भारतीय वंशाचे उद्योजक आणि वैमानिक असलेले गोपी थोटाकुरा हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीमार्फत ‘एनएस-२५’ मोहिमेमध्ये ते पर्यटक म्हणून अंतराळाची सफर करून येणार आहेत. ही कंपनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या मालकीची आहे. गोपी थोटाकुरा यांच्यासमवेत एकूण सहा जणांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अंतराळ पर्यटनासाठी जाणाऱ्या सदस्यांमध्ये मॅसन एंजेल, सिल्वेन कायरन, केनेथ एल. हेस, कॅरोल शॅलर आणि माजी हवाई दल कॅप्टन एड ड्वाइट यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही विशेष गोष्ट यासाठी आहे, कारण भारतीय वंशाचा माणूस या मोहिमचा भाग असणार आहे. जर ही मोहीम यशस्वी ठरली तर विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाऊन येणारे ते दुसरे भारतीय असतील. १९८४ मध्ये राकेश शर्मा अंतराळात जाऊन आले होते. रशियातील साल्यूत ७ या अंतराळ स्थानकावरून रशियन अंतराळ यानातून त्यांनी उड्डाण केले होते.

गोपी यांच्या या अंतराळ पर्यटन सफारीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीच्या ‘न्यू शेफर्ड’ या कार्यक्रमाअंतर्गत होणारी ही सातवी मोहीम असेल. एकूण मानवी इतिहास पाहता ही २५ वी अंतराळ मोहीम असेल. आतापर्यंत एकूण ३१ जणांनी पृथ्वीच्या वातावरणाबाहेर अंतराळात उड्डाण करण्याचा पराक्रम केला आहे.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये अंतराळ पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. माध्यमांमधील अहवालानुसार, २०२३ मध्ये अंतराळ पर्यटन क्षेत्राचे बाजारमूल्य $८४८.२८ दशलक्ष होते. ते २०३२ पर्यंत, २७,८६१.९९ दशलक्षपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या क्षेत्रासमोरही अनेक आव्हाने आहेत. त्यामध्ये महागडा प्रवास, पर्यावरणासंदर्भातील चिंता अशा समस्यांमुळे या क्षेत्राच्या विकासामध्ये अडथळे येऊ शकतात.

हेही वाचा : मतदानाला जाण्याआधी काढल्या चपला, मतपेटीला केला नमस्कार- विदेशी माध्यमांनी टिपलं पहिल्या निवडणुकीचं चित्र

कोण आहेत गोपी थोटाकुरा?
गोपी हे मूळचे भारतातील आंध्र प्रदेशचे आहेत. त्यांनी ‘एम्ब्री-रीडर एअरोनॉटिकल युनिव्हर्सिटी’मधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. गोपी यांनी जेट पायलटिंग, बुश फ्लाईंग, एरोबॅटिक्स, सीप्लेन, ग्लायडर, हॉट एअर बलून पायलटिंग या सगळ्याचा व्यावसायिक अनुभव घेतलेला आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय विमानेदेखील चालवली आहेत. नुकतेच ते माऊंट किलीमांजारो सर करून आले आहेत. ‘ब्लू ओरिजिन’ने या पर्यटन मोहिमेविषयी माहिती देताना म्हटले आहे की, “गोपी हे एक वैमानिक असून त्यांना हे वाहन चालवता येण्यापूर्वी विमान चालवता येऊ लागले होते.” गोपी थोटाकुरा हे ‘प्रिझर्व्ह लाईफ कॉर्प’ या जागतिक केंद्राचे सहसंस्थापक आहेत. त्यांचे ‘प्रिझर्व्ह लाईफ कॉर्प’ हे केंद्र हार्ट्सफिल्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. ते आरोग्याच्या क्षेत्रात सेवा प्रदान करते. गोपी थोटाकुरा हे व्यावसायिक आणि हौशी अशी दोन्ही प्रकारची उड्डाणे करतात. यापूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय वैमानिक म्हणूनही काम पाहिले आहे.

