एक कल्पना करा… एखाद्या अज्ञात व्यक्तीने तुमचं अपहरण केलं तर होऊ शकतं? तुम्ही त्या व्यक्तीला घाबरू शकता किंवा त्याचा तिरस्कार करायला सुरुवात कराल. पण काही घटनांमध्ये ओलीस ठेवलेल्या व्यक्तीचं अपहरणकर्त्याशी भावनिक नातं जोडलं जातं. अपहरणकर्त्याचा तिरस्कार होण्याऐवजी त्याच्यावर प्रेम होतं. या अवस्थेला ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ असं म्हटलं जातं. जगप्रसिद्ध ‘मनी हाइस्ट’ या वेब सीरीजमध्येही याचा संदर्भ आला आहे. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यावर प्रेम करणाऱ्या आणि ओलीस ठेवलेल्या व्यक्तिरेखेचं नावंही ‘स्टॉकहोम’ आहे. अशा अवस्थेला ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ का म्हटलं जातं? यामागे एक रंजक कथा दडली आहे. चला तर मग जाणून घेऊया…
२३ ऑगस्ट १९७३ साली स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोममध्ये जॉन-एरिक ओल्सन नावाच्या गुन्हेगाराने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने बँकेवर दरोडा टाकला होता. या दरोड्यादरम्यान त्यानं बँकेच्या सुरक्षा रक्षकाला जखमी केलं होतं. तर बँकेत उपस्थित असलेल्या चार जणांना ओलीस ठेवलं होतं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण ओल्सनने बंदुकीचा धाक दाखवून चारही लोकांना बंदिस्त बनवलं होतं. त्यामुळे पोलीसही काहीच करू शकले नाहीत. यानंतर ओल्सनने पोलिसांकडे आपल्या काही मागण्या मांडल्या.
ओल्सनने केलेल्या मागण्या
यामध्ये पोलिसांनी ओल्सनचा सेलमेट क्लार्क ओलोफसनला मुक्त करावं. तीन दशलक्ष स्वीडिश क्रोनर (स्वीडिश चलन) द्यावेत. दोन गाड्या, दोन बंदुका, बुलेट प्रूफ वेस्ट आणि बँकेतून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित रस्ता… म्हणजेच ओलीस ठेवलेल्या लोकांना घेऊन कोणत्याही अडथळ्याशिवाय बाहेर पडण्याची परवानगी ओल्सने मागितली होती.
पोलिसांनी या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर ओलीस ठेवलेल्या लोकांना इजा केली जाईल, अशी धमकीही ओल्सनने दिली होती. ओलीस ठेवलेल्या लोकांमध्ये तीन महिला आणि १ पुरुष होते. त्यामुळे अपहरणकर्ता ओलिसांसोबत काहीतरी अनर्थ घडवेल असं सर्वांना वाटत होतं. विशेष म्हणजे संपूर्ण देशाचं या घटनेकडे लक्ष लागलं होतं. एकंदरीत घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ओल्सनच्या मागण्या मान्य केल्या. पण ओलिसांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली.
ओल्सनला शरण आणण्यासाठी लोकांनी सुचवलेले उपाय
या घटनाक्रमानंतर, जगभरातील लोक तिथल्या स्थानिक पोलिसांना पत्राद्वारे सूचना पाठवू लागले. त्यातील एक सूचना अशी होती की पोलिसांनी बँकेबाहेर ‘सॅल्व्हेशन आर्मी’ची काही देशभक्तीपर गीते लावावी, जेणेकरून अपहरणकर्ता ओल्सनचं मन परिवर्तन होईल आणि तो ओलीसांना मुक्त करेल. तर काहींनी बँकेत मधमाशा सोडण्याचा अजब सल्ला दिला. मधमाशा चावल्यानंतर ओल्सन त्वरित शरण येईल, असा त्यांचा तर्क होता.
ओल्सनने ओलिसांची घेतली पूर्ण काळजी
या सर्व घटना घडत असताना बँकेत मात्र भलतंच सुरू होतं. ओल्सन बंदिस्त ठेवलेल्या प्रत्येकाची योग्यप्रकारे काळजी घेत होता. ओलीस ठेवलेल्या महिलेला जेव्हा थंडी जाणवू लागली, तेव्हा ओल्सनने स्वत:चं उबदार जॅकेट तिला परिधान करायला दिलं. यातील एक महिला खूप घाबरली होती, पण ओल्सनने तिला धीर देत शांत केलं. तसेच ही दरोड्याची घटना आयुष्यभर आठवणीत राहावी, यासाठी ओल्सनने संबंधित महिलेला आपल्या बंदुकीतील एक गोळी भेट दिली. दरम्यान, त्यानं प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करत काळजी घेतली.
