासणे आवश्यक आहे. ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’मध्ये कंपनीच्या व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती नमूद केलेली असते. यामध्ये प्रामुख्याने कंपनीची आर्थिक स्थिती, भविष्यातल्या योजना, मालमत्ता व जबाबदाऱ्या, नवीन व्यवसाय उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी, याबद्दल संपूर्ण माहिती असते. हा मसुदा प्रस्ताव सेबीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतो.कंपनीचा व्यवसाय कुठला आहे? कुठे आहे? कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत? कंपनीचा व्यवसाय कुठे चालतो? कंपनीची भूतकाळातील आणि वर्तमानातील कामगिरी कशी आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायला हवीत.

‘सेबी’ अथवा ‘आयपीओ’चे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपन्यांच्या वेबसाइटवर ‘निर्देश प्रॉस्पेक्टस’वरील माहिती उपलब्ध असते. ती वाचली पाहिजे. ‘आयपीओ’च्या वेळी शेअर वाजवी किमतीला मिळतात म्हणून गुंतवणूक करणे चुकीचे आहे. भविष्यात शेअर बाजारात तो शेअर आणखी कमी किमतीला मिळू शकतो.कंपन्यांकडून ‘आयपीओ’आधी बऱ्याचदा जाहिरातबाजी केली जाते. किंवा कंपनीच्या वस्तू आणि सेवांना किती मागणी आहे याचे चित्र रंगविले जाते. मात्र जाहिरातींतून कंपनीच्या खऱ्या कामगिरीचा अंदाज मिळेलच असे नाही.

कंपनीच्या भविष्यातील योजना, आर्थिक स्थिती, त्यातील सातत्य आणि ‘आयपीओ’चा उद्देश बघणे आवश्यक आहे.गुंतवणूकदारांकडून ‘आयपीओ’ खुला झाल्यानंतर त्याला प्रतिसाद किती मिळाला आहे यावरून गुंतवणुकीचा निर्णय घेतात. मात्र ‘आयपीओ’ला मोठा प्रतिसाद मिळाला म्हणजे तो गुंतवणूकयोग्य आहे, हा निकषही चुकीचा ठरू शकतो.

gaurav.muthe@expressindia.com