अंतराळ पर्यटन म्हणजे काय?
ॲन ग्रॅहम, फ्रेडरिक डोब्रुस्केस यांनी संपादित केलेल्या ‘एअर ट्रान्सपोर्ट : अ टुरिझम परस्पेक्टिव्ह’ या पुस्तकामध्ये अंतराळ पर्यटनाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार अंतराळ पर्यटन हे हवाई वाहतूक क्षेत्रातील असा एक विभाग आहे, जो पर्यटकांना अंतराळवीर होण्याची संधी उपलब्ध करून देतो. याद्वारे मनोरंजन, विश्रांती किंवा व्यावसायिक हेतूकरिता अंतराळ सफारी करता येते.

सामान्यत: अंतराळ पर्यटनाचे उप-कक्षीय (Sub-Orbital) आणि कक्षीय (Orbital) अंतराळ पर्यटन असे दोन मुख्य प्रकार पडतात. उप-कक्षीय अंतराळयान पर्यटकाला कर्मन रेषेच्या (Kármán Line) थोडे पुढे घेऊन जाते. ही रेषा आपल्यापासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर अवकाशात आहे. या रेषेला पृथ्वीचे वातावरण आणि बाहेरील अवकाश यांच्यामधील सीमारेषा मानली जाते. उप-कक्षीय अंतराळ पर्यटनामध्ये पर्यटकाला काही मिनिटांसाठी बाहेरील अवकाशात जाऊ दिले जाते आणि त्यानंतर परत पृथ्वीवर आणले जाते. ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीने खास अंतराळ पर्यटनासाठी म्हणून ‘न्यू शेफर्ड’ नावाचे प्रक्षेपण वाहन तयार केले आहे. ते उप-कक्षीय प्रक्षेपण वाहन असून पूर्णपणे पुन्हा वापरता येण्याजोगे आहे.

गोपी थोटाकुरा ज्या ‘एनएस-२५’ मोहिमेअंतर्गत अंतराळात जात आहेत, ते उप-कक्षीय अंतराळ पर्यटन आहे. थोटाकुरा आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सदस्यांना या ‘न्यू शेफर्ड’ वाहनामधून बाहेरील अवकाशात नेले जाईल. कक्षीय अंतराळ यानामधून प्रवाशाला कर्मन रेषेच्या फार पुढे नेले जाते. या प्रकारच्या अंतराळ पर्यटनामध्ये सामान्यत: प्रवाशाला काही दिवस ते आठवड्याहून अधिक काळ जमिनीपासून सुमारे १.३ दशलक्ष फूट उंचीवर अवकाशात राहता येते. सप्टेंबर २०२१ मध्ये, ‘स्पेसएक्स’च्या फाल्कन ९ ने चार प्रवाशांना घेऊन अवकाशात उड्डाण केले होते. त्यांना जमिनीपासून १६० किलोमीटर अंतरावरील पृथ्वीच्या कक्षेत तीन दिवस राहता आले होते.

हेही वाचा : बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?

अंतराळ पर्यटनामध्ये काय आहेत आव्हाने?
सध्यातरी अंतराळ पर्यटन करणे ही अत्यंत महागडी गोष्ट आहे. बाहेरील अवकाशात जाण्यासाठी प्रवाशाला साधारणत: किमान दशलक्ष डॉलर्सचा खर्च करावा लागतो. ही रक्कम जवळपास प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरची आहे. तसेच अनेक अभ्यासांनी असे दाखवून दिले आहे की, अवकाश पर्यटनामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. कारण अंतराळ यानामधून वायू आणि घन रसायने थेट वरच्या वातावरणात सोडली जातात.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL), केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधील काही संशोधकांनी २०२२ मध्ये या संदर्भात एक संशोधन केले होते. त्यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अंतराळ यानाच्या प्रक्षेपणातून निघणारी काजळी ही इतर स्त्रोतांमधून निघणाऱ्या काजळीच्या तुलनेत वातावरणाचे तापमान अधिक वाढवू शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is space tourism gopi thotakura to be the first indian space tourist vsh