तोपर्यंत दरोडा टाकल्याच्या घटनेला एक दिवस उलटून गेला होता. सर्व ओलिसांची अपहरणकर्त्या ओल्सनसोबत चांगली मैत्री झाली होती. सर्वजण एकमेकांची काळजी करत होते. आता पोलीस बँकेत शिरले तर ते ओल्सनला ठार करतील, अशी भीती ओलिसांना वाटू लागली.
ओलिसाने केला पंतप्रधानांना फोन
दरम्यान, ओलीसांपैकी एकाने स्वीडनचे तत्कालीन पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांना फोन केला. त्याने सांगितलं की, ओल्सन केवळ एका ओलिसाला त्याच्यासोबत घेऊन जाऊ इच्छित आहे. मी त्याच्यासोबत जायला तयार आहे. माझा ओल्सनवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही त्याला घाबरत नाही. याउलट पोलिसांनी आम्हाला वाचवण्यासाठी काहीतरी कारवाई तर यामध्ये आमचा जीव जाऊ शकतो, अशी भीतीही ओलिसानं पंतप्रधानांकडे व्यक्त केली.
सहा दिवसानंतर ओल्सनने केलं आत्मसमर्पण
यानंतर २८ ऑगस्ट १९७३ रोजी म्हणजेच दरोडा टाकल्याच्या सहाव्या दिवशी पोलिसांनी बँकेत अश्रुधुरांच्या नळकांड्या टाकल्या. अश्रुधुर सोडल्यानंतर तासाभराने ओल्सनने आत्मसमर्पण केलं. विशेष बाब म्हणजे ओलिसांनी शेवटच्या क्षणापर्यंत अपहरणकर्त्या ओल्सनचा बचाव केला. आधी ओलिसांनी बाहेर यावं, त्यानंतर ओल्सनने बाहेर यावं, अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. पण हे ओलिसांना मान्य नव्हते. कार ओलीस बाहेर आल्यानंतर पोलीस ओल्सनला ठार करतील, अशी भीती त्यांना होती. बाहेर पडताना ओलिसांनी ओल्सनला मिठी मारली. शिवाय ओल्सनने आम्हाला कोणताही त्रास दिला नाही, त्यामुळे पोलिसांनी त्याला कसलाही त्रास देऊ नये, असं ओलीस ओरडून सांगत होते. पुढे अपहरणकर्त्यांचा खटला लढण्यासाठी ओलिसांनीच पैसे जमा केले. पुढेही ते अपहरणकर्त्यांना भेटण्यासाठी तुरुंगात जात राहिले.
‘स्टॉकहोम सिंड्रोम’ नाव कसं मिळालं?
एखादी व्यक्ती आपल्या अपहरणकर्त्याबद्दल एवढी सहानुभूती कशी काय दाखवू शकते? या घटनेने संपूर्ण जगाला चकित केलं. यानंतर मानसशास्त्रज्ञांनी या संपूर्ण घटनेचं बारकाईनं संशोधन केलं आणि या अवस्थेला ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ असं नाव दिलं. क्रिमिनोलॉजिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ निल्स बेजरॉट यांनी सर्वप्रथम ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ हा शब्द तयार केला. ही एक मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये ओलीस त्याच्या अपहरणकर्त्याशी भावनिकरित्या जोडला जातो. त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगतो. काही प्रकरणांमध्ये ओलीस अपहरणकर्त्याच्या प्रेमातदेखील पडतो. या अवस्थेला ‘Norrmalmstorgssyndromet’ असं स्वीडीश नावंही देण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेवर ‘ऑगस्टमधील सहा दिवस’ (Six days in August) नावाचं पुस्तकही लिहिण्यात आलं आहे.
‘स्टॉकहोम सिंड्रोम’चे तीन पैलू…
‘स्टॉकहोम सिंड्रोम’चे महत्त्वाचे तीन पैलू आहेत. पहिल्या स्थितीत, ओलिसांचा अपहरणकर्त्याशी भावनिक बंध जुळतो. दुसऱ्या स्थितीत अपहरणकर्त्याला ओलिसाबद्दल आत्मीयता वाटते. तिसऱ्या स्थितीत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. ‘स्टॉकहोम सिंड्रोम’च्या या तीन पैलूंवर ‘हायवे’, ‘किडनॅप’ आणि ‘मदारी’ यासारखे बॉलिवूड चित्रपट बनले आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये अपहरणकर्ता आणि ओलिसांचं एकमेकांवर प्रेम झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.