एलॉन मस्क टेक्सासमधील स्पेसएक्स आणि त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी एक समर्पित शहर तयार करण्याची योजना आखत आहेत. अलीकडच्या वर्षांत, एलॉन मस्कने कॅलिफोर्नियामधून त्यांच्या कंपन्यांचे स्थलांतर करून, टेक्सासमध्ये कार्यालये, गोदामे व उत्पादन सुविधा स्थापन करून राज्यात आपले कार्य वाढवले ​​आहे. आता मस्क एका प्रकल्पात उतरत आहेत आणि तो प्रकल्प आहे कंपनी टाउनच्या निर्मितीचा. ‘स्पेस एक्स’ने टेक्सासच्या किनाऱ्यावर एक दशकापूर्वी कामाला सुरुवात केल्यापासून, मस्कच्या या कंपनीने मेक्सिको सीमेजवळ हजारो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, अनेक रॉकेट लाँच केले आहेत आणि स्टारबेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात नवीन घरे बांधली आहेत. स्टारबेस नक्की काय आहे? नवीन शहर उभरण्यामागचा एलॉन मस्क यांचा हेतू काय? या शहराची इतकी चर्चा का? त्याविषयी जाणून घेऊ.

स्टारबेस म्हणजे काय?

स्टारबेस हे नाव एलॉन मस्क यांनी दक्षिण टेक्सासच्या किनारपट्टीवरील नवीन शहरासाठी प्रस्तावित केले आहे, जे स्पेस एक्स रॉकेट प्रक्षेपण साइटच्या जवळपास केंद्रित आहे. या क्षेत्राला स्पेस एक्स ऑपरेशन्स आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना समर्थन देण्यासाठी समर्पित अधिकृत शहरात बदलण्याची मस्क यांची योजना आहे. २०२० मध्ये टेक्सासमध्ये गेल्यापासून, मस्कने व्यवसायासाठी अनुकूल वातावरणाचा दाखला देत, त्यांच्या अनेक कंपन्यांचा राज्यात विस्तार केला आहे किंवा कंपन्या स्थलांतरित केल्या आहेत. जुलैमध्ये मस्क यांनी ‘स्पेस एक्स’चे मुख्यालय आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ हे कॅलिफोर्नियातून टेक्सासमध्ये हलवण्याची योजना जाहीर केली. सप्टेंबरमध्ये मस्कने ‘एक्स’चे मुख्यालय कॅलिफोर्निया येथून टेक्सासमधील बॅस्ट्रॉप येथे स्थलांतरित केले. कॅलिफोर्नियात एक दशकाहून अधिक काळापासून हे मुख्यालय होते. २०२१ मध्ये ‘टेस्ला’चे मुख्यालयदेखील टेक्सासला हलविण्यात आले. मात्र, कॅलिफोर्निया आजही त्यांचे अभियांत्रिकी केंद्र आहे.

हेही वाचा : विमान प्रवासात आता फक्त एकच बॅग नेता येणार? लगेज नियमांमध्ये काय बदल करण्यात आले?

‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या म्हणण्यानुसार, एलॉन मस्क आणि ‘स्पेस एक्स’नुसार, तेथे स्टारबेसचे अंदाजे ५०० समुदाय आहेत, ज्यात किमान २१९ प्राथमिक रहिवासी आणि १०० पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. हे क्षेत्र राज्य महामार्ग ४ च्या अगदी टोकाला बोका चिका बीचजवळ स्थित आहे. ते अनेक ‘स्पेस एक्स’च्या रॉकेट प्रक्षेपणाचे ठिकाण आहे. प्रस्तावित शहर सुमारे १.५ चौरस मैल व्यापेल, जे सेंट्रल पार्कपेक्षा थोडे मोठे असेल; परंतु टेक्सास मानकांनुसार लहान असेल. या शहरात जवळपास सर्व रहिवासी भाडेकरू आणि ‘स्पेस एक्स’चे कर्मचारी आहेत.

एलॉन मस्क यांना ‘स्पेस एक्स’च्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे शहर का तयार करायचेय?

स्टारबेस साइट सध्या ३,४०० पूर्णवेळ स्पेस एक्स कामगार आणि कंत्राटदारांना कामावर ठेवते. स्पेस एक्स लाँच साइटला शहरात रूपांतरित करण्याच्या कल्पनेवर अनेक वर्षांपासून विचार केला जात आहे. विशेष बाब म्हणजे स्पेस एक्सने २०२१ मधील योजनेबद्दल प्रथम टेक्सासच्या कॅमेरॉन काउंटीमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता.

