एखाद्या वस्तूला स्पर्श करताना तुम्हालाही लहानसा विजेचा धक्का जाणवतो का? दरवाजाच्या नॉबला किंवा खुर्चीला स्पर्श केल्यानंतर अशा प्रकारचा विजेचा धक्का लागतो. हा विजेचा धक्का धोकादायक नाही, मात्र त्यामुळे काही वेळा अस्वस्थ किंवा भीतिदायक वाटू शकते. हा धक्का कशामुळे निर्माण होतो, त्यामागील विज्ञान काय आहे, याविषयी… विजेचा सौम्य धक्का बसण्यामागील कारण कार्यालयात काम करत असताना खुर्चीत बसायला जाताना अचानक विजेचा धक्का बसल्याची जाणीव होते. अगदी अल्पकाळ असलेला हा हलकासा विजेचा धक्का अगदी अस्वस्थ करणारा असतो. काही काळ अस्वस्थता आणि भीतीची जाणीव होते. हा धक्का आपल्याला गोंधळात टाकतो. कार्यालयातील सहकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करतो, मात्र त्यामागील वैज्ञानिक सत्य मात्र ज्ञात होत नाही. या प्रकाराचे एक अतिशयन मनोरंजक वैज्ञानिक कारण आहे. आपल्याला जो धक्का बसतो, त्याचे कारण स्थिर वीज (स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी) आहे. स्थिर विजेमुळे विद्युत भार निर्माण होऊन आपल्याला खुर्चीला, दरवाजाला किंवा एखाद्या इतर वस्तूला स्पर्श करताना विजेचा धक्का बसतो.
स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय?
स्थिर वीज म्हणजे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर किंवा तुमच्या शरीरावर विद्युत भाराचा समूह. ही वीज घर्षणातून निर्माण होते. जेव्हा दोन वेगवेगळे पदार्थ एकमेकांशी घासतात, त्यावेळी स्थिर वीज निर्माण होते. ही वीज एका जागी स्थिर राहते, एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूत सहजपणे जाऊ शकत नाही. सर्व पदार्थ अणूंनी बनलेले असतात. प्रत्येक अणूमध्ये एक धन भारित केंद्रक असते ज्याभोवती एक किंवा अधिक ऋण इलेक्ट्रॉन फिरतात. निष्क्रिय स्थितीत, केंद्रकाचा धन भार त्याच केंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या ऋण भाराच्या बेरजेइतका असतो. पण केंद्रकाने इलेक्ट्रॉन गमावले किंवा मिळवले तर असंतुलन निर्माण होते. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला किंवा धातूच्या वस्तूला स्पर्श करता, तेव्हा अतिरिक्त विद्युत भार तुमच्या शरीरातून त्यांच्याकडे लवकर जाते. या जलद हस्तांतरणामुळे आपल्याला विजेचा सौम्य धक्का बसतो.
हिवाळ्यात स्थिर विजेचा धक्का अधिक का?
थंड हवामानात स्थिर विजेचे झटके जास्त बसतात. कारण हिवाळ्यातील हवा उन्हाळ्यापेक्षा जास्त कोरडी असते. हवेतील आर्द्रता तुमच्या शरीरापासून विद्युत भाराची वाहतूक सुलभ करते. हवा जर कोरडी असेल तर विद्युत भार काढून टाकू शकत नाही, त्यामुळे ते जमा होतात. हवा सुकते आणि आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रॉन सहजपणे तयार होतात. उन्हाळ्यात हवेतील आर्द्रता नकारात्मक इलेक्ट्रॉन टाकून देतात आणि त्यामुळे आपल्याला विद्युत भार जाणवत नाही. हिवाळ्यात घरातील हीटर हवा अजून कोरडी ठेवतात, त्यामुळे स्थिर विजेची शक्यता वाढते आणि आपल्याला विजेचे धक्के जाणवतात. काही कार्यालयांमध्ये उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रणा सुरू असते, त्यामुळे थंड वातावरणामुळे स्थिर विजेचे धक्के जाणवतात.
असे विद्युत धक्के किती हानिकारक?
नाही. स्थिर विजेमुळे निर्माण होणारे सौम्य धक्के आरोग्याला हानी पोहोचवणार नाहीत. मात्र ते अस्वस्थ किंवा धक्कादायक असू शकतात. मात्र बहुतेक वेळा ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. अशा प्रकारच्या सौम्य धक्क्यांमध्ये ऊर्जा कमी असते, क्षणभंगुर संवेदना निर्माण करण्यासाठी ती पुरेशी नसते. पण काही प्रकरणांमध्ये ती धोकादायक ठरू शकते. म्हणजे ज्वलनशील पदार्थ किंवा संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा संपर्क. त्यामुळे पेट्रोल पंप किंवा संगणक चिप उत्पादन करणाऱ्या कंपन्या स्थिर वीज निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्नशील असतात. काही पेट्रोल पंपावर मोबाइल वापरण्यास बंदी असते, ती त्यामुळेच.
स्थिर विजेचे धक्के टाळण्यासाठी काय करावे?
स्थिर विजेचे धक्के ज्यांना त्रासदायक वाटत असतील, तर ते कमी करण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. कोरडी त्वचा अधिक स्थिर विद्युत भार घेऊन जाते. त्यामुळे त्वचेला मॉइश्चाराइझ करा, त्यासाठी लोशनचा वारंवार वापर करा. हवेतील आर्द्रतेमुळे स्थिर वीज बाहेर पडते. त्यामुळे ह्युमिडिफायर वापरल्यास वातावरणात आर्द्रतेची योग्य पातळी राखून स्थिर वीज जमा होणे कमी होण्यास मदत होते आणि हवेत विजेचे वहन सुलभ होते. स्थिर विजेचा धक्का बसू नये यासाठी सिंथेटिक कपडे टाळावे, लोकर किंवा पॉलिस्टरऐवजी सुती कपडे वापरणे अधिक उत्तम. जमिनीवर किंवा गवतासारख्या नैसर्गिक पृष्ठभागावर अनवाणी चालल्याने स्थिर विजेचे विद्युतभार कमी होतो.
© The Indian Express (P) Ltd