भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात किंवा नवीन वस्तूची खरेदी शुभमुहूर्तावर करण्याची प्रथा आहे. ते काम यशस्वी होईल, अशी त्यामागची भावना असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजारमध्ये मुहूर्तावर गुंतवणूक केल्यास येणाऱ्या वर्षामध्ये भरपूर नफा मिळेल, अशी पूर्वापार धारणा आहे. याच पार्श्वभूमीवर मुहूर्त ट्रेडिंग काय असते, ते कधी पार पडते, याबद्दल जाणून घेऊया.
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? सुरुवात कधी झाली?
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात १९५७ मध्ये, तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईमध्ये १९९२ मध्ये झाली. दिवाळीच्या दिवसातील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका तासाच्या कालावधीसाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात येते. व्यापाऱ्यांसाठी हा बाजारात प्रवेश करण्याचा एक शुभमुहूर्त समजला जातो. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार मुहूर्ताच्या वेळा निर्धारित करतात. जो कुणी या एका तासाभराच्या काळात ट्रेडिंग करतो त्याच्याकडे संपूर्ण वर्षभर धनसंचय आणि भरभराट साधण्याची सर्वोत्तम संधी असते, अशी शेअर बाजारातील दलाल (ब्रोकर), ट्रेडर आणि गुंतवणूकदार यांची धारणा आहे. परिणामी या एक तासाच्या कालावधीमध्ये बरेच गुंतवणूकदार समभागांची खरेदी-विक्री करतात.
हेही वाचा :विश्लेषण: सिंचन घोटाळा काय होता? त्यात अजित पवारांविरुद्ध गुन्हा का नाही?
यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ काय?
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने होणारे भांडवली बाजारातील मुहूर्ताचे सौदे यंदा शुक्रवारी, १ नोव्हेंबरला संध्याकाळी पार पडणार आहेत. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत तासभर संवत्सर २०८१ च्या स्वागताचे विशेष व्यवहार होतील. आर्थिक सुबत्तेचे प्रतीक असलेल्या भांडवली बाजारात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समभागांची विशेष खरेदी अथवा अनेकदा नव्याने सुरुवात करण्यासाठी मुहूर्ताच्या सौद्यांना गुंतवणूकदारांमध्ये महत्त्व आहे. देशातील आघाडीचा कमॉडिटी बाजार असलेल्या ‘एमसीएक्स’वरही संध्याकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान मुहूर्ताचे सौदे होतील. सोने, चांदी, पोलाद, खनिज तेल, पॉलिमर आदी जिनसांच्या करारांचे येथे व्यवहार होतील. हिंदू नववर्ष अर्थात विक्रम संवत २०८१चे स्वागत या निमित्ताने बाजाराकडून केले जाईल. मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा सुमारे ६०पेक्षा अधिक वर्षांपासून सुरू असली तरी बहुतांश भारतीयांना त्याबद्दल फारशी माहिती नाही.
मुहूर्त ट्रेडिंगबाबत इतिहास काय सांगतो?
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सामान्यत: वधारून बंद होतो. स्टॉक्स एक्स्चेंजेसपाठोपाठ आता कमॉडिटी एक्स्चेंजेसनेही गुंतवणूकदारांसाठी मुहूर्त ट्रेडिंग सुरू केले आहे. व्यापारी समुदायासाठी दिवाळीपासून नव्या वित्तवर्षाचा प्रारंभ होत असतो. यात व्यापारी ‘चोपडा’ किंवा ‘शारदा पूजा’ करतात. यात सर्व जुनी खातेपुस्तके वा वहीखाते बंद करून नव्या उघडल्या जातात.
सेन्सेक्सचा प्रवास कसा राहिला?
गेल्या दहा वर्षांतील मुहूर्त ट्रेडिंग व्यवहारात आतापर्यंत सेन्सेक्सने ८ वेळा सकारात्मक परतावा दिला आहे. तर दोन वेळा निर्देशांक घसरणीसह बंद झाले. वर्ष २०१६ आणि २०१७ मध्ये भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स नकारात्मक पातळीवर बंद झाला. मात्र २०१७ नंतर लागोपाठ सहा वर्षे तो सकारात्मक पातळीवर स्थिरावला. वर्ष २०२२ मध्ये ०.८८ टक्के असा सर्वाधिक वधारला होता. तर गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये तो ०.५५ टक्क्यांनी वधारला. यंदा भांडवली बाजारात नकारात्मक वातावरण असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी यंदा काळजीपूर्वक व्यवहार करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : आयुष्मान योजनेसाठी तुमच्या आई-वडिलांची नोंदणी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
किती समभाग खरेदी करणे आवश्यक?
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी गुंतवणूकदार कितीही रकमेचे समभाग खरेदी करू शकतो. त्यावर कोणत्याही प्रकारचे समभाग खरेदी-विक्री बंधन नसते. शिवाय नेहमीप्रमाणेच शेअर बाजारातील व्यवहार पार पाडले जातात, फक्त मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजार केवळ एक तासासाठी खुला असतो. यावेळी गुंतवणूकदार अगदी एका समभागापासून ते लाखो रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी-विक्री करू शकतात.
मुहूर्त ट्रेडिंगसाठी समभाग कसे निवडावे?
अनेक दलाली पेढ्या दिवाळीच्या मुहूर्तावर समभाग खरेदीसाठी विविध क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सुचवत असतात. मात्र या दिवशी समभाग खरेदी केल्यास चांगला परतावा मिळेलच असे नाही. तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या दिवशी एखाद्या समभागाने चांगली कामगिरी केली तरी भविष्यात त्याची कामगिरी त्याच्या मूलभूत आणि कंपनीच्या धोरणांवर अवलंबून असते. यामुळे अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या काळात गुंतवणुकीचा विचार करताना समभाग नाही तर एका उद्योगात किंवा व्यवसायात गुंतवणूक अथवा तो व्यवसाय विकत घेत असल्याचा विचार करून समभागाची निवड करावी.
हेही वाचा : ‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?
समभाग निवडण्यासाठी हे महत्त्वाचेच :
कंपनीचे व्यवस्थापन
कंपनीचे बिझनेस मॉडेल
कंपनीचे इतर स्पर्धक
कंपनी काम करत असलेल्या क्षेत्राला भविष्यातील मागणी
कंपनीची मागील काही वर्षातील आर्थिक कामगिरी, नफा, तोटा, महसूल.