परंतु, मस्क आणि त्यांची कंपनी ‘स्टारबेस’चे नवीन शहर का निर्माण करू इच्छित आहेत किंवा असे केल्याने त्यांना कोणते विशिष्ट फायदे मिळण्याची आशा आहे याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. पूर्वी कंपनीने केवळ पोस्टल डिलिव्हरीच्या उद्देशाने क्षेत्राचे नाव बदलण्यात स्वारस्य व्यक्त केले होते आणि तसे करण्यासाठी केलेला अर्ज सध्या फेडरल एजन्सीकडे प्रलंबित आहे.

स्टारबेस साइट सध्या ३,४०० पूर्णवेळ स्पेस एक्स कामगार आणि कंत्राटदारांना कामावर ठेवते. (छायाचित्र-रॉयटर्स)

शहराची निर्मिती कशी केली जाते?

टेक्सास ए अॅण्ड एम युनिव्हर्सिटीच्या बुश स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट अॅण्ड पब्लिक सर्व्हिसचे सहयोगी प्राध्यापक रॉबर्ट ग्रीर यांनी शहर कसे तयार होते यासंबंधीचा अभ्यास केला आहे. त्यांनी ‘एपी’ला सांगितले की, शहर तयार करण्यासाठी स्वतःची सनद तयार करणे, सेवा प्रदान करणे, स्थानिक अध्यादेश तयार करणे व कर आकारणे या बाबी आवश्यक आहेत. त्यामुळे रहिवासी किंवा व्यवसायांना भराव्या लागणाऱ्या करांचा बोजा बदलू शकतो. “तुम्ही तुमचे स्वतःचे शहर तयार केल्यास आणि ते आता तुलनेने लहान क्षेत्र असेल, तर त्या भागावर तुमचे नियंत्रण असेल,” असे ग्रीर म्हणाले. ‘स्पेस एक्स’चे अधिकारी असा युक्तिवाद करतात की, स्टारबेस शहर म्हणून समाविष्ट करणे, क्षेत्राच्या कार्यबलाचा विस्तार करणे व कंपनीच्या वाढीस समर्थन देणे या बाबी आवश्यक आहेत.

“‘स्टारबेस’चे शहर येथे तयार करण्याची गरज आहे. कारण- त्यामुळे ज्या शेकडो लोकांना आधीच येथे बोलावले आहे, तसेच अंतराळात मानवतेचे भविष्य तयार करण्यासाठी मदतीसाठी उत्सुक असलेले भावी कामगार यांच्यासाठी राहण्यास उपयुक्त असा परिसर आणि हे ठिकाण जागतिक दर्जाचे बनविण्यासाठीच्या गरजेच्या सुविधांच्या निर्मितीकरिता आवश्यक ती प्रक्रिया सुव्यवस्थित करता येईल,” असे कॅथरीन स्टारबेसचे महाव्यवस्थापक लुएडर्स यांनी या आठवड्यात काउंटीला लिहिलेल्या पत्रात सांगितले. परंतु, स्पेसएक्सला या क्षेत्रावरील परिणामाबद्दल स्थानिक विरोधाचा सामना करावा लागला आहे. अगदी अलीकडे त्यांच्याविरोधात ‘सेव्ह आरजीव्ही’ या प्रादेशिक ना नफा संस्थेकडून खटला दाखल करण्यात आला, ज्याने स्पेस एक्सवर प्रदूषित पाणी जवळच्या खाडीत टाकल्याचा आरोप केला. स्पेस एक्सने यावर प्रत्युत्तर देत, राज्याच्या पुनरावलोकनात कोणतीही पर्यावरणीय जोखीम आढळली नाही आणि खटला व्यर्थ असल्याचे सांगितले.

हेही वाचा : पक्ष्यांच्या थव्यामुळे विमानाचा भीषण अपघात? रशियाला जाणारे विमान नक्की कसे कोसळले? विमानाला पक्षी धडकल्यास काय होते?

प्रकल्पाचे पुढे काय होणार?

या महिन्यात रहिवाशांनी निवडणूक घेण्यासाठी कॅमेरॉन काउंटीकडे याचिका दाखल करून नवीन शहर निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले. ही याचिका मंजूर झाल्यास, निवडणुकीमुळे मतदारांना तीन शहर अधिकाऱ्यांची निवड करण्याची अनुमती मिळेल, ज्यात ‘स्पेस एक्स’चे सुरक्षा व्यवस्थापक गुन्नार मिलबर्न प्रस्तावित प्रथम महापौर म्हणून निवडले जातील. एक शहर म्हणून स्टारबेस फेडरल अनुदानांसाठी पात्र असेल, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्त दिले. याचिकेबरोबर दाखल केलेल्या पत्रात कॅथरीन लुएडर्स यांनी सांगितले की, स्पेस एक्स कंपनीला स्टारबेसला समुदाय म्हणून वाढवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. स्टारबेसच्या दुर्गम स्थानामुळे तेथे शालेय शिक्षण आणि वैद्यकीय सेवा प्रदान करणे गरजेचे आहे.

Story img Loader